शाळा

शाळा सुटल्याची घंटा वाजली. पेंगुळल्या डोळ्यांनी अमरने दप्तर काखोटीला मारलं. भराभर चालत तो निघाला. शाळेच्या आवारातून तो बाहेर पडणार तेवढ्यात मोगरेबाईंनी त्याला गाठलं. कपाळावरची झुलपं उडवत तो नुसताच त्याच्यांकडे बघत राहिला.
"मंगलताई येतील आज. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे."
"कशाला?" तो  वैतागलाच.
"मला टपरीवर जायचं आहे. पक्याला कबूल केलय मी."
"अरे, कुणी भलं करायला गेलं तर तुझं आपलं माझंच खरं असं आहे."
"बरं थांबतो." निर्विकार स्वरात तो म्हणाला.
"शाळा बंद झाली आहे. बाहेर राहशील का उभा? पाहिजे तर मी पण थांबते तुझ्याबरोबर ताई येईपर्यंत."
"थांबतो मी. तुम्ही गेलात तरी चालेल."
"बघ हं, मी गेल्यावर जाशील निघून."
"थांबतो म्हटलं ना." त्याचा रागीट, हुप्प चेहरा पाहून मोगरेबाईंनी फार ताणलं नाही.
त्या निघून गेल्या तसं अमरलाही स्वतःच्या उर्मट उत्तराची लाज वाटली. पण त्यावर फार विचार करायची आवश्यकता त्याला वाटली नाही. हातावरचे उमटलेले निळे, काळे  वळ तो कुरवाळत राहिला. या पायावर उभा राहा, त्या पायावर उभा राहा करत तो कंटाळलाच. आवारात  चिटपाखरूही  नव्हतं. तो अस्वस्थ झाला. शाळेच्या दिशेने परत फिरला. व्हरांड्यात एका कोपर्‍यातल्या खोलीच्या वर्गासमोर अंगाची जुडी करून बसून राहिला. ती शांतता, काळोख त्याला अंगावर आल्यासारखी वाटायला लागली. बराचवेळ पोटातही काही गेलं नव्हतं. मंगलताईंनी काही खायला आणलं तर या आशेवर तो त्यांची वाट पाहत राहिला. हातावरचे काळे निळे वळ निरखीत काही बाही आठवत राहिला. मागचे पुढचे प्रसंग एकत्र जोडताना त्रयस्थासारखी मनाची होरपळ निरखीत राहिला.

पावलांची चाहूल घेत तो झोपायचा प्रयत्न करत होता. रस्त्यावरच्या दिव्याची तिरीप डोळ्यावर आडवा हात ठेवून अडवीत होता. पण बाजूच्या खोलीतून मायचं हळूहळू कण्हणं त्याला अस्वस्थ करत होतं. खोपट्यातल्या त्या दोन खोल्या म्हणजे एका आडनिड्या चौकोनात मध्ये दोरी बांधून अडकवलेला विटका पडदा. टक्क डोळ्यांनी तो नुसताच त्या पडद्याकडे बघत राहिला, बघता बघता त्याचे डोळे मिटायला लागले.  त्याला दचकून जाग आली ती दारू प्यायलेल्या बापाच्या शिव्यांनी. मायला शिव्या घालत होता. जेवायला वाढ म्हणून मागे लागलेला. बाहेर शांतता पसरलेली. किती वाजले होते कुणास ठाऊक. झोपमोड झाली म्हणून माय भडकलेली. तरातरा उठत तिने डाळ, भात त्याच्यासमोर आपटला तसं त्याचं मस्तकच फिरलं. बाचाबाचीला सुरुवात झाली. आता पुढे काय होणार ते पाठ झालं होतं. तरी धडपडत उठून तो उभा राहिला. पडद्याला पडलेल्या भोकांतून बघत राहिला. खाली ठेवलेलं ताट उचलायला बाप वाकला आणि कोलमडलाच. माय निर्विकारपणे पाहत होती.  