नात्यांचा चक्रव्यूह....१

जीवनाच्या वळणावर अनेक नाती आपण अनुभवत असतो, त्यातली काही रक्ताची असतात तर काही जोडलेली तर काही जुळलेली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. काही सकून देत असतात तर काही मनस्ताप, काही जगणं शिकवतात तर काही जगायला, काही नाती सुखावतात तर काही दुखावतात, काही हळुवारपणे जोपासावी लागतात तर काही रुष्टपणे तोडावीही लागतात.

ही नाती सांभाळणे तसे कठिणच, हा तर आपल्या सर्वांचाच अनुभव आहे नाही का!

या नात्यांच्या चक्रव्यूहात आपण असे काही फसलेलो आहोत की त्यातून कसे बाहेर पडावे तेच मुळात आपल्याला उमगत नाही. आता तुम्ही म्हणाल नाते तरी किती आणि कुठली? तसे तर बरीच नाती आपण अनुभवत असतो जसं नातं मुलीच, नातं बहिणीच, नातं आईच, नातं बायकोच, नातं सुनेच, नातं वहिनीच, नातं मैत्रीच असे एक ना अनेक नाती सांभाळत सांभाळत आपण आपले अस्तित्वच हरवून बसतो. बऱ्याच वेळी आपल्यालाच प्रश्न पडतो आपण नक्की कोण आहोत? मुलगी की सून, बहीण की वहिनी, बायको की मैत्रीण की आई.... अरे बापरे किती संभ्रम होतो ना...

आयुष्याच्या या चित्रपटात आपली कुठली भूमिका आपण कधी निभवायची हे ठरवता ठरवताच आपल्या आयुष्याचा हा चित्रपट संपणार तर नाही ना? हा यक्षप्रश्न आपल्याला सारखा सतावत असतो.

लग्नानंतर तर एकेका व्यक्ती बरोबर दोन-दोन तीन-तीन नाती जोपासावी लागतात, आता हेच बघा ना सासू-सासऱ्यां बरोबर सुनेच आणि वेळ पडल्यास मुलीच, नणंदे बरोबर वहिनीच, बहिणीच आणि मैत्रिणीच, नवऱ्या बरोबर बायकोच, मैत्रिणीच आणि गरज पडल्यास आईच सुद्धा. हे सगळे पात्र निभावताना होणारी तारांबळ कधी कधी खरंच खूपच त्रासदायक ठरत असते.

तुम्ही म्हणाल आता त्यात कसली तारांबळ? तारांबळ तर होणारच कारण प्रत्येक नात्याची एक अदृश्य परिभाषा ठरलेली असते जसे सुनेने सासू-सासऱ्यां बरोबर कसे वागावे किंवा वहिनीने नंणदे बरोबर कसे राहावे वैगेरे वैगेरे.... डोक्यावर सारखी टांगती तलवार असते  की आपल्या बोलण्याने कुणी दुखावणार तर नाही ना? आपल्या वागणुकीचा कुणाला त्रास तर होणार नाही ना? त्याचा प्रभाव आपल्या इतर नात्यांवर तर पडणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत असतात कायम.

क्रमशः