जीवाचं क्रिकेट !

भारतानं वर्ल्ड कप जिंकला ! सचिन नावाच्या देवानं तो वर्ल्डकप हातात घेतला. तेव्हा अगदी आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलं... 
लहानपणी ज्याचा खेळ समोर ठेवून "तेंडुलकर" बनायची इच्छा मनात बाळगली अश्या त्या देवाच्या हातात "वर्ल्डकप" पाहून आनंदाश्रू आवरले नाहीत.
त्याच क्षणाला आयुष्यातल्या "क्रिकेट" च्या आठवणी ताज्या झाल्या आणि डोळ्यांसमोर उभ्या येऊन ठाकल्या !
क्रिकेट चि सुरुवात झाली ती शेठांच्या वाड्यातून !! प्लॅस्टिक च्या बॉलवर एकच वेगळीच मजा यायची. 
पाच ओव्हर चे सामने खेळताना होणारी भांडणं, चिडा चिडी..ह्या सगळ्यांनी त्या क्षणांमध्ये वेगळेच रंग भरले.
अनेक काचा फुटल्या, गाड्यांचे दिवे फुटले. मालकांशी भांडणे झाली ! पण ह्या सगळ्याच्या मोबदल्यात त्या क्रिकेट मधून जी मजा मिळाली ती अमूल्य आहे. 
निरंजनच्या घराची गच्ची हा आमचा क्रिकेटचा दुसरा अड्डा ! जेमतेम १५ फूट बाय ६ फूट आकाराची गच्ची ती. तेही सहाव्या मजल्यावर. 
पण तिथे सुद्धा स्ट्रेट ड्राईव, स्वीप शॉट असे अनेक तंत्रशुद्ध फटके खेळण्यात यायचे ! 
सहाव्या मजल्यावरून बॉल खाली पडला कि तो पळत पळत जाऊन आणायचा ! त्या एक तासाच्या खेळत प्रत्येकाला ७-८ वेळा तरी खाली जायला लागायचं.
खाली पडलेल्या बॉल नी जर चुकून गोखलेंच्या घराचा पत्रा गाठला, तर मोफत शिव्या आणि जोडे पण मिळायचे. 
शेजारच्या गच्चीत बॉल गेला तर जीव धोक्यात घालून, खूप कसरत करून तिथून तो बॉल आणायचा ! 
हे करत असताना मानकर काकांच्या दृष्टीस पडलो तर त्यांच्या एकदम "खास शिव्या" सुद्धा पचवल्या आहेत ! 
गच्ची मधल्या क्रिकेट मध्ये पण एक वेगळीच मजा मिळायची. त्या एवड्या छोट्या गच्चीत अनेकदा तुरनामेंत आणि टेस्ट मेचेस पण रंगल्या आहेत !!
पंतसचीव पिछाडीच्या गल्लीत पण अनेक वेळेस आमचे क्रिकेट रंगले. सुट्टीमध्ये दुपारच्या भर उन्हात हा उपक्रम जोरदार रंगायचा. 
ह्याच्यावरूनच सिधयेंच्या क्लास मध्ये माझा झालेला किस्सा सांगावासा वाटतो. सर् अतिशय कडक स्वभावाचे आणि राहायला आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये. 
मला रस्त्यावर खेळताना पाहिल्यावर त्यांनी आईजवळ हि गोष्ट बोलून दाखविली .. 
"अहो, तुमचा मुलगा रस्त्यावर क्रिकेट खेळतो..कोण कसली पोरं असतात ती .. ."
"तुम्हीच काहीतरी करा, मला पण तो रस्त्यावर खेळतो ही गोष्ट अजिबात आवडत नाही .. पण तो माझं ऐकेल तर ना.. "
झालं, सरांनी क्लास मध्ये "रस्त्यावर खेळतो" ह्या कारणास्तव मला सगळ्यांसमोर एकदम मस्त चोप दिला...
त्यानंतर कोणाला मी रस्त्यावर खेळताना कधीच दिसलो नाही ! त्या वेळेस जो धाक बसला, तो आज इतक्या वर्षांनी पण तसाच आहे !
नातुबगेचे मैदान म्हणजे आमचे "होम ग्राउंड". तिथे खेळताना क्रिकेटचा जो आस्वाद घेतला तो इतर कुठेच नाही. कधी बघावं तेव्हा पूर्ण भरलेलं. 
मैदान आकारानं छोटंसंच, त्यामुळे जास्ती पळापळी नाही. आणि सीमारेषा अगदी जवळ, त्यामुळे चौके आणि छकड्या मारायला त्यामानानी सोपं. 
"काय रे, घेतो मेच? " असं दुसऱ्या टीम ला विचारायचं आणि मग त्यांनी म्हणावं "बॉल बॉल चि किंवा एकवीस चि घेतो का ? .." 
