जलालाबाद रणसंग्रामातील हुताम्यांचा ८१ वा स्मृतिदिन

दिनांक२२ एप्रिल.  चितगांव शस्त्रागार विजयाच्या जलालाबादपर्वातील हुतात्म्यांचा ८१ वा स्मृतिदिन.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या सशस्त्र क्रांतिपर्वात ’चितगांव’ घटना ही एक असामान्यच आहे, इतिहासातील ते एक सोनेरी पान आहे. १९१६ साली आयरिश क्रांतिकारकांनी सशस्त्र लढा उभारला आणि डब्लिन जिंकुन घेत तब्बल सात दिवस ताब्यात ठेवलं या घट्नेपासून स्फूर्ति घेत एका सामान्यातल्या असामान्य माणसाने म्हणजे मास्टरदा उर्फ मास्टर सूर्यसेन यांनी सशस्त्र संघटना स्थापन केली - भारतिय प्रजासत्ताक सेना - म्हणजेच उत्तरेतील ’हिं.स.प्र.से’चा पूर्वेतला अवतार. इंग्रजांना इथुन हाकलुन लावायचच या ध्येयाने पछडलेल्या मास्टरदांनी असहकार आंदोलन तडकाफडकी मागे घेतले गेल्यानंतर कॉंग्रेसचा राजीनामा दिला व सशस्त्र संघर्षाचा निश्चय केला. या ध्येयाने भारलेल्या तरुणाला देशासाठी जीव ओवाळुन टाकणारे साथीदार मिळाले आणि सत्तेला हादरा देऊ शकेल असा चितगांव शस्त्रागार ताब्यात घेण्याचा बेत आखला गेला. उद्देश हाच की प्राणांची बाजी लावुन लढायला निघालेल्या क्रांतिकारकांच्या हातात बलाढ्य शत्रूशी लढण्यासाठी आधुनिक शस्त्रे व दारुगोळा मुबलकतेने उपलब्ध असावा. आज शेकड्यात असलेली सेना उद्या हजारात जाईल आणि सत्तेला आव्हान देत देशाबाहेर हाकलुन लावेल याबद्दल मास्टरदांना खात्री होती.

मास्टरदा

ज१

सांगायलाही अधिक वेळ लागावा इतक्या सहजतेने मास्टरदा व त्यांच्या शूर सहकाऱ्यांनी शस्त्रागारासह संपूर्ण चितगावांवर ताबा मिळवला आणि तिरंगा फडकवला, तो दिवस होता १८ एप्रिल १९३०. मात्र शस्त्रागारात केवळ शस्त्रे मिळाली, दारुगोळा मिळाला नाही वा एकही काडतुस मिळाले नाही. यामुळे शस्त्रे व दारुगोळा जी व जेवढी होती त्यावरच लढाई लढायची आहे हे समजुन चुकले. मोठा अपेक्षाभंग झालाच पण सगळी योजनाच विफल ठरली. एकीकडे ते आणि तितकेच, दमलेले भुकेले ५५-६० सैनिक व दुसरीकडे पळालेल्या इंग्रजांनी दिलेल्या खबरीच्या उत्तरादाखल आलेली ताज्या दमाची व अत्याधुनिक मारक शस्त्रांनी सुसज्ज अशी पलटण अशी दारुण परिस्थिती निर्माण झाली. नाईलाजाने चितगांवातुन माघार घेत जरा सुरक्षित जागा म्हणुन जवळच्या जलालाबादच्या टेकड्यांचा आसरा घेत लढायचा निश्चय सेनेने केला. इंग्रजी पलटणीने भराभर टेकडीला वेढायला सुरुवात केली आणि समोरच्या अंगाने फौज टेकडी लढु लागली. वर मास्टरदांचे सैन्य हे लष्करी प्रशिक्षण नसलेले, नवख्यांचे, त्यात पुन्हा अनेक किशोरवयीन. इंग्रजांच्या पलटणीला प्रतिकाराची अपेक्षा नव्हती, आपले सैन्य पाहताच मास्टरदांचे भेदरलेले मूठभर सैनिक पळत सुटतिल हा त्यांचा कयास  मास्टरदांच्या झुंजार सेनेने साफ चुकविला. सेना टेकडीच्या वर आणि चढणारी इंग्रज पलटण खालुन वर येणार याचा अचूक फायदा घेत मास्टरदांच्या सैन्याने घेत गनिमी काव्याचा तडाखा दिला. मास्टरदांनी आपल्या सैनिकांच्या चार तुकड्या केल्या. अंबिकाप्रसाद व लोकनाथ बौलच्या तुकड्या आघाडीला तर मास्टरदा व निर्मलच्या तुकड्या पिछाडी सांभाळत व आघाडीचे वीर जखमी होताच त्यांना मागे आणुन स्वत: पुढे जायला सज्ज झाले. मास्तरदा स्वत: नवशिक्या मुलांना मस्केट अडकली तर मोकळी करुन देत सर्वत्र फिरत होते. वर येणारी पलटण टप्प्यात येताच सेनेने जबरदस्त एल्गार केला आणि चार तासांच्या लढाईनंतर इंग्रजांच्या पलटणीला माघार घ्यावी लागली. आणि अननुभवी युवासेना इथे चुकली. आपल्या पहिल्या वहिल्या लढाईच्या पहिल्याच चकमकीत शत्रूला मागे हटताना पाहुन उत्तेजित झालेल्या मुला-तरुणांनी आडोशातुन बाहेर येत ’वंदे मातरम’ चा जयघोष सुरू केला. आणि पलटणीला आतापर्यंत न समजलेले त्यांचे नेमके स्थान समजले. पाठोपाठ नव्या तुकडीचा लुईसगन, मशिनगनसह जबरदस्त हल्ला आला. कितीही शौर्याने लढले तरी दमलेले, तहानलेले मूठभर मस्केट्वाले आणि हजारो भारी शस्त्रे घेतलेले कवायती ताज्या दमाचे सैन्य हा विषम लढा किती काळ टिकणार?

