नशीब भाग - ७७

कॉम्प्युटर ग्राफिक्स हा विषय निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे हस्तकलेचे यांत्रिकी करण. संगणकाच्या साह्याने हे फार सुलभ झाले आहे. डोक्यात आलेले विचार जसे शब्दरूपातून मांडता येतात तसेच ते विचार रेखाकृती आकार व रंगाच्या माध्यमातून जास्त प्रभावी ठरतात, हे साधण्याकरता संगणक, आकार, रंग वगैरे गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.

कोणतीही कला शिकण्याकरता लागणारा उत्साह व आवड हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे, नेमके ह्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ह्या शाळेत दुर्लक्ष झाले होते. आवड आहे उत्साह आहे मग जाणवते की काम शिकणे व काम करणे ह्यात प्रगती करण्या करता एक शिस्त पाळणे महत्त्वाचे ठरते. ह्या शाळेत मुळातच शिक्षण एक व्यवसाय हाच उद्देश असल्याने शिस्त नावाचा उच्चार करणे म्हणजे चूक असेच मला जाणवले.

कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्या विषयाची सुरुवात ग्राफिक्स करता आवश्यक असणारा संगणक व संबंधीत उपकरणे समजून घेणे, असे अभ्यासक्रमात होते, त्या करता प्रगती पुस्तकात नोंद करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात ही माहिती शाळेला नव्हती व ह्याची आवश्यकता नाही असे त्या आय.टी वाल्या बाईने पसरवले होते. कारण मी एक फोटोग्राफर होतो व कॉम्प्युटर ग्राफिक्स विषय मला समजलेला नाही असा गैरसमज पसरवण्यात ती यशस्वी झाली होती.

शब्द आणि आकडे मोड (डाटा एंट्री) करता असणारा संगणक व ग्राफिक्स करता आवश्यक असणारा संगणक हा पाचपटीने जास्त क्षमतेचा असणे आवश्यक असताना शाळेने ते सामान्य संगणकच वापरले होते. संगणकाला विजेचा पुरवठा कायम देण्या करता वापरलेल्या यू.पी.एस. ची बॅटरी एका वर्षात बदलावी लागते ती बॅटरी तीन वर्षे झाली तरी बदल आवश्यक नाही असे एकाच मताने ठरले होते. वीज पुरवठा केव्हाही बंद होत असे व वीज जनित्र सुरू करण्यात लागणार वेळ तसेच खराब झालेल्या बॅटरी, ह्याचा परिणाम सगळे संगणक बंद होत असत. हे संगणक बंद होऊ नये ह्याचे गांभीर्य कोणालाच नव्हते. लॅन / इंट्रानेट करता वापरण्यात येणार्‍या रौटरला १२ व्होल्ट वीज प्रवाह आवश्यक असताना ९ व्होल्टचा प्रवाह तीन वर्ष पुरवला जात होता. त्यामुळे ५६ संगणकातील संपर्क अत्यंत संथ गतीने होता. सगळ्या शाळांमधून असेच असते असे सगळ्यांना मंजूर होते. कीबोर्ड व माऊस जुळणी सदोष असल्याने योग्य काम करणे अशक्य होते. मुळात कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्या प्रकारात डिजीटल टॅबलेट किंवा अंकित पाटीचा उपयोग करणे शिकणे आवश्यक होते पण त्याची आवश्यकता नाही असे ठरवणारे नग ह्या शाळेत अधिकार पदावर विराजमान होते.


संगणकांना आवश्यक असणारे विंडोज एक्स.पी; फोटोशॉप, कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर बीना परवान्याचे होते. त्यामुळे त्याचे अपडेट शक्य नव्हते, परिणाम प्रत्येक संगणक कोणत्या तरी कारणाने केव्हाही निकामी होत असे. ह्या सगळ्याचा परिणाम विषय शिकवण्या वर व शिकून घेण्यावर होत असे. १० वीच्या पूर्ण वर्गाने इतका धुडगूस घातला की त्या वर्षी ते परीक्षा देण्याच्या लायकीचे नव्हते. परीक्षेकरता लागणारे कोणतेही काम त्यांनी केले नव्हते. त्याचा परिणाम शाळेला भोगावा लागला. मग पुढल्या वर्षाकरता मला माझ्या मताप्रमाणे शिकवण्याची परवानगी मिळाली व त्याचा परिणाम दिसू लागला. पालकांना कोणत्याही कारणा करता तक्रार करण्यास जागा ठेवली नाही. प्रत्येक पालकाला एक सी.डी. दिली त्यात अभ्यास क्रम काय होता? कोणत्या महिन्यात काय पूर्ण झाले पाहिजे? दोन वर्ष आधीचे प्रश्न काय होते? त्याला गूण कसे मिळाले होते व गूण मिळण्याची पद्धत कशी वापरली होती? परिणाम परीक्षा देणारे सगळे पास झाले होते.      

पण हे सगळे सहज घडले नव्हते. नव्याने आणलेल्या संगणक नियंत्रक पदवीधराने त्याचे काम माझ्या वर ढकलण्याचे सगळे प्रयत्न केले, त्याला त्या माहिती तंत्रज्ञान वाल्या बयेने त्रास देण्यात मदत केली होती. मला विषय नीट शिकवता यावा म्हणून मी व्हिडिओ प्रोजेक्टरचा वापर सुरू केल्या वर प्रत्येक शिक्षकाने त्याचे अनुकरण सुरू केले. मग मी व्ही.एन.सी व्ह्युअर नावाचा कार्यक्रम वापरण्यास सुरू केले. त्याच्या साह्याने माझ्या संगणकातून मी प्रत्येक संगणकावर मला काय शिकवायचे होते ते दाखवत होतो व प्रत्येक संगणकावर काय घडत होते ते बघत होतो. त्याला बंद पाडण्याचे सगळे प्रकार त्या संगणक नियंत्रकाने वापरले होते. परिणाम असा झाला की मी सरळ परीक्षेच्या  एक महिना आधी राजीनामा दिला. व सरळ मुख्याध्यापकाला सांगितले मला त्रास कसा झाला ह्याचा अनुभव तुम्ही घ्या. पालकांना परीक्षेची सगळी आवश्यक माहिती आधीच दिल्याने त्यांना त्रास झाला नव्हता.

एकदा शाळेच्या मुख्य अधिकार्‍याने एक अहवाल मला नीटनेटका करण्या करता दिला व त्याचे पी.डी.एफ. करून मागितले होते. साहजिकच त्याचे वाचन करणे गरजेचे होते. नवीन शाळा सुरू करण्या करता काय आवश्यक आहे व शाळा सुरू करण्यात भांडवल किती लागेल व त्यातून दर वर्षी कसा फायदा मिळेल असा तो अहवाल होता. प्रथम वर्षाला पन्नास विद्यार्थी संख्या असताना पाच कोटी चे कर्ज सहन करावे लागेल, पण वर्ष दोनला पाच कोटीचा फायदा होईल तर पाचव्या वर्षी विद्यार्थी संख्या ५०० झाल्या वर एकूण खर्च कमी होऊन फायदा ४० कोटीच्या आसपास असेल असा तो अहवाल होता. त्या अहवालामुळे शिक्षण हा किती मोठा धंदा आहे व तो धंदा चालवणारे कसे आहेत हे मी समजू शकलो, नशीब माझे!! मग कळले हे मला समजून उपयोग काय, पालक पुन्हा प्रमाण पत्राकरता असेच मार्ग शोधणार !!!!

परदेशी शाळा आणि त्यांचा भोंगळ कारभार हे जवळून अनुभवण्याचे माझ्या नशिबी होते हेच खरे.