प्रगती एक कोडे

माझ्या लहानपणी मी प्रगती एका मुलीचे नाव ऐकले होते. मुलीचे नाव प्रगती कोणत्या कारणा करता असते हे अजूनही मला समजून घेण्यास आवडेल. पण मग प्रगती पुस्तक आणि त्या बरोबरीने मिळालेला खरपूस मार ह्याची  ओळख झाली. त्यानंतर मार चुकवण्यात मी प्रगती केली असे माझ्या आईने मत व्यक्त केले पण ते फक्त एकदाच! आई मात्र तिची प्रगतीची व्याख्या न सांगता सोडून गेली. इतरांनी प्रगतीचा गोंधळ माजवण्यात भरपूर प्रगती केलेली मी आजही अनुभवतो आहे.

फार पूर्वी पालक आपल्या पाल्याला सात वर्षा पर्यंत घरगुती संस्कार करून पाल्याची प्रगती करण्यात सक्षम होते ते मी अनुभवले होते. तसेच आधुनिक शिक्षणाने भारलेल्या पालकांनी जनावरांचे उदाहरण समोर ठेवत आपल्या पाल्याला चालता, फिरता, बोलता होताच शाळा रुपी कारखान्यात स्व खर्चाने कोंबण्यात फार अनमोल का कवडीमोलाची प्रगती केली आहे हे पण मी आज अनुभवतो आहे. सोनुल्याचे / सोनुलीचे बेशिस्त, बेताल वागण्याचे चार चौघात कौतुक करण्यात आई म्हणवून घेणार्‍या बाईने प्रगती केली आहे. सोनुल्यावर / सोनुलीवर संस्कार करणे हे कुठल्याशा मानसशास्त्राप्रमाणे मागासलेले आहे असे मान्य करण्यात बर्‍याच महिलांनी प्रगती केलेली आहे. 

सातवी पास झालेल्या बर्‍याच पालकांनी विविध व्यवसायात फार चांगली प्रगती केली होती व आहे. पण आज सातवी पास होणारे काही महाभाग प्रश्न पत्रिकांच्या धंद्यात प्रगती करीत आहेत. माध्यमिक शिक्षणात तर बेस्ट ऑफ फाइव्ह चा घोळ घालण्यात शिक्षण तज्ज्ञांनी प्रगती केली आहे. महाविद्यालयीन शिक्षणात तर कल्पना करता येईल तितके विषय आणि त्यांचे घोळ वाढवण्याची फार मोठी प्रगती होते आहे. शिक्षण, त्याचा रोजच्या जीवनाशी संबंध नसणे आणि ज्ञानातील अंतर वाढवण्यात फार चांगली प्रगती झाली आहे व रोज प्रयत्न होत आहेत.

महिलांनी समहक्क समजण्यात चांगली प्रगती केली आहे. समहक्क वापरण्यात मात्र बर्‍याच अंशी गैरसमजूत करून त्याचा फायदा घेण्यात बरीच जास्त प्रगती केलेली आहे. विविध कार्यालयातून महिला असण्याचे फायदे उकळण्यात त्या महिला / मुली प्रगती करीत आहेत. मोठ्या प्रमाणात मुले मुलींची लग्ने मोडण्यात कल्पकता दाखवण्याची प्रगती करीत आहेत. कोणी होणार्‍या सासरला एस.एम.एस. करून मुलीच्या चारित्र्याचा प्रश्न उभा करून लग्न मोडण्यात समाधानी आहेत, तर नवरा होण्या आधी किंवा नंतर अडवून मोठी रक्कम, मोठी वस्तू बळकावण्यात मग्न आहेत. बर्‍याच मुली सासरच्या ज्येष्ठांना फोटो फ्रेम, फर्निचर व कचर्‍याच्या टोपल्या संबोधण्यात प्रगती करीत आहेत. बर्‍याच सुना मूल जन्माला न घालता आपल्याच सासु्सासर्‍याला मुलगा / सून असल्या सारखे वागवण्यात झपाट्याने प्रगती करीत आहेत. तसेच काही सासू, सासरे, मुलगा, नणंदा घरात आलेल्या सुनेची विल्हेवाट लावण्याचे नवीन घाट घालण्याची प्रगती करीत आहेत. मग काही मुलींच्या माहेरच्यांनी सासरच्यांना लुटण्यात किंवा कारावासात पाठवणारे नवीन मार्ग शोधण्यात प्रगती केली आहे.

