हुतात्मा भगतसिंह आणि भयभीत इंग्रज सरकार

दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले. आज त्या हौतात्म्याचा ८० वा स्मरणदिन.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी आपल्या ध्येयास्तव स्वत:ला वाहुन घेतले आणि ते हसत हसत फासावर चढले. या सर्व देशभक्त हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणजे हुतात्मा भगतसिंह. तिसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात ’भगतसिंह’ हे नांव हिंदुस्थानात सर्वतोमुखी झाले, हा तरूण हिंदुस्थानियांच्या गळ्यातील ताईत झाला आणि अखेर या ’भगतसिंह’ नावाच्या हिंदुस्थानात चेतना जागृत करणाऱ्या झंझावातास नष्ट करणे इंग्रजी सत्तेस आत्त्यंतिक महत्वाचे ठरले. एकदा का सत्तेने एखादा निर्णय घेतला की त्याला परिणाम स्वरूप देणे महसत्तेला अवघड नसते. मग तिथे साक्षी, पुरावे, न्यायसन, न्यायमुल्ये हे सर्व गौण ठरते. अर्थातच हुतात्मा भगतसिंहाना आता जगु द्यायचे नाहीच कारण ते सत्तेच्या हिताचे नव्हते आणि मग तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी इंग्रजी सत्तेने न्यायसंस्था पायदळी तुडवीत हुतात्मा भगतसिंह प्रभृतींना दोषी ठरविले व ताबडतोब फाशीची शिक्षा ठोठावली आणि पारही पाडली.

प्रथम माहिती अहवाल क्रमांक १६४ दिनांक १७.१२.१९२८ - सॉंडर्स व चनानसिंग यांच्या हत्येबद्दल ’साम्राज्य विरुद्ध भगतसिंह व सहकारी’ असा अभियोग उभा केला गेला. हा अभियोग म्हणजे ज्याचा निकाल आधीच स्पष्ट झालेला होता असा एक केवळ न्यायालयीन कार्यवाहीचा देखावा होता. येणकेण प्रकारेणं काहीही झाले तरी भगतसिंहांना जीवंत ठेवायचे नाही हे ठरलेलेच होते. हे दिव्य हुतात्मे आपल्या ध्येयासाठी जगले आणि आपल्या ध्येयासाठी खुशीचे मरण पत्करायला हसत तयार होते. सॉंडर्स हत्येमध्ये हुतात्मा भगतसिंह सहभागी होते हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांना जर जगायची आसक्ती असती वा मृत्युचे भय असते तर ते स्वत: संसदेत बॉब टाकयला गेलेच नसते.

मुळात त्यांना फाशीची शिक्षा झाली याचे त्यांना दु:ख नव्हते मात्र ती शिक्षा देण्यासाठी सरकारला खास तेवढ्यापुरताच परकोटीच्या अधोगतीस जाऊन व न्यायसंस्थेस हरताळ फासुन ती फाशी कपटाने द्यावी लागली कारण जर हा अभियोग कायद्याच्या कसोटीवर टिकला नसता तर कोणत्याही परिस्थितीत सरकारला  भगतसिंह प्रभृतींना जीवंत ठेवणे परवडणारे नव्हते.

एकदा निर्णय घेतला गेला म्हणताना पद्धतशीरपणे यंत्रणा उभारली गेली. ज्यांना अत्युच्च अधिकार आहेत असे न्यायपिठ कलम ७२ वर बोट दाखवुन स्थापले गेले. वास्तविक असे अमर्याद अधिकार असलेले पिठ स्थापन करण्यासाठी भारत कायदा १९१९ - कलम ७२ द्वारे असे सर्वेसर्वा अधिकार असलेले पिठ केवळ आत्यंतिक आणीबाणीच्या परिस्थितीत केवळ शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी करता स्थापन करता येते आणि सॉंडर्स वधामुळे तशी परिस्थिती निश्चितच निर्माण झालेली नव्हती. मात्र हवा तो निकाल देण्यासाठी व्हॉईसरॉयने गृहखात्यावर दबाव आणुन कायदा मागच्या दाराने वळवला.

स्वतंत्र्यानंतर, जेव्हा या अभियोगाची कागदपत्रे राष्ट्रिय संग्रहालयात उपलब्ध केली गेली तेव्हा अनेक संशोधकांनी या अभियोगाचा बारकाईने अभ्यास केला व त्यातल्या अनेक फटी उघड्या पडल्या. भगतसिंहांचा प्रत्यक्ष सहभाग म्हणजे त्यानी सॉंडर्स वर गोळ्या झाड्ताना पाहिल्याचे सांगणारे अनेक साक्षीदार न्यायालयात ढेपाळले, अनेक साक्षींमध्ये अनेक विसंगती आढळल्या, बहुतेक युक्तिवादात  ’कदाचित’, ’बहुतेक’, ’असावे असे वाटते’, ’तर्कास वाव आहे’ अशी ढोबळ व संमत विधाने वारंवार केली गेली.  मुळात माफीचे साक्षीदार या एकखांबी पायावर सर्व अभियोगाचा डोलारा उभा केला गेला. अर्थातच पुराव्याच्या कायद्यानुसार माफीच्या साक्षीदारांचे जबाब हे पुराव्याच्या पुष्ट्यर्थ्य वापरले जावेत, ते जबाब हा संपूर्ण असा ग्राह्य पुरावा धरला जाऊ नये असे आहे. निकालात हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांना दोषी ठरवितांना तीन गोष्टींवर भर दिला गेला.

