बदली शिक्षक होताना (माझी फटफजिती)

शाळेत शिकवायला जायचा बेत मी जाहिर केला आणि खिजवल्यासारखा हसला नवरा. तिकडे केलं हो दुर्लक्ष पण मुलगा म्हणाला,
"आई, तू गणित शिकवणार शाळेत जावून? "
"मग? शिकलेली आहे मी भारतात. "
"पण तुला कॉईन्स कुठे येतात ओळखता? "
"तुला कुणी सांगितलं? "
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला. "
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे? "
"पण मग कशाला बघतेस चित्र? "
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल. "
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो. "
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता. "
त्याला घालवला खरा, पण पहिले धडे नाण्याचे घ्यावे लागणार हे लक्षात आलं. शाळेत जायच्या आदल्या दिवशी नवऱ्याला म्हटलं,
"काही आलं नाही तर तुला फोन केला तर चालेल ना? "
"तुझं अडणार म्हणजे गणित. एखादाच तास असेल तर चालेल. "
त्याच्या आँफिसातला फोन मी शाळेत असताना सारखाच घणघणायला लागला.
"मला वर्क फ्राँम होम पोझिशन मिळते का पाहतो आता. म्हणजे दोन दोन नोकऱ्या घरातूनच करता येतील. "
मी न ऐकल्यासारखं करत तयारी करत होते.
नाणी पुठ्यावर चिकटवून खाली नावं लिहली. मुलांसमोर फजिती नको.
पहिला दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechanun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेपरचॉन? का काहीतरी वेगळाच. मी दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येवून म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.  
"हसू नको. नीट सांग काय ते. "
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणतो.
"तू माझ्या वर्गावर येवू नको. घरीच शिकव मला काय असेल ते. "
पण माझी चिकाटी दांडगी. दुसऱ्या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग माझ्या माथ्यावर मारलेला.   सारेगमप ही मला कधी सुरात म्हणाता आलं नाही तिथे मी काय संगीत शिकवणार. मी कार्यालयात गेले.
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही. "
वा, माझं काम वेळ मारून नेणंच होतं तर इथेही.
रागारागातच वर्गात   सूर लावला. दिवसभर ही मुलं येत होती संगीत शिकायला. एकदा बिंगं फुटतय असं वाटलं तसं एका मुलाला वर्गाच्या बाहेर काढलं. तो हटून बसला.
"मिस, मी का जायचं वर्गाच्या बाहेर? "
"मला तोंड वर करून विचारतो आहेस. जा म्हणतेय तर व्हायचं बाहेर. " हे मनातल्या मनात. नवरा म्हणतो तसं सगळी हुशारी घरात. कारण सांगितलं तसा तो बसला बाहेर जावून. थोड्यावेळाने एक उंच शिडशिडीत माणूस दारावर टकटक करत.
’हा शिक्षक की पालक? ’ विचार मनात येतोय तोच तो म्हणाला,
"बरं दिसत नाही मुल बाहेर, आत घे त्याला. "
मी घरात नाही पण बाहेर जरा टरकूनच वागते. तू कोण सांगणारा वगैरे न विचारता मुकाट्याने त्याला आत घेतलं. नंतर कळलं की शाळेचा प्रिन्सिपाँल होता तो किडकिड्या.
हे तसे जरा बरे प्रसंग माझ्या आयुष्यातले. स्पेशल म्हणजे काय त्याचा अनुभव यायच्या आधीचे. स्पेशल वर्गात उभी राहिले आणि आडदांड मुलं बघून घाम फुटला. मला वाटलं होतं वर्गात फक्त बारा मुलं आणि काहीतरी स्पेशल करायला मिळणार. पण दृश्यं वेगळं होतं.
"व्हॉटस युवर नेम? "
घाबरत मी म्हटलं.
"आय डोंट रिमेंबर"
"व्हॉट? "
"यू कॅन कॉल मी मिस जे. " जेहत्ते ठायी काय असतं ते डोळ्यासमोर नाचलं.
तेवढ्यात;
"स्टुपिड"
"बास्टर्ड"
असं जोरजोरात किंचाळत दोन मुली मैदानात उतरल्या. चिंतातूर चेहऱ्याने मी नुसतीच पाहत राहिले. त्याचं भांडण कसं संपवायचं ते कळेना. तितक्यात देवदूतासारखी एक शिक्षिका अवतरली.
"स्टॉप, स्टॉप. " तिने दोघींच्या वेण्या ओढल्या. मला खरं तर आता रणांगण सोडून पळायचं होतं. यापेक्षा लेखन बरं.  
