(नवीन) पाळीव प्राणी

वाड्याच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेलं; वाड्यापासून जरासं बाजूला असलेलं; अगदी छोटंसं असं आमचं घर..  
समोर उंबरांचं मोठा वृक्ष उभा ठाकलेला. शेजारी असलेल्या विहिरीचं पाणी पिऊन पिऊन मोठा झालेला तो पठ्ठ्या.  
खालच्या बाजूला एक छोटीशी खोली आणि तेवढीच एक माडीवरती. वर जाणारा लाकडी जीना आणि त्याच्या कडकड वाजणाऱ्या पायऱ्या.  
शेजारीच वाळिंबेच्या पडक्या घराचे अवशेष आमच्या जिन्याच्या भिंतीला टेकून कसे बसे उभे.
आता अश्या घरात जर इंग्लिश जातीचा कुत्रा वगैरे पाळला असेल तर ते एक आश्चर्यच म्हणायला लागेल.  
असल्या मस्त घरात पहिला प्राणी नजरेस पडतो तो म्हणजे 'झुरळ'. जवळच असलेल्या विहिरीमुळे खालच्या खोलीत भिंतींना असलेली ओल आणि त्यामुळे आलेले पोपडे, ही म्हणजे ह्या अष्टपाद कीटकाला पर्वणीच. रात्री दिवे मालवले की खालच्या खोलीत ह्यांचे टोळीयुद्ध सुरू. आणि अचानक उठून दिवा लावला तर ५-६ सेकंदाच्या आत सगळे सैनिक गायब! त्यांना तर डोळे पण नसतात. इतक्या छोट्या आकारच्या त्या किड्याला इतकी बुद्धी कशी काय असते ह्याच आश्चर्य वाटत. बेगॉन आणला, झुरळ पळवून लावण्याच्या गोळ्या आणल्या, पण ह्यांचे अस्तित्व ह्या जगतातून नाहीसे होण्याचे चिन्ह काही मला दिसत नाही.  
आता झुरळ म्हणजे पालींसाठी पक्वान्नच की. त्यामुळे पालींचे घरातील अस्तित्व अत्यंत स्वाभाविक आहे. आमच्या घरापासून समोर मालकांच्या घरापर्यंत जी भिंत जाते, त्याच्यावर ह्यांचेच  राज्य. वाटेत एका रांगेत ये-जा करणार्‍या मुंग्या, पाखरे हे थेट पालींच्या जिभेवर आश्रय घेतात. दिव्यांच्या बटणामागे एक छोटीशी फट आहे. त्याच्यामागे ह्या पाली झुरळ पकडायचे ट्रेनिंग घेत असतात. अनेक लाइव्ह सीन मी डोळ्यांनी पहिले आहेत. 'त्यांना मारायचं नाही, पाल म्हणजे खंडोबाचे दैवत' हीच आम्हाला मिळालेली शिकवण. त्यामुळे त्यांच्या संख्येवर मर्यादा ठेवणे थेट शक्या नाही. मग झुरळासाठी  औषध मारायचे. त्यांची संख्या घटली की पालींची गणना आपोआपच कमी झालेली आढळून येते.
तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे चिचुंद्रीचा. चिचुंद्री म्हणजे नक्की काय हे कदाचित बर्‍याच लोकांना झेपणार नाही. हा उंदीर सदृश प्राणी, आपल्या छोट्याश्या सोंडेच्या साहाय्याने सगळीकडे हुंगत फिरत असतो. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे चिचुंद्री कधी धुडगूस घालत नाही (ते उंदीर करतात). भिंतीच्या कडेकडेने शांतपणे  तिचा संचार सुरू असतो. आई म्हणते 'चिचुंद्री म्हणजे लक्ष्मी, दौलत. तिला मारायचं नसत'. आणि अशा प्रकारे घरचा ताबा आमच्यापेक्षा जास्ती ह्या चिचुंद्रीकडेच जातो. आता ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही ही एक पंचाईत आहे. साधारण तत्त्वानुसार, कालांतराने "कार्यशीलता" ह्या स्वभावविशेषामुळे माणसाची प्रगती होत जाते. आता वरील म्हणण्यानुसार आमच्या राहणीमानात, आर्थिक परिस्थितीमध्ये झालेल्या चांगल्या बदलाचे श्रेय मात्र ही चिचुंद्रीच घेऊन जाते.
पुढचा क्रमांक आहे उंदरांचा. 'त्यांना मामा अस म्हणायचं, म्हणजे मग ते घरात जास्ती येत नाहीत' इति आमची आजी.  
