स्पष्टपणे सांगावे का ?

माझे एक नातेवाईक गेली काही वर्षे आमच्याकडे पूर्वकल्पना न देता दिवसातील  कोणत्याही वेळी येतात. त्यांचे लग्न होण्यापूर्वी  असेच येत असत व आता लग्न झाल्यावर कुटुंबकबिल्यासकट दारात दत्त म्हणून उभे राहतात व आम्ही  नाश्त्यालाच आलो आहोत किंवा जेवायलाच आलो आहोत, अशा पध्दतीचा संवाद साधतात. 

काही दिवसांपूर्वी एका परिचयाच्या  दांपत्याने असाच प्रकार केला होता.  फोनवरून सांगितले की, आम्ही येत आहोत व आज रात्री राहूनच जाऊ. दांपत्य माहितीचे असल्याने आमची अशी कल्पना झाली की, ते दोघे व त्यांची छोटी मुलगी असे येत आहेत. प्रत्यक्षात ते आणखी तिघांना घेऊन आले ज्यांच्याशी आमची ओळखही नव्हती.
हल्ली जवळजवळ प्रत्येकाचे वेळापत्रक तयार झालेले असते. दिवस लागलेला असतो. पूर्वीइतका  निवांतपणा आताशा मिळत नाही. तेव्हा,  अशा प्रसंगामध्ये घरातील सर्वांना त्रास होतो. महिलावर्गाला अधिक त्रास होतो. मनः स्ताप भोगावा लागतो. राहण्याची वा जेवण्याची व्यवस्था आयत्यावेळी करावी लागते. कारण -अतिथी देवो भवः .

अशा प्रवृत्तीच्या नातेवाईक व मित्रांना घडलेल्या गोष्टीची कल्पना नाही दिली तर जमीन मऊ समजून कोपराने खणण्याची प्रवृ्ती वाढते. कल्पना दिली तर संबंध बिघडण्याचा धोका असतो.

स्पष्टपणे सांगावे ?
मनोगतींचे अनुभव काय आहेत ?