सुंदर व्हायच मला!

उदय जोशी तसा अजब प्राणी. अजब म्हणजे, जे मनात आलं ना! ते करून मोकळं व्ह्यायचा बस्स! जग काय म्हणेल?, आपल्याला शोभेल का नाही, ह्या फालतुक भानगडीत तो कधी फारसा पडतच नव्हता. वय वर्ष बेचाळीस पण निवृत्तीला आल्या सारखा दिसायचा. साडे पाच, पाच फूट उंचीचा अंगाने गोल मटोल डोळ्यावर काळ्या काडीचा जुना चष्मा. जे काय ईश्वराने केस ठेवले होते तेही पांढऱ्या रंगाचे. डोक्यावर तर केस नव्हतेच पण, जे होते ते सुद्धा लटा ( जटा मुद्दाम नाही म्हणालो)वाढवून ठेवायचा. जरी नावाने जोशी होता म्हणून काय झालं?, रंग तर असा की कोळसा लाजावा.   आता विचार करा हा  असा प्राणी जेव्हा त्याच्या त्या जुन्या लॅंब्रेटा वरून कार्यालयाच्या आवारात शिरायचा तेव्हा एखादं बीना सोडीच हत्तीच पिलू सर्कशीतून चित्कारत आल्या सारखा वाटायचं. खरतर एका कार्यालयात एका आडनावाच्या दोन व्यक्ती असल्या तर कार्यालय त्याच नवीन बारस करत पण हा एकमेव जोशी तरी देखिल आमच्या खात्याने त्याच काळा जोशी म्हणून बारस उरकवून घेतल होत म्हणजे बोलण्याच्या ओघात तो नाही का जोशी ऽऽ, अरे आपला काळा जोश्या!, की लगेच हा प्राणी डोळ्यासमोर ऊभा राहयचा.
                    एक दिवस रागारागात मला भेटला आणि म्हणाला"खूपं झालं!, बस्स! आता एकदम स्मार्ट(सुंदर) आणि हॅंडसम दिसायच.   साल परवा गल्लीतून निघालो तर पोर माघून आवाज देत होते 'ए गणपती! ' आणि माझ कार्टं... तोंडवळवून दुसरी कडे पाहत होत!. काही नाही आता एकदम डायनामिक पर्सनलीटी (व्यक्तिमत्त्व) डेव्हलप करायची. " एकदा एखाद्या गोष्टीने घर केलं की मग ती कल्पना सत्यात उतरावयाची. मला ही त्याची सवय माहीत होती. मी मनात म्हणालो 'आता काही खरं नाही! '. त्याला उगाच धीर द्यायचा म्हणून म्हणालो,
 " जाऊ द्या हो जोशी!, एवढं काय मनावर घेताय?, पोर ढोल्या गणपतीच म्हणालीत ना!. आता आहे तर आहे खेद काय वाटायचा? "
"जाऊ द्या काय?. " दोन क्षण मध्ये थांबत, " बाकी तुमचं बरोबर आहे म्हणा!...., काय? म्हणजे तुम्हाला हि असच वाटत की मी.. "
"काय? " शांत पणाने मी विचारलं. आता मनी नसताना माझ्या कडून फिरकी घेतली गेली होती आणि आणि ती त्याच्या ध्यानी आली देखिल खरं तर मला लाजल्या सारखं व्हायला हवं होत पण, आता आहे तर आहे! म्हणाल्यावर तो बापडा तरी काय बोलणार बिचारा.  
                   कार्यालयात बसून काम करणं आता जड झालं होत त्याला. कशी बशी दुपार काढली आणि दुपारच जेवण आवरून बाहेर पडला तो सकाळीच येण्या करता( तसा आमच्या कार्यालयाचा रिवाज आहे आला तर आपला नाही तर घरचा म्हणून म्हणालो ). आमच्या खात्यात हे बरं आहे टेबलावरचा माणूस कुठे गेला तर साहेबांनकडे,  आणि साहेबांनी विचारलं तर बँकेत , मग तो माणूस कार्यालयीन कामकाजाच्या नावावर काहीही चकाट्या पिटो त्याला कोणीच वाली नसतो, म्हणूनच की काय पवार बाई आठवड्यातून एकदा बँकेच्या नावाखाली ब्यूटीपार्लरला जात असता. त्यांच्या सौंदर्याच गुपितं जोश्याला कळल्यावर मग काय?  जोश्याला मार्गच सापडला. सुंदर होण्याचा! तरीच जोश्या जेवणा अगोदर पवार बाईंच्या टेबलावर टेंन्डर फाइल घेऊन बसला होता.