कोलमडणार्‍या बापाला तिने सावरलं नाही. ताटातच हात गेला  तसं एका हाताने त्याने  ताट उडवून लावलं, कसाबसा तोल सावरत तो उठून उभा राहिला. खरकट्या हातानेच त्याने मायच्या तोंडात लगावून दिली. कळवलेल्या मायला बघून त्याला बापाला बाजूला करावं असं वाटत होतं. पण तो हलला नाही. त्यालाही  मार बसला असता, बापानं लाथाबुक्क्यांनी तुडवलं असतं. तो पुन्हा जाऊन पडून राहिला. चुळबुळत या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिला.  मायचं किंचाळणं, बापाचं ओरडणं त्याच्या कानात घुमत राहिलं.  त्या आवाजाची सवय झाल्यासारखी एक डुलकीही त्याला लागली पण परत जाग आली ती बाजूला येऊन लवंडलेल्या मायच्या दबक्या हुंदक्यांनी. त्याच्या डोक्यात तिडीक गेली. उठलाच तो तिथून. अजगरासारख्या सुस्तावलेल्या बापाचा हात त्याने अंगातला  जोर एकत्र करत पिरगळला.  बापाने स्वतःची कशीबशी सुटका करून त्याला  बदडून काढलं. अर्धमेलंच केलं जवळजवळ. पण तो रडायचं विसरून गेला. आज पहिल्यांदा त्याने त्याच्या बापाला धडा शिकवायचा प्रयत्न केला होता. पुन्हा असं करणं जमेल की नाही हे माहित नव्हतं. पण आजच्या त्याच्या धाडसाचं त्याचं त्यालाच कौतुक वाटलं. मायला मारतो हा माणूस. अशीच अद्दल घडायला पाहिजे. बाप शिव्या घालत झोपून गेला. पण अमरला झोप लागली नाही. रात्रभर तो नुसताच पडून होता. सकाळी तर सगळं अंग सुजलेलं, त्याला उठताही येईना. बाजूला डोळ्यातलं पाणी पुसत  माय त्याच्या सुजलेल्या अंगावरून हळुवार हात फिरवीत होती. त्याला एकदम रडायलाच आलं.
"नगं बाबा असं रडू. आनी बापावर हात नाय उचलायचा. शपथ हाय बग माजी तुला." तो केविलवाणं हसला. तिच्याकडे असाहाय्य नजरेने बघत राहिला. त्याच्या नादानं तीही थोडंफार शुद्ध बोलायला शिकली होती. शपथ अगदी व्यवस्थित म्हणाली.
"तू का मार खातेस पण?"
"नाय तर काय करू पोरा?"
तो काहीच बोलला नाही. त्याला आता इथे राहायचंच नव्हतं. माय आली तर ठीक, नाहीतर तो एकटा ते खोपटं सोडणार होता. पण जाणार कुठे? करणार काय? प्रश्नचिह्नांच्या भेंडोळ्यांनी त्याला विळखा घातला, घेरून टाकलं.
चार दिवस अमरला शाळेतही जाता आलं नाही. अंगावरची सूज शहाण्यासारखी कधीतरी आपली आपणच उतरली.  त्यानंतर तो धडा शिकला.  मायचं मार खाणं त्याने निर्विकारपणे स्वीकारलं, पण झोप मात्र उडाली. सतत भिती, धाकधूक, आईचा मार वाचवता येत नाही त्याची लाज, शरम. त्याचं तेज लपत चाललं, उत्साह संपला. थकल्या मरगळल्यासारखा तो पावलं ओढत शाळेत पोचायला लागला. खोपट्यात बसण्यापेक्षा हे बरं.

मंगलताई लगबगीने शाळेच्या आवारात शिरल्या. तसा उशीरच झाला होता. बराच. रस्त्यावरचे दिवे शाळेच्या आवारातला अंधार अधिकच गडद करत होते. अमर थांबला असेल की गेला असेल घरी? घरी गेला असेल तर डोकावायचं का त्याच्या घरात. त्यांना ठरवता येईना.
"मी इथे बसलोय मंगलाताई."
