नशीब भाग - ७५

२००६ ला एका शाळेतील कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. शाळांना मिळणार्‍या अनुदानाची माहिती समजली व अभ्यासक्रमा व्यतिरिक्त कार्यक्रमांना मिळणारे महत्त्व लक्षात आले. त्या करता होणारा खर्च लक्षात आला. त्या संपूर्ण कार्यक्रमाचा गोंधळ व शिक्षक/शिक्षिकांचा होणारा गोंधळ बघून ह्या कार्यक्रमांना उपयोगी ठरेल असे प्रशिक्षण माझ्या डोक्यात घोळू लागले.

प्रत्येक शाळेत, वर्षभर बरेच कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमांचा मला समजलेला उद्देश म्हणजे त्या कार्यक्रमातून मुलामुलींना भविष्यात बाहेरील जगातील व्यवहार समजावे व त्याचा अनुभव त्यांना त्या वयात मिळावा. पण प्रत्यक्षात हे कार्यक्रम म्हणजे  वर्षभरात मिळणार्‍या अनुदानाचा खर्च झाला हे दाखवण्याचा एक खटाटोप असतो. मी जे अनुभवले ते असे होते की कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन, संचालन व त्या करता लागणारी साधन सामुग्री ह्यात मुलामुलींच्या समावेशापेक्षा त्या शाळेतील शिक्षक/शिक्षिकांचा व इतर अनुभवी व्यक्तींचा वावर जास्त होता. ह्याचे कारण मुलामुलींना ह्या विभागांच्या आवश्यक प्रशिक्षणाचा  अभाव हेच आहे. त्या जागी प्रशिक्षित मुलामुलींचा वावर असणे आवश्यक आहे तरच त्यांना बाहेरील जगातील व्यवहार समजणे सुलभ होईल.   

मी नियोजन, संचालन, व्यासपीठा वरील हालचालींचे नियंत्रण, प्रकाश योजना, फोटो - व्हिडिओ - ध्वनी प्रक्षेपण ह्या विषयांचे प्रशिक्षण शिबीर व त्याची माहिती तयार केली. असल्या प्रशिक्षण शिबिराचे एक नाव तयार केले "टेकनो क्लब" एक प्रसिद्धी पत्रक बनवले व बर्‍याच शाळांना ते पाठवले. दोन शाळांनी मला बोलावले सगळे समजवून घेतले व पैशाचे प्रमाण समजल्या वर नकार दिला. प्रत्येक प्रशिक्षण शुल्कातील ३०% शाळेला मिळतील कारण जागा आणि प्रशिक्षण शाळेची जबाबदारी होती तर ७०% मला मिळावेत कारण प्रशिक्षणाकरता लागणारी सर्व प्रकारची साधने माझी होती. पण मला जास्त पैसा मिळणार हे शाळेच्या अधिकार्‍यांना पटले नव्हते. त्यांचा आडमुट्ठेपणा असा होता की मला तीन महिन्याचा पगार बाहेरून कंत्राट पद्धतीने घेण्यात येणार्‍या शिक्षकाला देतात तसाच असेल व शाळा पूर्ण प्रशिक्षण शुल्क घेणार, त्यात किती प्रशिक्षणार्थी असावेत, कोणती साधने वापरावी हे शाळा ठरवणार. हे माझ्या व्यवसायात बसणारे नव्हते, मला मान्य नव्हते. बोलणी फिसकटणार हे निश्चित होते.

आशाच एका शाळेत बोलणी करायला गेलो असताना त्या शाळेला कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षकाची जरूर होती त्या करता त्यांनी मला लगेच काम सुरू करा म्हणून सांगितले. मला पण सगळीकडचा नकार ऐकून हा शिक्षकाचा प्रस्ताव साजेसा वाटला व मी होकार दिला वर्ष २००७. मला १० हजार महिन्याला मिळणार होते, ते सगळे मी घरभाडे म्हणून भरणार होतो. घरापासून कामाची जागा १०० पावलावर होती. तसेच मुलांना घर खर्चात हात भार लावण्याचे सुख मला मिळणार होते व तसे ते दोन वर्ष मी मिळवले हे मी माझे नशीब समजतो, कारण हि मिळकत फार काळ टिकणे शक्यच नव्हते, तशाच घटना घडल्या.

