केनोपनिषद भग २ २९पासून

सर्वां भूतीं व्यापुनि राहे; जाणे धीर तयाला /

इहलोकातें त्यजितां जाणा अमृतरुप तो झाला //२९//

तत्त्व सत्य परि दुर्ज्ञेय असे ज्ञांतेहि अगम्य /

कथा पुरातन ये विषयीं तुज आधीं कथितो रम्य //३०//

सुरासुरांचे जाहलें पुर्वी त्या घोर रणीं/

विजयश्री ते सुरा लाधली ब्रम्हाची त्या करणी //३१//

तेणें पावुनि उत्कर्षातें झाले धन्य जगांत /

अहंतागुणें राहिले स्वयें यशोगन तें गात. //३२//

'आम्हीं' म्हणती ' जय मेळविला महिमा अमुचा मोठा /

कळोनी आला ब्रम्हातें त्या अहंकार हा खोटा //३३//

प्रकट जाहलें करावयाला त्यांला प्रसादपूर्ति  /

न ओळखे परि कोणातेंही तेजोमय ते मूर्ति //३४//

देव सर्वही, जातवेद तो धरिती त्याचे पाय /

योजावा कीं ओळखावया तेणें काहिं उपाय / //३५//

तेजापुढती धांवत गेला झाला गर्व तयास /

पुढें जाय तों तेंच लागलें यातें पुसावयास //३६//

' कोण ? ' म्हणोनी पुसतां सांगे 'पदार्थ जे जे जगतीं /

दाहक शक्तीपुढें न माझ्या स्वल्पकाल ते जगती' //३७//

तेव्हां दावुनि तृण बोले भस्म करीं गा याचें /

अभिमानानें गीत उगा हें स्वमुखानें गायचें //३८//

त्वरा करुनियां धांवत गेला तें तृण  जाळावयास /

जवळी जाउनि तसा परतला वृथा होत आयास //३९//

गर्व गळोनी लज्जित होउनी देवांपाशीं जाय /

' न कळे नकळे ' म्हणे ' न चाले माझा तेथ उपाय' //४०//

पाठविलें मग पवमानाला मिळुनी सर्व सुरांही /

धांवत जाउनी ब्रम्हापाशीं उभा त्यापुढें राही //४१//

'कोण' म्हणोनी पुसतां सांगे ' म्हणती मजला वात/

वस्तुमात्र मी अपुल्या संगे नेतों सहज वाहत ' //४२//

तृण उचलाया तया सांगतां वेगें घेई धांव /

न हालतां तें बळें सर्वही जै जिरोनी हांव //४३//

गर्व जिराला परतुनि आला बोले देवांला हो /

'यत्न करोनिहि नाहीं झाला तज्ज्ञानाचा लाहो' //४४//

इंद्रातें मग देव सांगती मिळावया तज्ज्ञान/

त्वरा करुनियां पुढें जाय तों पावे अंतर्धान //४५//

उमा सुंदरी तिजशीं मग तो गेला गगनामाजी /

'तेज काय तें सांगुनि ' बोले ' निरसीं शंका माजि' //४६//

गिरिजा बोले करावया मग तज्जिज्ञासा पुर्ति /

'ब्रह्म म्हणोनी म्हणती त्याची ते तेजोमय मूर्ती //४७//

जय मेळवीला तेणेंच तुम्ही सुर हे निमित्तमात्र /

केले तेणें तुम्हां सुरांला महिम्यातें या पात्र //४८//

उमोपदेशें यापरि झालें ब्रम्हाचें त्या ज्ञान /

तत्स्पर्शे त्या तिघां मिळाला अग्रत्वाचा मान //४९//

ज्ञानें त्याच्या इंद्र त्यांतही अग्रेसरता पावे /

यदर्थ लागे मुनिवर्यांतें विपिनांतरिं तापावें //५०//

ब्रम्होपासनविधि सांगतसें आतां श्रवण करा हो/

जन्ममृत्युचा जेणें सारा बंध दुर तो राहो //५१//

विजेपरी ते तेजोमयही असुनी द्दृश्य नसे कीं /

निमेषांत जें गुपत जाहलें देवापुढेंहि शेखीं //५२//

म्हणुनि आपुल्या मनीं चिंतिती निशिदिनिं विद्वज्जन तें /

तेणें त्यातें विरोनि जाई अंतीं त्यांचें मन तें //५३//

गुण हे जाणुनि उपासितो जो निजहृदयामाझारी /

हवा हवासा होउनि त्यातें सेविति भूतें सारीं //५४//

सांगा सांगा म्हणोनि म्हणतां कथिली उपासना ही /

भवजलधीतुनि तरावयाला याविण पथ तो नाहीं //५५//

तपें करावीं विविध तयास्तव दमवुनि इंद्रियगण तो /

शास्त्रविहित तीं कर्मे त्यापरी करावयाचीं म्हणतों //५६//

सांग वेद जो उपासनेचा असे तयांवरि भार /.

या सर्वाचा सत्याचाही तिजला सर्वाधार//५७//

औपनिषद हें ज्ञान लाभलें भाग्यें जरी कवणासी /

सुकृत दुष्कृतें तरी तयाचीं क्षणांत सर्वहि नाशी //५८//

परब्रह्म तें त्याच्याकरितां उपासनेला भावें /

सत्य सत्य हें कथितों त्याला ब्रम्हत्वचि लाभावें //५९//

                 समाप्त.