आवाजाच्या दिशेने त्यांनी पाहिलं आणि अंगाची मुटकळी करून बसलेली ती जुडी पाहून त्यांना भरून आलं. त्या त्याच्या शेजारी जाऊन बसल्या. त्याच्या पाठीवर हात फिरवला त्यांनी. पण त्याने अंग अधिकच चोरलं.
"अरे बस अडकली रे बाबा गर्दीत, म्हणून उशीर झाला. रागावलास?"
त्याने नुसतीच मान हलवली.
"घाबरलो होतो काळोखात एकटाच बसायला. पोलिसांनी बघितलं असतं तर मारच खावा लागला असता."
"पोलिस कशाला उगीच मारतील."
तो हसला.
"ताई, झोपडपट्टीतल्या पोरांना मार खायला काही करावं लागत नाही. जाऊ दे."
त्याच्या हातावरच्या काळ्या, निळ्या वळांवर हात फिरवीत तो काही तरी बोलेल म्हणून त्या गप्प राहिल्या. तोही तसाच बसून राहिला. एकदम  लक्षात आल्यासारखं त्यांनी पिशवीत हात घातला. वाटेत त्याच्यासाठी म्हणून घेतलेली भेळ त्यांनी अमरपुढे धरली. अमरने ते पुडकं जवळजवळ ओढलंच. सगळी भेळ पोटात गेल्यावर भुकेचा डोंब शांत झाला. थोडीशी लाज वाटली त्याला पण भुकेपुढे इलाज नव्हता. आता तो बोलेल या अंदाजाने मंगलताईंनी विचारलं,
"रोज रोज कोण मारतं रे तुला?  इतका वाईट वागतोस तू?"
त्याने नुसतीच मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं.
"तुझे दोन्ही हात काळे निळे दिसतायत म्हणून विचारलं. शाळेत मस्ती करतोस तसंच घरी करतोस का?"
तो गप्पच झाला एकदम. त्याला वाटलं होतं मंगलताई समजून घेतील. त्यांच्याशी बोललं की आईचा मार चुकविण्याचा मार्ग सापडेल. मी वागतो वाईट, मी? फुकट गेला वेळ. त्यापेक्षा पक्याच बरा होता. काही विचारत नाही, खायलाही पुढे करतो काही ना काही. तो उठलाच. न बोलता चालायला लागला. मंगलताई तशाच बसून राहिल्या. इतकी धावपळ करून त्या तिथे पोचल्या होता आणि हा पोरगा असा निघून गेला. कसं बोलतं करायचं याला? का एकदम असं विचारायला नको होतं? तो स्वत:हून सांगेपर्यंत वाट पाहायला हवी होती? पुढे होवून त्याला थांबवण्याइतकाही उत्साह त्यांच्यात उरला नव्हता. अमरचाच विचार करत त्या तिथे बसून राहिल्या.

कार्यालयात बसून त्या नवीन आलेल्या मुलाची माहिती वाचत होत्या. पाकिटावर लिहललेला क्रमांक आधी त्यांनी खोडून टाकला. त्या मुलीचा, मुलाचा स्वभाव, वागणं वाचलं की बर्‍याचदा त्याला शोभेल अशा फुलाचं नाव द्यायला त्यांना आवडायचं. मुलांच्या नावाचा संदर्भ नाही ना वापरायचा, ठीक आहे. संदर्भ म्हणून  क्रमांक वापरण्याऐवजी फुलांच्या नावांनी त्या मुलांना संबोधणं त्यांना भावायचं. हे काम आटपलं की त्यांना  संस्था काम करत असलेल्या शाळेत पोचायचं होतं. त्या दुहेरी भूमिका पार पाडायच्या संस्थेसाठी. मानसोपचार तज्ज्ञ आणि समाजसेविका. सहावीतल्या अमरबद्दल त्याच्या शिक्षिकेला बोलायचं होतं.

"तसा फार शांत आहे अमर. पण कधीही बघा, डुलक्या काढत असतो. लक्ष नाही म्हणावं तर काहीही विचारलं तर उत्तरं तर देता येतात."