मग खूप चर्चा करून "फ्रेंडली" मेंच साठी त्यांना तयार करायचं. 
बॉल बॉल चि मेंच म्हणजे - जी टीम हरेल त्यांनी आपला बॉल दुसऱ्या टीम ला देऊन टाकायचा. 
जेव्हा प्रत्येकाच्या खिशात एक-दोन रुपये तरी असायचे तेव्हा सगळ्यांनी पैसे गोळा करून एक नवीन बॉल विकत घ्यायचा आणि त्याच्यासाठी जीव पणाला लावून खेळायचं.
नातुबागेत अनेक सामने गाजवले, आणि अनेक गमावले पण !  कारण नातुबागेत खेळताना प्रश्न फक्त जिंकायचा नव्हता !  तर प्रतिष्ठेचा पण होता. ! 
एक सामना आठवतोय, सामना मस्त रंगत आला होता.. आम्हाला जिंकायला ६ चेंडू, ११ रन्स हवे होते. मी स्ट्राईक वर होतो. 
आणि मी छकडी ओढली आणि मेंच आटोक्यात आणली.
दुसऱ्या एका सामन्यात त्यांना एका चेंडूत सहा रन्स हवे होते. मी बॉलिंग करत होतो. शेवटच्या चेंडूवर मला पुक्या ओढलेली छकडी अजूनही आठवतेय ! 
मेच हरलो आम्ही. पण हरून सुद्धा क्रिकेट चि जी मजा मिळाली ती वेगळीच होती !
खेळायला येणाऱ्या पोरांची संख्या वाढायला लागली. आमच्याच टीम मधली २२ -२४ पोरं नातुबागेत मावेनाशी झाली .. मग आमचं मोर्चा वळला तो त्या काळात  "ओसाड" असलेल्या सणस मैदानावर !
दोन टीम करून आमच्यातच सामने रंगू लागले !
का कुणास ठाऊक, त्या मैदानात एक गूढ वाटायचं ! त्या कोपऱ्यातल्या भिंतीपाशी जुगार आणि पत्त्याचे डाव मस्त रंगायचे ! 
एक दिवस तर मैदानाच्या अगदी मध्यभागी एका भिकारी माणसाचे मृत शरीर पडलेलं आढळले. 
विशेष म्हणजे त्या गोष्टीचं कोणालाच काही विशेष वाटत नव्हतं ! एखादा येऊन कुतूहलानं त्या प्रेताकडे पाहायचा आणि निघून जायचा ! 
कोणाला काहीच पडलं नव्हतं. सगळे आपापल्या 'क्रिकेट" मध्ये दंग झाले होते.
जसं शिक्षण संपलं, तसं "क्रिकेट" खेळणं पण संपलं. राहिलं ते फक्त क्रिकेट 'बघणे'.
त्या दिवशी अचानक पाटलांनी विचारलं - "काय रे मर्दा, येणार का रे क्रिकेट खेळायला शनिवारी ?"
क्षणाचाही विलंब न लावता माझा होकार सांगितला. फर्ग्युसन कॉलेज च्या ग्राउंड वर सगळे जमले. आणि मस्त डाव रंगला. बऱ्याच दिवसांनी इतक्या गर्दीत खेळताना भारी वाटलं. 
क्रिकेट खेळायला वयाची मर्यादा नाही ह्याचा अजून एक प्रत्यय पहिल्याच दिवशी आला. 
एक आजोबा आपल्या नातवाला बॉलिंग करत होते .. त्यानं मारलेला चेंडू पळत जाऊन अडवत होते.
त्यांच उद्दिष्ट फक्त नातवाला खेळवायचं तरी वाटत नव्हतं, पण त्यातून ते स्वत:ला पण अपार आनंद मिळवून देत होते !
दुसऱ्या एका पीच वर कोणी सर् आपल्या कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांबरोबर आलेले. खेळता येत असो नसो, त्यांच्या बेंट ला चेंडू लागायचा औकाश, पोरं जोरजोरात "वा, एक नंबर शॉट सर् !! " असं कल्लोळ करतायत !
काही "रावडी" category मधली पोरं फुल फेकाड चेंडू टाकत असतात !! आणि तो Batsman पण तितकाच रानटी खेळत असतो ..
एकापेक्षा एक लांब अश्या छकड्या टाकतो !! काय माहित..भावी तेंडुलकर त्यांच्यात लपले असतील ?
दर शनिवारी नियमित क्रिकेट खेळायला जातो. आता "तेंडुलकर" बनायची इच्छा उरली नाही, ती वेळ पण निघून गेलीये.
पण क्रिकेट चा आस्वाद मात्र मस्त घेतोय.