पहिले म्हणजे प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार. यात जयगोपाळ व फणिंद्रनाथ वगळता अन्य साक्षीदार ठाम शाबीत झाले नाहीत. तीघांना जबरदस्तीने जबाब द्यायला भाग पाडले गेले जे पुढे त्यांनी न्यायालयासमोर आणले व आपला जबाब अमान्य केला. खुद्द वाहतुक निरिक्षक फर्न आरोपींना ओळखण्यास असमर्थ ठरला. मुहम्म्द इब्राहीम, हवालदार हबिबुल्ला आणि कमाल दिन यांचे जबाबही बीनबुडाचे निघाले, यांच्या जबानीत असे निष्पन्न झाले की हे तथाकथीत प्रत्यक्ष घटना पाहणारे होते तर यांचा जबाब त्वरीत का नोंदला नव्हता? मुळात यांचा नाव पत्ताही पोलिसांनी तेव्हा घेतला नव्हता. मोटार हाक्या अब्दुल्लाने तर त्याच्या जबानीतील विसंगतीतुन असे उघड केले की त्याचा जबाब पोलिसांनी तब्बल चर दिवसांनी घेतला होता, तत्काळ नव्हे. म्हणजेच दोन माफीचे साक्षीदार वगळता अन्य कोणीही साक्षीदार ठाम साक्ष देऊ शकला नाही. सर्वात भयंकर प्रकार म्हणजे संपूर्ण अभियोगाच्या कालावधीत हे माफीचे साक्षीदार पोलिसांच्या ताब्यात होते, त्यांना न्यायालयीन ताबा देण्यात आला नव्हता. म्हणजेच पोलिसांनी त्यांचे जाब जबाब हे साम -दाम-दंड- भेद याचा वापर करून मिळविले. राहीला प्रश्न तो भगतसिंहांच्या कटातील सहभागाचा. ते साक्षीदार फारतर इतके सिद्ध करु शकले की माफीच्या साक्षीदारांनी कट जेव्हा व जिथे रचला गेला तेव्हा भगतसिंह तेथे उपस्थित होते, मात्र त्यांचा कटातला सहभाग निर्विवाद सिद्ध झाला नाही. शिवाय या संबंधात जबान्यांमध्ये तफावती आढळल्या.

दुसरे कलम म्हणजे वधानंतर लाहोर शहरात झळकलेल्या ’सॉंडर्स’ वधाच्या पत्रकांमध्ये असलेले भगतसिंहांचे हस्ताक्षर. मात्र प्रतिशोधाच्या जाहीरनाम्यावर लेखन हा प्रत्यक्ष वधाचा पुरावा ठरुच शकत नाही!

तिसरे कलम म्हणजे न्याय वैद्यक अधिकार्‍यांचा जबाब. त्यांच्या अभ्यासानुसार सॉंडर्स वधाच्या स्थळी सापडलेली रिकामी पुंगळी ही संसदेतील स्फोटानंतर भगतसिंहांच्या अंगावर जे स्वयंचलीत पिस्तुल सापडले त्यात चपखल बसत होती व त्याच पिस्तुलाचा वापर वधासाठी झाला होता. मात्र जर भगतसिंह घटनास्थळीच तात्काळ व पिस्तुलासह पकडले गेले असते तर या विधानाला काही किंमत होती. प्रत्यक्षात हे पिस्तुल वधा नंतर चार महिन्यांनी हस्तगत केले गेले तेव्हा त्याच पिस्तुलाने भगतसिंह यांनी वध केला हे सिद्ध होत नाही.

कलम ७२ अन्वये उभारलेला हा खास न्यायालयाचा तमाशा फक्त सहा महिने कालावधीचा होता आणि या न्यायासनाने दिलेल्या निकाला विरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागायचा अधिकार आरोपींना नव्हता. कामकाज आरोपींच्या गैरहजेरीत चालविले गेले. न्यायालयीन कार्यकालात न्या. आगा हैदर यांना निस्पृह असल्याने हटविले व तिथे सोयीच्या न्यायाधीशास घेतले गेले म्हणजे दंडाधिकारी जी शिक्षा ठोठावतील तीला ३ न्यायाधीशांनी अनुमोदन द्यायचे आणि २ विरुद्ध १ अशी फाशी संमत करुन घ्यायची नामुष्की नको असा हा प्रकार. असे न्यायपीठ या आधी वा या नंतर कधीही कार्यान्वयीत केले गेले नाही.

एकुण चित्र अगदी स्पष्ट आहे. ’भगतसिंह’ या नावाचा इंग्रज सरकारने इतका धसका घेतला होता की त्यांना संपविण्याखेरीज इंग्रजांकडे दुसरा उपाय नव्हता आणि जुलुमी इंग्रजांनी सत्तेच्या बळावर खोटा न्याय हिंदुस्थानियांच्या गळी उतरवला. मात्र ज्यांना फाशी झाली त्या हुतात्म्यांना यत्किंचितही खेद नव्हता. त्यांनी त्यांचे कार्य पुरे केले होते. त्यांच्या चितेतुनच क्रांतीचा वणवा पेट्णार होता.

हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांच्या ८० व्या हौतात्म्यदिना निमित्त या महान क्रांतिकारकांना सादर वंदन.