                   दुसऱ्या दिवशी जोशी नेहमी प्रमाणे कार्यालयात आलाच नाही. त्यामुळे कार्यालय कस चुकल्या चुकल्यासारखं झालं. आज सोनार साहेबांच्या माघे माघे आपल्या पोटाचा घेर सावरत काळी भिन्न आकृती आयुक्तांच्या कक्षात घुसणार नव्हती की सतत चहाच्या टपरीवर कोणाची 
नजर जाणार नव्हती. कसा काय घडवला होता देवाने त्याला कोण जाणे? कार्यालयात जरी एखादा विनोद घडला तरी हा आपला मख्क चेहऱ्याने पाहत बसायचा आणि ह्याला पाहून बाकीचे हसायचे, मग एकदा का हसायला लागल्यावर काही केल्या थांबायचा नाही. आपलं अगडबंब पोट हातानी धरत हॅऽऽ. हॅऽऽ. आ. हाऽऽ. हाऽऽऽऽ करत एका सुरात हसायचा. दिवसातून एकदा तरी ही वेळ यायचीच आणि, नाही आली तरी कार्यालयात कोणी ना कोणी ही वेळ आणायचंच आणायचं. एकदा संबंधित टेबलावरच्या लोकांना आयुक्त साहेबांनी आत बोलवलं  आणि झाप झाप झापलं त्या वेळेस ह्याचा नेमका टेबल त्या कटकटीतून सुटला होता. साहेबाच्या कक्षातून सगळे वैतागात बाहेर आलेले आणि तेवढ्यात कार्यालयाच्या कुंपणा बाहेर गलका झाला म्हणून आम्ही उठून पाहायला गेलो तर काळा कुट्ट, गोलमटोल जोशी एका हाताने आपली पँट वर ओढत जीव काढून पळत होता आणि त्याच्या माघे ऍऽऽउ ऽ हॅऽऽऽऊ ऽ करत एक गाढव पळत होत. कसा बसा आम्ही जोश्याला ओढला आणि ते गाढव सरळ त्याच्या अंगावरून पुढे निघून गेलं. मी न राहवून विचारलं, " काय हो जोशी!, काय केलं अस की चक्क गाढव माघे लागल? " एवढ्या धापा टाकता टाकता लाजला बिचारा!  , आम्हाला भलताच संशय आला ना! तसं उपद्व्यापी बाळ होत. नंतर माघाऊन समजलं हा पठ्ठ्या कोणाशी तरी फाइलच्या संदर्भात ( इथे देवाण घेवाण लक्षात घ्या म्हणजे झाले! ) बोलण्यासाठी चहाच्या टपरीवर गेला होता तर तिथे आमच्या कार्यालयाच्या तुकारामाने त्या झाप झाप वैतागात त्या बाहेरच्या गाडीवर चहा पिता पिता गाढवाच्या पाठीवर बिडी विझवली आणि ते गाढव केकटत पळत सुटलं ते थेट जोश्याच्या माघे. बाकी काही असो सगळ्यांच्या मनावरचा ताण मात्र कमी झाला त्या दिवशी.
                 दुसऱ्या दिवशी पण जोश्याची दांडी काही फोन नाही, निरोप नाही म्हणाल्यावर त्याल भेटून येण्याची जवाबदारी माझ्यावरच आली काय करणार माझ्या घराच्या रस्त्यावरच घर होत त्याच आणि मनापासून जाव अस वाटत होत नाही तर कार्यालयातून एखाद्या शिपायाला देखिल पाठवू  शकलो असतो.
                 संध्याकाळी त्याच्या घरी जातांना थोडा विचारातच होतो. तशात त्याच्या घरी पोहचलो तर जोश्याचा मुलगा बाहेर मित्रांबरोबर गप्पा मारत एका कट्ट्यावर बसला होता.   घरातून मिक्सरच्या घर घरण्याचा आवाज येत होता. बहुदा तो देखिल जोश्याच्या सासुरवाडचा   असावा म्हणुनच की काय? आली लग्न घटिका समीप ह्या चालीवर फक्त घटिका हा शब्द गाळून आली घटिका समीप काहिश्या अश्या सुरात फिरत होता,  एका बाजुला एवढ्या घर घर मध्ये रेडिओ  किंचाळत होता. मी दारा वरची बेल वाजवली आतून सौ.  जोशी  एवढ्या गलक्यात आता कोण आलय कडमडायला काहीश्या अशा स्वरात ओरडल्या
"कोण आहेऽऽऽ? "
 तो स्वरच असा काही होता की दोन क्षण मी माझे नाव विसरतो की काय?, असे मला वाटले पण स्वतःला सावरत आणि शक्य तितक्या नम्रतेने मी म्हणालो, " मी फाटक! जोशींना भेटायला आलोय! ". मला वाटल माझ आडनाव ऐकल्यावर त्या म्हणतील फाटक आहे तर या ऊघडून. पण तस काही झाल नाही एक मात्र घडल की घरातले सगळे आवाज गप्प झाले, अगदी रेडिओ सकट!. तेवढ्या शांततेची सवय बहुधा त्या घराला नसावी म्हणुनच की काय दारावरची कडी करकरत निघाली.
