ऐतिहासिक पुणे

मला ऑफिसला जाताना जाणवले की ऐतिहासिक पुणे हे अजूनही ऐतिहासिकच आहे.

मी जेव्हा ऑफिसला बाइकवरून जात होतो तेव्हा मला अचानक वाटायला लागले की मी बाइकवर नाही  घोड्यावर बसलेलो आहे. त्याला कारणही तसेच होते. एकतर पहाटेची ड्युटी असल्याने
सर्वत्र अंधार होता आणि आपल्या कर्तव्यदक्ष सरकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी
साडेपाचलाच स्ट्रिटलाईटस बंद केले होते. त्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यांचा
अंदाजच येत नव्हता. या खड्ड्यांमुळे माणूस गाडीवर सारखा उडत राहतो. हळूहळू त्या उडण्यातसुद्धा एक प्रकारची लय निर्माण होते आणि त्याला घोडेस्वारीचा फील येतो.  आहे की नाही गंमत ?

या विचारांबरोबर मला आणखीही काही जाणवू लागले, माझ्या डोक्यावरचे हेल्मेट मला शिरस्त्राणाप्रमाणे भासू लागले. अंगातले जर्कीन मला चिलखताप्रमाणे वाटले. फार काय माझ्या खिशातला माझा मोबाईल म्हणजे तलवार तर नाही ना याची सुद्धा मी खात्री करून घेतली.

या प्रसंगामुळे आपल्या सरकारने पुण्याचा जो ऐतिहासिकपणा जिवंत ठेवला आहे त्याची मला जाणीव झाली. अशा या सरकारचे, या सिस्टिमचे आभार कोणत्या शब्दात मानवे हेच कळत नाही.

जय भवानी !!! जय शिवाजी !!!

हर हर महादेव !!!