"पण याबाबत मी काय करू शकते? म्हणजे घरी झोप होत नसेल तर ते पोरगं डुलक्या काढणारच." नक्की काय प्रश्न आहे ते त्यांच्या लक्षात येत नव्हतं.
"सांगते ना. डुलक्या काढणं समजू शकतो आपण. म्हणजे खूप मुलांचं होतं असं. झोपडपट्टीतल्या मुलांची काय परिस्थिती असते हे तर माहीतच आहे नं आपल्याला. पण अमर वर्गात बसल्या बसल्या स्वतःचेच हात पिरगळत राहतो. कुणी त्याला थांबवायला गेलं तर त्यांच्या अंगावर तुटून पडतो."
"शिक्षिकांवरही?"
"बर्‍यांचदा मुलंच प्रयत्न करतात त्याला थांबवायचा. तो स्वतःचे हात पिरगळायला लागला की मुलं विचारतात ना असं का करतोस, तेवढं कारण पुरतं त्याला. कुणी थांबवायला गेलं की त्यांच्याच अंगावर जातो धावून. मग आमचं लक्ष जातं. आम्ही पुढे झालो की मुकाट बसून राहतो. तुम्ही बोलून बघा. पाहिजे तर त्याची चित्रं बघा.  फार छान चित्र काढतो. मारामारी झाली, आम्ही ओरडलो की बसतो चित्र काढत.  चित्रातून त्याचं मन समजतं का बघायचा प्रयत्न केला आम्ही, मानसोपचारतज्ञ म्हणून तुम्हीच त्याच्याशी बोलावं असं वाटतंय."
"बघते बोलून मी. तुम्ही बोललाय का त्याच्या पालकांशी."
"बोललो आहोत. पण ते त्याचे खरे पालक आहेत की नाही याची कल्पना नाही."
"म्हणजे?"
"एकदा रस्त्यावरच्या एका माणसाला आणलं होतं धरून वडील म्हणून." मंगलाताई अमरच्या शिक्षिकेकडे बघतच राहिल्या.
"खरं सांगतेय मी. तेव्हा नाही कळलं. पण नंतर काहीतरी असच झालं तर वडील म्हणून दुसरा माणूस समोर उभा." मी तर चांगलीच चिडले होते. काहीच  परिणाम झाला नाही अमरवर. मग ठरवलं बोलायचं नाही दोन दिवस. ती मात्रा लागू पडली. त्यावेळेस सांगितलं खरं. घरी जाऊन कधीतरी खरे पालक बघून घ्यायचं मनात आहे. पण जमलेलं नाही अद्याप."

त्यानंतर मंगलताईंनी वेगवेगळ्या पद्धतीने अमरशी बोलायचा प्रयत्न केला. तो स्वतःचे हात का पिरगळतो, थांबवायला गेलं की त्या मुलांच्याच अंगावर का धावून जातो ते शोधून काढायचं होतं. त्यावर उपाय शोधायचा होता. आताही शाळेच्या त्या कोपर्‍यात, अंधुक उजेडात अमरने काढलेली चित्रांचं भेंडोळं त्यांनी पर्समधून काढलं. छान चित्रकार होईल हा मुलगा. त्या ती बोलकी चित्रं निरखीत राहिल्या, पण फार काही हाताला लागत नव्हतं. कितीवेळ तंद्री लागली होती कुणास ठाऊक. पण त्या पाठमोर्‍या, पाठीत वाकलेल्या बाईच्या चित्रावर कुणाचं तरी बोट जाणवलं तसं त्यांनी दचकून वर पाहिलं. अमर कधीतरी बाजूला येऊन बसला होता. रागावून निघून गेलेला अमर त्यांच्याशी बोलण्याच्या ओढीने परत आला होता. मंगलाताईंच्या चेहर्‍यावर पुसटसं स्मित उमटलं.
"माय माझी."
"अरे आई म्हण की नीट" तो नुसताच हसला.
"छान काढतोस चित्र तू." त्यांनी त्याच्या पाठीवर अलगद थोपटलं.
"तुम्हाला काळजी वाटतेय ना मी माझे  हात पिरगळतो, आणि बाकीच्या मुलांना  त्रास देतो म्हणून."
