भ्रष्टाचार व महागाई यांच्या विवाहाचे निमंत्रण

चि.  भ्रष्टाचार व चि.  सौ.  कां.  महागाई यांच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका
(श्री विवस्वान हेबाळकर,  जळगाव यांच्या कल्पनेवर आधारीत मूळ पत्रिकेत थोडे बदल करून)
( आजकाल कोणाच्या भावना कशाने दुखावतील आणि केव्हां कोणाचा हक्कभंग होईल ते सांगता येत नाही त्यामुळे असे कांही झालेच तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती. )
१६-८-२०११ रोजी नवी दिल्लीत हा सोहळा साजरा करायचे ठरले होते.  श्री.  अण्णा हजारेंचे शांतताप्रेमी समर्थक अनायासे तेथे स्व खर्चाने जमणार होते.  तेव्हां गर्दीचे लोभी नेतागण या विवाहाला गर्दी करून हा विवाह 
सोहळा एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवतील व वधुवर कुटुंबियांचे कोटकल्याण करतील असा धूर्त डाव त्यामागे होता.  पण झाले भलतेच!  या सोहळ्याचे अण्णा समर्थकांनी तीन तेरा वाजवले.   त्यानिमित्त येऊ इच्छिणाऱ्या 
नेत्यांना घराबाहेर पडणेही मुष्किल झाले.  त्यामुळे हा सोहळा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलला गेला आहे.  असे असले तरी,  संधीची वाट पाहत व्याहीजन थांबले आहेत.  आपण गाफिल राहाता कामा नये म्हणून मूळ पत्रिका 
मुद्दाम खाली देत आहे.  कंसातील मजकूर आमचा.  ती पुन्हा कोठे आढळल्यास सार्वत्रिक गदारोळ करावा.
॥लोकशाही ( ठोकशाही म्हणत नाही हे ध्यानी घ्यावे ) प्रसन्न ॥
अगदी कोपरापासून दंडवत,  वि.  वि.
आमच्या येथे लोभी जनांच्या कृपेने आणि (भ्रष्टाचाराधिष्टित म्हणत नाही) सरकारच्या आशिर्वादाने
चि.  डॉ.  भ्रष्टाचार [ पी. एच. डी (लाल्या विद्यापीठ,  पाटणा)]
श्री हृदयशून्य काळाबाजारवाले व सौ.  सारा काळाबाजारवाले यांचे  अनिष्ट पुत्र
यांचा अशुभ विवाह
चि.  सौ.  कां.  महागाई [ बी. ए. (सोन्या विद्यापीठ,  नवी दिल्ली)]
अप्रसिद्ध (पण कुप्रसिद्ध) व्यावसायिक श्री सराईत दरवडेखोर व सौ.  अवदसा दरवडेखोर यांची लाडावलेली लेक
हिजबरोबर ------ रोजी काळ्या रात्री १२ वाजून १३ मिनिटे या HMT मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन वधुवरांच्या ( खरे तर कानाखाली वाजवून) शुभ आशिर्वाद द्यावेत ही आग्रहाची विनंती.
आपले नम्र (खरे तर नंबरी)
समस्त काळाबाजारवाले आणि दरवडेखोर परिवार
वडिलांचे विनंतीस मान देऊन अगत्य यावे
आपले
श्री व सौ.  अट्टल भामटे,  श्री व सौ.  मा.  रा.  जोडे,  श्री व सौ.  गेंडाजी कातडे,  श्री व सौ.  दसनंबरी निलाजरे,
श्री व सौ.  भ.  रा.  खिसे,  श्री व सौ.  क.  र.  बुडवे.
आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं!
आपले
चि.  चोरटा,  खोटारडा,  कुमारी लबाडी आणि निलाजरी
विवाहस्थळ :- जुगार पॅलेस,  मटका गल्ली,  भाववाढ मार्ग,  सट्टाबाजार सराई,  नवी दिल्ली.
ताजा कलम-वधुवरांकडील बहुतेक ज्येष्ट नातेवाईक नव्या दिल्लीत असल्याने हा सोहळा मुद्दाम तेथे ठेवला आहे त्यामुळे अनुपस्थित राहाण्यास
कोणतीही सबब चालणार नाही असे प्रेमाने सांगावासे वाटते. आपली उपस्थिती हाच आहेर कारण कोणतेही आहेर कसे द्यायचे हे सूज्ञास सांगणे नलगे.