सर्वात पहिले बलिदान दिले ते टेग्रा म्हणजे हरिगोपाल बौलने. बघता बघता त्या घोर संग्रामात १० जणांना दिनांक २२ एप्रिल रोजी हौतात्म्य प्राप्त झाले.

टेग्रा उर्फ हरिगोपाल बौल
नरेश रे
प्रभास बल
त्रिपुरा सेन
निर्मल लाल
बिधु भट्टाचार्य
शशांक दत्त
मधुसुदन दत्त
पुलिन विकास घोष
जितेन दासगुप्ता

हरिगोपाल व मतिलाल

ज२

नरेश, त्रिपुरा आणि बिधु

ज३

जितेन, मधुसुदन आणि पुलिन

ज४

हे दहाजण तत्क्षणीच हौतात्म्य पावले तर

मतिलाल कानुनगो जबर जखमी होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिलला अमर झाला

पाठोपाठ  अमरेन्द्र नंदी, अर्धेन्दु दस्तिगर व विकास दस्तिगर २४ तारखेला हौतात्म्य पावले.

मोहीमेच्या पहिल्याच दिवशी शस्त्रागारात सापडलेली शस्त्रे इंग्रजांच्या उपयोगी पडु नयेत म्हणुन ती तोडुन व जाळुन टाकताना हिमांशु सेन पेट्रोलचा भडका उडुन जबरदस्त भाजला गेला व त्याला दिनांक २८ एप्रिल रोजी हौतात्म्य प्राप्त झाले.

आता अट्टाहासाने लढणे मारक ठरले असते कारण अजुनही कार्य अधुरे होते. आणि ते पुरे करायचे तर आता माघार घेउन, पुन्हा जमवाजमव करुन नव्याने उभे राहणे आवश्यक होते. काळजावर दगड ठेवुन मास्टरदांनी माघार घेत जंगलातुन पसार होण्याचे आदेश दिले. वयाची विशीही न गाठलेल्या किशोरांना आपापल्या घरी जाण्यास सांगीतले गेले तर तरुणांना ३-४ च्या गटाने पसरत दूर जाण्यास सांगितले गेले. परिस्थिती जरा निवळली की पुन्हा एकत्र यायचे व नवा बेत आखायचा होता. या सेनेत सर्वात लहान होते ते सुबोध रॉय आणि त्यावेळी त्यांचे वय होते फक्त १४ वर्षे. श्रीमंत जमिनदराचा हा मुलगा देशासाठी काहीतरी करण्याच्या ध्यासाने आपल्या वडीलांची नंबरी (नोंदलेली) बंदूक गपचुप घेऊन घरातुन पळाला व थेट मस्टरदांच्या सेनेत सामिल झाला होता. पुढे याच बंदुकीच्या क्रमांकावरुन तो पकडला गेला व त्याला अंदमानची शिक्षा झाली. अंदमानला गेलेला हा बहुधा सर्वात लहान क्रांतिकारक असावा. सुदैवाने आपल्या भावी आयुष्यात सुबोधदांना स्वतंत्र हिंदुस्थान डोळे भरुन पाहता आला. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २७ ऑगस्ट २००९ रोजी त्यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी देहावसान झाले. 

सुबोध रॉय

ज५

या गौरवशाली पर्वाचा एक साक्षीदार सुदैवाने आजही हयात आहे. जलालाबाद संग्रामात गळ्यात गोळी लागलेले श्री. बिनोद बिहारी चौधरी हे सध्या १०१ वर्षांचे असुन १० जानेवारी २०११ रोजी त्यांना १०१ वर्षे पूर्ण झाली. त्यांचे वास्तव्य आता बांगलादेशात असले तरी आपल्या कर्मभूमिला भेट देण्यासाठी ते कोलकाता- हिंदुस्थानला भेट देत असतात.

बिनोद बिहारी चौधरी

ज६

जलालाबाद संग्रामाच्या ८१ व्या स्मृतिदिनी त्या महान पर्वातील सर्व हुतात्म्यांना सादर श्रद्धांजली आणि अन्य वीरांना विनम्र अभिवादन

हा लेख दिनांक २२ एप्रिल रोजी प्रकाशित करु शकलो नाही यासाठी क्षमस्व.