मंगलताईंनी नुसतीच मान डोलवली. काही बोलून उगाच पापड नको मोडायला.
"तुम्ही म्हणताय तसं मी वाईट वागत नाही मंगलताई. बाप वाईट वागतो. लहान असलो तरी समजतं मला असं वागायचं नसतं ते. पण माझ्या मोठ्या झालेल्या बापाला का नाही समजत ते? दारू पिऊन रात्री उशीरा येतो आणि  मारतो माझ्या मायला, मारहाण करतो. तीही मुकाट सहन करते. लहान होतो तेव्हा मध्ये पडलो की नुसता ढकलून द्यायचा बाप, पण थोडासा मोठा झालो तसं विरोध करायला लागलो मी. मग मलाही मारायला लागला मी मध्ये पडलो तर. मार चुकवायचा म्हणून निर्लज्जासारखा मायला सोडवत नाही मी त्या जनावरापासून. झोप लागत नाही मायला मार खावा लागणार या चिंतेने रात्रभर म्हणून शाळेत डुलक्या काढतो. शरम वाटते. मग माझेच हात पिरगळत बसतो स्वत:ला, बापाला शिक्षा दिल्यासारखी. कुणी मध्ये पडलं की मला तो माझा बापच वाटतो, स्वत:लाही बघतो त्यात मी. सगळा संताप बाहेर निघतो. माझ्यासाठी मी बाप असतो, मध्ये पडलेलं माणूस बाप असतो. म्हणून माझे हात काळे निळे होतात, मध्ये पडणार्‍याला मार खावा लागतो. बापालाच मारत असतो मी आणि ते जमत नाही म्हणून स्वत:लाही. माझ्या मायला  वाचवायचं असतं मला."

मंगलताईचे डोळे पाणावले. अमरला कुशीत घेऊन त्याला थोपटावं, निजवावं असं अगदी आतून मनापासून वाटून गेलं त्यांना. तितक्यात अमर म्हणाला.
"शाळेतच शिकलो मी कसं वागायचं ते, अन्यायाचा प्रतिकार करायचा हे पण सांगतात बाई पण ते जमत नाही म्हणून माझीच चीड येते मला.  तुम्हाला एक विचारू?"
त्यांनी नुसतीच मान डोलवली.
"माझ्या घरी जाऊन भेटाल माझ्या बापाला? त्याला सुद्धा माझ्यासारखं शाळेत यायला लावा आणि मायला पण. मग दोघांनाही समजेल वाईट वागायचं नसतं आणि  कुणी तसं वागलं तर त्या वागण्याला प्रतिकार करायचा असतो, शिक्षाही करायची असते. याल  तुम्ही माझ्या घरी?"

इतकं सोपं असेल हे? शेजारीपाजारी काय करतात रात्री अपरात्री अमरची आई मार खाते तेव्हा? कुणीच नाही त्या माणसाला समज देत, की कुणाला काही फरकच पडत नाही? का आजूबाजूला हेच वातावरण? अनेक अमरना विघातक दिशेकडे वळविणारं. यातून कोण कोणाला सोडवणार, आणि कोण कुणाला समज देणार? मंगलाताई नुसत्याच अमरकडे पाहत राहिल्या.  मानसोपचारतज्ञ, समाजसेविका या नात्याने त्यांना त्याच्या अमरच्या परिस्थितीचा अभ्यास करायचा होता, चर्चा करायची होती सहकार्‍यांबरोबर. त्यानंतर काय पावलं उचलायची, कोणता मार्ग अवलंबता येईल ते निश्चित करता येणार होतं. अमरने मात्र चुटकीसरशी सोपा उपाय सुचवला होता, त्याच्या समस्येवर तोडगा सांगितला. जायचं अमरच्या घरी आणि घ्यायला लावायचा त्याच्या मायला आणि बापाला शाळेत प्रवेश? काळोखाने घट्ट वेढलेल्या शाळेने विळखा घातल्यासारख्या त्या, त्या प्रश्नावरच थांबल्या.