अंधेर नगरी चौपट राजा

अंधेर नगरीत एका महान योगिराजाचे आगमन झाले.

चौपट राजाने त्यांचे अत्यंत इतमामाने स्वागत केले.

योगिराजांना भूत भविष्य, वर्तमान,   त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती.

राजाने त्यांना सन्मान पूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले.

योगिराज क्षणात समाधिस्थ झाले.

जागृत होताच त्यांनी चौपट राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे. प्रजा तुझ्या कुशासनाला अतिशय कंटाळली आहे. तुझ्या दरबारात सुद्धा षडयंत्र शिजत आहे.   काही लोक तुझे सिंहासन उलथून पाडण्याची स्वप्ने बघत आहेत. "

राजा हादरला.

यथोचित बिदागी घेऊन योगिराज मार्गस्थ झाले.

राजाने त्वरित सर्व संशयितांना जेरबंद केले.

वरून प्रजेत कुणीही स्वप्ने बघू नयेत असा आदेश काढला.

राज्यात एकच कल्लोळ माजला.

लहान मुले सर्वात जास्त अस्वस्थ झालीत. अभ्यासाचा ताण आणि मोठ्यांच्या रागावण्याकडे दुर्लक्ष करून सुखस्वप्नात रंगून जाणे  हाच त्यांचा एकमेव विरंगुळा होता.

आता त्यांची चिडाचीड अन रडारड सुरू झाली.

आई बापांना सुद्धा आपली कारटी पुढे जाऊन आपला सांभाळ करतील अशी स्वप्ने दिसेनात. ते ही निराश झाले.

म्हाताऱ्या कोताऱ्यांना आयुष्यात एकदा तरी तीर्थयात्रा ( काशी, रामेश्वर अथवा युरोप, अमेरिका  काळानुरूप ) घडेल अशी स्वप्ने दिसेनाशी झालीत, ती ही कातावून नवीन पिढीच्या नावाने कडाकडा बोटे मोडून उरलेले दिवस कंठू लागली.

निम्नवर्गीयांचे मध्यमवर्गीय होण्याचे अन मध्यमवर्गियांचे उच्चवर्गात शिरकाव करण्याचे व उच्चवर्गीयांचे निरंकुश सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न भंगले.

सर्वात खालची निर्धन प्रजा तर अनादिकाळा पासून आपल्याला नाही तर आपल्या मुलाबाळांना तरी पोटभर जेवण मिळेल ह्या स्वप्नांच्या भरवशावर पिढ्यानपिढ्या अर्धापोटी जगून मरून जात होती, त्यांचा तर शेवटचा आधारही खुंटला.

त्यांना आता भयाण वास्तव दिसू लागले.

प्रजेने बंडाचे निशाण उभारले.

सर्वत्र अराजक माजले.

विदेशी शक्ती तर अशा संधीची वाट पाहत टपून बसलेल्या होत्याच.

शत्रुराष्ट्राने आक्रमण केले.

चौपट राजाचा पाडाव झाला.

त्याला कठोर शासन करण्यात आले.

नवीन राजाने राज्यारोहणानंतर लगेच स्वप्ने बघण्यावरची बंदी उठवली.

उलट तो स्वतःही प्रजेला मोठमोठी स्वप्ने दाखवू लागला.

नवीन राजा अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला.

सर्वकाही सुरळीत झाले.

प्रजा पुन्हा सुखस्वप्नात तरंगू लागली.

नवीन राजानेच नव्हे तर त्याच्या घराण्यानेही चिरकाल सुखेनैव राज्य केले.

( समाप्त )