"धिस इज जस्ट स्टार्ट. " तिने   धमकी दिल्यासारखं म्हटलं. मी घाबरून मान डोलावली. दुर्दैवाने चारी बाजूने घेरणं म्हणजे काय हे मला थोड्याच वेळात कळायचं होतं. पोराना मैदानावर नेलं की आवाज, मारामारी, गोंधळ कुणाला समजणार नाही. मला हे सुचलं म्हणून मी माझ्यावरच खुष झाले. पण कसलं काय जेवणानंतर बाहेर धो, धो पाऊस. शाळेच्या जिममध्ये नेलं मग त्या कार्ट्याना.
"नीट खेळा, मी बसले आहे इथे बाकावर. " एका दिशेने माना हलल्या.
मी ही निवांत वेळेची स्वप्न पाहत बाकाच्या दिशेने मोहरा वळवला. कुठलं काय, माझी पाठ वळल्या वळल्या झोडपलं त्यांनी एकमेकांना बास्केटबॉलने.   मलाही ओरडत ओरडत माझ्या दिशेने येणारा बॉल चुकवण्याच्या प्रयत्नात व्यायाम व्हायला लागला. हळूहळू एकेक जण लागलं, लागलं करत बर्फ लावायला शाळेच्या कार्यालयात. जेनीफर तर बेशुद्ध होवून खाली पडली. माझं मस्तक आता फिरलं. पोरांनी फार पिडलं. माझी असती तर....
"उठ मेले, तुला काही झालं तर आई, वडिल कोर्टात खेचतील मला. दिवाळच निघेल माझं. "
दोन्ही खांदे धरून तिला उभं केलं. गदागदा हलवलं.
"आय कॅंट ब्रीद... आय कॅंट ब्रीद" डोळे गरागरा फिरवत ती तेवढं मात्र म्हणू शकत होती.
"मी टू.... " मी पुटपुटले. पण एकदम झाशीची राणी संचारली अंगात.
"जेने, तुझ्या शिक्षिकेने नोट लिहली आहे या तुझ्या वागण्याची. नाटक करू नकोस. "
डोळे गरागरा फिरवले तिने. वाटलं हिच थोबाडीत देतेय की काय माझ्या नाटकी म्हटलं म्हणून. पण जादू झाल्यासारखी जेनीफर तरतरीत झाली.
रडत खडत मी बदली शिक्षिकेचं कार्य पार पाडत होते ते एका समरप्रसंगाला तोंड देईपर्यंत.   शाळेत पोचले तर बार्बरा जवळीक दाखवित पुढे आली.
"तुझ्यावर कठीण काम टाकणार आहे आज. "
चेहरा पडलाच माझा. पण उगाचच हसले. चेहरा कुठे पडला ते समजत नाही त्यामुळे असं आपलं मला वाटतं.
"नवीन शिक्षक आहे आज तुझ्या मदतीला. "
"नो प्रॉब्लेम. " एवढं काय करायचं अगदी एखाद्याला अनुभव नसेल तर.
"आय नो हनी. " याचं हनी, बनी म्हणजे पुढच्या संकटाची नांदी असते. मी कान टवकारले.
"द अदर टिचर इज डेफ... " ती घाव घालून मोकळी झाली. तो झेलायचा कसा हा माझा प्रश्न. माझ्या आत्मविश्वासाचा बंगला कोसळलाच. इथे सगळे अवयव धड असणाऱ्यांशी माझ्या मराठी इंग्लिश बोलण्याची कोण कसरत. त्यात हा बहिरा. म्हणजे मग मुका पण असेल का?  
जेफचं आगमन झालं आणि नकळत ओठ, तोंड, हात आणि अंग, एकेका शब्दाबरोबर सगळे अवयव हलायला लागले. फार अस्वस्थ झाले मी की बघतच नाही दुसरा ऐकतो आहे की नाही. बोलतच सुटते. त्याच्या ओठांच्या हालचालींशी ताळमेळ घालणं पाचव्या मिनिटाला माझ्या आवाक्याबाहेर गेलं. प्रत्येक मुलाला आधी हातवारे करत आधी माझी आणि नंतर त्याची ओळख हा कार्यक्रम बराच वेळ चालला. त्याच्या ओठांच्या हालचाली समजेना झाल्या तसा मी कागद सरकावला.
"यु आर स्लो लर्नर.... "
"व्हॉट? " मी एकदम डोळे वटारले.
"अदर अंडरस्टॅडस माय लिपमुव्हमेंट क्विवली. "
"मी अदर नाहीये. "
दिवसभर आम्ही प्रेमपत्र लिहित असल्यासारखे चिठ्ठ्या फाडत होतो. कुणाकुणाबरोबर काम करायचं नाही याची यादी वाढत चालली होती. स्पेशल प्रोग्रॅम, बहिरी माणसं.......
(संपादित : प्रशासक)