वादळवाऱ्याशी झुंजताना, तुफानाला सामोरे जाताना
सुखाची हिरवळ कधीच दिसणार नाही का ?
चढत जाणाऱ्या रात्रीसोबत मनातील अंधार गडद होताना
आशेचा प्रकाशदीप कधीच उजळणार नाही का ?
हळव्या स्वप्नांची फुले होरपळून गळून जाताना
जीवनदायी श्रावण कधीच बरसणार नाही का ?
हिरावलेल्या स्वप्नांची फुलपाखरे परत मागताना
तक्रार कधीच करता येणार नाही का ?
अवहेलनेच्या दाहक जखमा उरी भडकताना
सहानुभूतीचा ओलावा कधीच मिळणार नाही का ?
श्रांतक्लांत होऊन कुशीत विसावताना
अंगाईगीत कधीच गाईले जाणार नाही का ?