उन्हात खूप खूप तापून रस्ता आता कातावला ,
संध्याकाळी निपचीत पडून अंधारात थोडा विसावला .
एक मुलगी आईबरोबर शाळेत होती चालली ,
शाळेत जाण्याची भीती तिच्या डोळ्यातून बोलली,
मुलगी शाळेत जातेय म्हणून आई होती हरखली,
आता घर दुरावणार म्हणून मुलगी होती रडवेली,
तिच निरागस बाल्य पाहून रस्ता सुद्धा हेलावला,
उन्हात खूप खूप तापून रस्ता आता कातावला,
संध्याकाळी निपचीत पडून अंधारात थोडा विसावला.
एक भिकारी काठावरती ठाण मांडून बसला होता,
एक बंदा रुपयासुद्धा सकाळपासून पहिला नव्हता ,
दुपारी उन्हाच्या काहिलीने भिकाऱ्याची शुद्ध गेली ,
रस्त्यावरची चार माणसं पाणी घेऊन धावत आली ,
पाणी पिऊन भिकारी थोडासा तरारला ,
माणुसकी अशी जिवंत पाहून रस्ता सुद्धा सुखावला,
उन्हात खूप खूप तापून रस्ता आता कातावला,
संध्याकाळी निपचीत पडून अंधारात थोडा विसावला.
एक मुलगा पिसाटलेल्या पावसात कुडकुडत उभा होता,
एक म्हातारा पलीकडून छत्री घेऊन येत होता ,
कुडकुडणाऱ्या मुलासाठी त्याची छत्री आजोबा झाली ,
पोहचवून त्याला घरापर्यंत समाधानाने परत आली ,
म्हाताऱ्याचा नातू होता शाळेबाहेर ताटकळला,
म्हाताऱ्याच हृदय पाहून रस्ता सुद्धा भारावला ,
उन्हात खूप खूप तापून रस्ता आता कातावला,
संध्याकाळी निपचीत पडून अंधारात थोडा विसावला.
एक तिरडी रामनामाच्या घोषात जेव्हा चालू लागली ,
रस्त्यानेही मृतात्म्यासाठी दोन मिनिटं स्तब्धता पाळली ,
जो जन्मला तो मरणारच हे जीवनाचं शाश्वत सत्य आहे ,
मृत्यू आहे म्हणूनच तर जगण्यालाही अर्थ आहे ,
आपला अमरत्वाचा शाप रस्त्याला तेव्हा जाणवला ,
आपलं अंतहीन जीवन पाहून रस्ता सुद्धा खंतावला ,
उन्हात खूप खूप तापून रस्ता आता कातावला,
संध्याकाळी निपचीत पडून अंधारात थोडा विसावला.