ह्या शाळेच्या दोन शाखा होत्या,  एक मुंबईला होती. पुण्यातल्या शाळेत मी काम सुरू केल्यानंतर दोन महिन्याने मला मुंबईत असलेल्या कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षकाची भेट घेण्या करता मुंबईला जावे लागले. जे घडले ते मराठी माणसाला शोभणारेच घडले. तो कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षक मराठी माणूस होता, जे. जे. चा फाईन आर्ट्स पदवी धारक होता. एक दिवस आधी फोन करून भेटण्याची वेळ निश्चित झाली होती. चेंबूर भागात पोहचल्यावर मी पुन्हा फोन करून थोड्याच वेळात अंधेरीच्या त्या शाळेत पोहचणार असा निरोप दिला.  आमच्या भेटीची वेळ निश्चित झाली. मी सरळ त्यांच्या कार्यालयात गेलो, कुलूप पाहून मला त्या शिक्षकाची वागणूक आवडली नव्हती. पुन्हा फोन झाला मी - "आज भेटणे शक्य नसल्यास मला तसे स्पष्ट सांगा, कारण इथे तुमच्या कार्यालयाला कुलूप आहे. " तो - "मी माझ्या मदतनीस बाईला दार उघडायला सांगितले होते, थोड्या वेळात त्या येतील थोडे थांबा. "

काही वेळाने दार उघडले, बाईने माफी मागितली, त्या दार उघडायला विसरल्या होत्या. "बसा, सर १० मिनिटांत येतील. " मला ह्या सर (डोके ह्या अर्थाने) शब्दाची जाम तिडीक आहे. सर, सर म्हणून त्या माणसाला डोके आहे ह्याची आठवण करून देत असल्या सारखे वाटते, तर काही वेळा सर म्हणणारी व्यक्ती त्याला डोके कमी असल्याची कबुली देत असल्या सारखे वाटते, तसे बर्‍याच वेळा खरे असल्याचे अनुभव मला आहेत. तर असो, मी माझा नव्याने बनवलेला अ‍ॅपल कॉम्प्युटर उघडून बसलो होतो.

५ मिनिटांतच ते कॉम्प्युटर ग्राफिक्सचे सर आले. "हा काय प्रकार आहे, छे मला अ‍ॅपल कॉम्प्युटर आवडत नाही, असो, मला असे कळले की तुमचे ग्राफिक्स हे क्षेत्र नसून तुम्ही फोटोग्राफर आहात. पुण्यात त्यांना ग्राफिक्स शिक्षक नेमायचा होता असे मला कळवले असते तर मी त्यांना चांगला माणूस दिला असता. " मुंबईकराचे असले टोमणे मी ऐकणे शक्यच नव्हते, मी - "पुण्यात निवड अधिकार्‍याने माझी निवड का केली हे मला का ऐकवता? आपली भेट इथेच संपली असे मी समजतो! " तो थोडा निवळला - "तुम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरता? " मी - "फोटोशॉप बिटमॅप एडीटर आणि इलेस्ट्रेटर व्हेक्टर एडीटर वापरतो. " ग्राफिक्सचे सर - "मी इलेस्ट्रेटर कधी वापरले नाही. आमच्या कडे फक्त कोरलड्रॉ व्हेक्टर एडीटर वापरले जाते. अहो बाई ह्यांना जरा त्या चॉकलेटची ऍड करायला द्या, बघू हे फोटोशॉप ने ही ऍड कशी बनवतात. कारण ह्यांनी अजून कोरलड्रॉ वापरलेले नाही. "

दोन तासात मी माझे काम संपवले व त्या मुंबईच्या शाळेतून त्या सराचे तोंड न पाहता बाहेर पडलो. त्या ग्राफिक्सच्या सराने मला साध्या नाश्त्याला बोलवण्याचे नाटक देखील केले नाही. पण त्या मदतनीस बाईने मात्र मला दोन वेळा त्या शाळेतला चहा पाजला होता. जवळच्याच एका जागेत मी एकट्यानेच नाश्ता केला. दुपारचे तीन वाजले होते. संध्याकाळच्या सहा शिवाय परतीची बस नव्हती. मला सात वाजताच्या बस मध्ये जागा मिळाली. सकाळी ५ घर सोडले होते, रात्री १० वाजता घरी परतणार होतो. असल्या फडतूस ग्राफिक्स शिक्षक सरा कडून माझा अपमान करून घेणे हेच माझे नशीब समजत मला झोप लागली. असो, पुण्यातली ती शाळा पुढच्या भागात...