आता तिला बहुतेक आपल्या रस्त्यावरच्या खडूस आणि लुटारू मामांविषयी  माहीत नसेल.. त्याशिवाय उंदरांचा इतका मोठा अपमान नसता केला तिनं. असो. तर उंदीर म्हणजे अतिशय खोडकर, नासधूस करणारे प्राणी आहेत असा मला वाटत.  
त्यांना पाहून त्यांची प्रचंड किळस येते.  
घरात येण्याचे सर्व दरवाजे लाकडाच्या पट्ट्या ठोकून ठोकून बंद केले आणि त्यांच्यापासून एकदाची मुक्तता मिळाल्या सारखी वाटत आहे. पण तरी गणपती आले की एखादा पिटुकला दिसतोच कधीतरी नाचताना. 'त्या दिवसात ते येणारच रे, गणपतीचे वाहन ना ते' हे शब्द आठवायचे आणि उंदीर मारण्याचे औषध जिथे मिळते, त्या जागेस भेट द्यायचे टाळायचे.  
उंदरांच्या जनगणनेवर मर्यादा ठेवायला काही प्रमाणात मांजर आणि बोके असतात च. उंदीर मिळो ना मिळो, वाड्यामधल्या एखाद्या घरी तरी दुधाचे बर्‍यापैकी भरलेले पातेले ह्यांना मिळतेच. जितका वाटा मिळेल तितक्यात समाधान मानून भूक मारायची. एखाद्या समूहगान गाणाऱ्या ग्रुप ला लाज वाटेल इतक्या सुरेल आवाजात मस्त सुरात सूर मिसळत असतात. मांजरांना भूत दिसले की ती रडतात अस ऐकलाय. पण आता ह्याच्यात काही एक तथ्य नाही हे माहीत झालंय. इतक्या वर्षात मला कधीही ह्याचा प्रत्यय आलेला नाही. येईल असा वाटत पण नाही. आलाच तर आनंदच होईल. नक्कीच शेजारचे वाळिंबे काका भेटतील.  
क्वचित कधीतरी उंदीर ह्या मांजरांच्या सहजासहजी हाती लागला तर ठीक.  जेव्हा उंदीर आपल्या नजरेस पडतो, तेव्हा ह्याच मांजराची खूप आठवण येते. पण ह्यांना बहुतेक माणसांचा गुण लागला असावा. जेव्हा त्यांची गरज असते तेव्हाच नेमकी गायब होतात. दोन मांजरींची भांडणे, कधी दोन बोक्यांची भांडणे तर कधी
मांजर आणि बोका ह्यांच्यात होणारी नवरा बायको सारखी भांडणे बर्‍याचदा नजरेस पडतात. तात्पर्य अस की ह्या मांजराचा उपयोग कमी आणि उपद्व्याप च जास्ती होतो.
ह्या सर्वांचा डॉन म्हणजे घूस. उंदराच्या सदृश दिसणारा, प्रचंड आकाराचा हा अतिशय कुरूप, महाभयंकर प्राणी. ह्याच वैशिष्ट्य अस की हा माणसाला जास्ती घाबरत नाही. एखादा भलामोठा उंदीर तुम्हाला पाहून लांब पळून जाईल. पण घूस मात्र दोन पावले मागे हटेल आणि तुमची नजर चुकतच आपल्या कामास पुन्हा रुजू होईल. हिला मारायची हिंमत पण करू नका. विचित्र आवाज काढून तुमच्यावर धावून येईल. उगाच दात लागले तर अनेक इंजेक्शन घ्यावी लागतील.  
कुत्रा चावलेला बारा म्हणायची वेळ येते असा मी ऐकलंय. उंदीर मारायचे औषध ह्यांच्यापुढे पूर्णपणे निष्फळ ठरते. उलट उंदीर मारायच्या वड्या अगदी चवीने खाताना मे दोन घुशींना पहिले आहे. ३
'घूस कधी घरात येत नाही' असा खूप ऐकले होते. पण ह्या वाक्यावरचा माझा विश्वास त्या दिवशी कायमचा उडाला.  
मी आणि माझे ३ मित्र विरुद्ध घरात घुसलेली एक घूस, अर्धा तास चाललेल्या ह्या नाट्यामध्ये तिनी पळ काढला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.  
एखाद्या नवख्या किंवा सवय नसलेल्या ला कदाचित ह्या आगळ्या वेगळ्या ''पाळीव'' प्राण्यांची खूपच किळस  वाटू शकते.  
पण काय सांगू तुम्हाला, इतकी सवय झालिये ना.. नवीन घरी जाईन तेव्हा ह्यांची सगळ्यांची आठवण नक्कीच येत राहीन..