ज्या समाजातील एकेक घटक अशी प्रगती करीत असेल तर समाज पण प्रगती करणार हे ओघानेच आले. समाज एकसंध होण्या ऐवजी विखुरण्यात प्रगती करीत आहे. ज्यांचे पूर्वज ह्या समाजात ह्या भूमीवर पोसले होते ते आज स्वार्थ साधण्या करता किंवा तलवारीच्या धारेवर जात धर्म बदलून ह्या समाजाची व त्या संस्कारांची चिरफाड करण्यात प्रगती करीत आहे. मागासलेपण ही शिवी आहे, शाप आहे हे न समजणार्‍या घटकांच्या मागासलेपणाला मान्यता व पुरस्कार देण्यात झपाट्याने प्रगती झाली आहे. आज समाजात मागासलेपणाचे शिक्षण देऊन / घेऊन शिक्षिताला मागासलेपणाच अभिमान असण्याची प्रगती झाली आहे. "अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे" काय किंवा "वासरात लंगडी गाय शहाणी" ह्या म्हणी किती योग्य आहेत हे सिद्ध करण्यात अफाट प्रगती झाली आहे. सखोल अभ्यास करणे म्हणजे किंवा अभ्यासक असणे हे खोल खड्ड्यात झोकून देणे असे सिद्ध करण्यात छान प्रगती झाली आहे. नसलेल्या सौंदर्यावर किंवा बुद्धीवर स्वस्त दराचे मुलामे फासण्यात प्रगतीचा उच्चांक गाठण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पण खरं सांगू हे असले मागासलेले, पुरोगामी माझे विचार मी लिहिण्यात प्रगती केली आहे ह्याची मला जाण आहे, नव्हे अभिमान आहे, कारण मी जरा हटके आहे.

शिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश हा मोक्याच्या जागा बळकावण्यातच आहे त्यात प्रगती झालेली आहे. त्या मोक्याच्या जागा मिळवून टेबला खालची संपत्ती वाढवण्यार्‍या विविध मार्गांची प्रगती झाली आहे. पोलिस यंत्रणा ह्यात तन मन धनाने कार्यरत असण्यात प्रगती करीत आहेत. ज्यांना स्वतः:च्या अब्रूची काळजी आहे अशांना बकरे बनवून खोटे आरोप पत्र, करावास घडवण्यात व त्यातून संपत्ती गोळा करण्यात पोलिस व कायदे पंडित प्रगती करीत आहेत. बारबालांचा धंदा बंद करण्याचे नाटक करून नट नट्यांचे सगळ्यात कमी कपड्यातील अंगविक्षेप बघण्यात व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात प्रगती होते आहे. ज्या नेत्यांनी असले कायदे तयार केले तेच नेते अशा कमी कपड्याच्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी देतात ही पण एक प्रगती आहे, बेशरम होणे ही एक प्रगतीच आहे.

परंपरा जोपासण्यात आम्ही मागे नाही, अत्याधुनिक चार चाकीतून प्रवास करताना बैल गाडी परंपरेचा विसर पडू नये म्हणून रस्ते बांधणीत खास प्रगती झाली आहे, म्हणूनच "लालडब्याची" आधुनिक बैलगाडी करण्यात आम्ही प्रगती केली आहे. रेल्वेच्या गाडीला प्रगती नाव दिले खरे पण अपघात वाढवण्यात, मृतांची संख्या व मालमत्तेचे नुकसान वाढवण्यात प्रगती होते आहे. भोंगळ कारभाराचे प्रतीक म्हणून हवेत मिरवणार्‍या महाराजाला आम्ही भिकारी बनवण्यात प्रगती केली आहे.

गैर सरकारी संस्थांनी (एन.जी.ओ.) वैचारिक गोंधळ माजवण्यात प्रगती केली आहे. ह्या महानुभावांनी देशात घडणार्‍या जनतेच्या हिताच्या प्रत्येक योजनेत गतिरोधक तयार करण्यात प्रगती केली आहे. काही महानुभावांनी तर मानवी हक्क (एका संप्रदायाचे?) ह्या नावाचा गैरवापर करत खुन्याचा सत्कार करण्याची प्रगती केली आहे. सत्याग्रहाला असत्त्याग्रह ठरवण्यात व सोयीस्कर उलट अर्थ लावण्यात प्रगती झाली आहे. घरभेदी बनवण्यात व त्याचे नवीनं मार्ग वापरण्यात काही महानुभावांनी प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. घरभेद्यांना व समाजात फूट पाडणार्‍यांना मान्यता, पुरस्कार देण्यात सरकारने खूपच प्रगती केली आहे.

वाचक हो "इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया"!!!