"या!, या ना आत!, आहेत ते" जोशी वहिनी सोज्वळतेने म्हणाल्या. मघाच्या स्वरात आणि आत्ताच्या स्वरात खुपच फरक पडला होता, बाकी सरडे रंग बदलतात हे काही मी प्रत्यक्ष पाहीले नाही पण व्यक्ती, व्यक्ती सापेक्ष स्वर आणि रंग दोघेही बदलतात ह्याचा प्रत्यंतर मी पावलो पावली घेत असतो त्यातला हा एक साक्षातकार. त्यांच्या साक्षात्काराने सावरत मी सोफ्यात सामावणार तेवढ्यात वहीनी म्हणाल्या.
" हे तर काही बाहेर येऊ शकत नाही बहुधा आपण त्यांना आतल्या खोलीत भेटा. " तसा माझा आणि वहिनींचा परीचय होता म्हणून बरच झाल.
                मला त्या आतला रस्ता दाखवत जोशी ज्या खोलीत होता त्या खोलीत घेऊन गेल्या " आपण बसा मी आलेच! " म्हणत मला खोलीच्या दारा जवळ पोहचवून त्या माघारी वळल्या सुद्धा. मी आपला " काय जोशी बुवा? " करत आत घुसलो खरा, पाहतो तर काय?, एवढ्या मोठ्या डबल बेडवर चारी बाजुने लोड लावलेले डोक्याजवळ उश्या आणि त्यावर पहुडलेला जोश्या. त्यातल्याच एका लोडवर जोशी दाराकडे तोंड करून पाय ठेवून लोळला होता.   मला पाहताच मोठ्या कष्टाने "या!.. या!  " करत कसाबसा ऊठणार तोच वहीनींचा प्रवेश खोलीत झाला.
हातातला पाण्याचा पेला घाई घाईने माझ्या हातात देत त्या जोश्याला म्हणाल्या. " ओऽ अ! राहू द्या आता आणखीन नका उठु! "  एखाद्या
आज्ञाधारक बालकाप्रमाणे जोशी लगेच एखादी चादर गादीवर पसरावी त्या थाटात जोशी पसरले देखिल अस्ताव्यस्त. हा सगळा प्रकार अजबच होता दोन दिवसापुर्वी चालणारा फिरणारा माणुस असा अवघडलेल्या अवस्थेत पाहावा लागायचा म्हणल्यावर, न राहवून मी विचारल
" कुठे लागलय का?,  मुका मार वगरे  "
" कोणाला? " जोशी वहीनी म्हणाल्या. अश्या परीस्थीतीत स्त्रीयांची विनोद बुद्धी शाबुत राहते? माझेच मला आश्चर्य वाटले.
"अहो कोणाला म्हणजे?, जोशी साहेबांना! " मी भाबडे पणा ने म्हणालो.
" अहो फाटक साहेब... " एवढ जोशी बोलत नाही तोव्हर जोशी मध्येच कण्हत (मला विव्हळत म्हणायच होत खर! ) पटकन बायोकाला म्हणाला " अग जा! ऽऽसाहेबांसाठी चहा टाक ऽ. आऽऽ मी बोलतो"
" काही नको झाले तेवढे पुरे! मी सांगते त्यांना सविस्तर. चांगले आठ दिवस लागतील सुट्टीचे बरे व्हायला!. "
"काय झाल? " म्हणत जोशी वहीनींनी सांगायला सुरवात केली
"दोन दिवसा पुर्वी हे कार्यालयातून घरी आले तेच मूळी न्हाव्या कडे जाउन आपल्या लटा कापून आले मला आश्चर्य वाटल! की रोज मी माघे लागते की ह्या लटा कमी करा कमी करा पण ऐकेल तर शपथ! पण परवा माझी बहीण काय बोलली चेंज करा म्हणून तर ह्यांनी असा काही चेंज केला की आता कीमान आठ दिवस तरी कपडे चेंज करायची ताकत ह्यांच्यात उरली नाही. अहो!, न्हाव्याकडून घरी आले थोडा वेळ घरात थांबले. ती कोणती पुडी आणली होती ती गरम पाण्यात कालवली डोक्याला थापली. एका तासाने परत धुतली आणि घरातलेच कपडे चढवून पलीकडे जाऊन येतो म्हणून गेले ते तास भर उलटला तरी ह्यांचा पत्ता नाही. काय कराव ह्या विचारात मी आणि मुलगा असतांनाच त्याचा एक मित्र धावत धावत आला त्यानी सांगितल हे पलीकडच्या चौकातल्या तालमीत गेले होते ह्यांच्या जन्मात तरी ह्यांनी तालीम नावाची वस्तू पाहीली होती का आतून? काळी की गोरी ते. तीथे उताणे पडलेले. तिथे जाऊन शेखर पाहतो तर काय लाल लंगोटवाले आजुबाजुला आणि त्यांच्यात हे आई गं! ऽऽ आऽऽ करत पडले होते. "
"ठीक आहे तु जा चहा टाक झाल तेवढ पुरे, तू चहा टाक. फाटक साहेबांबरोबर मी ही घेईल अर्धा! " जोश्या आपली  कमरेवरची शिल्लक वस्त्र वाचवत म्हणाला, नाही तरी बायकोने उघडा केलाच होता. ह्या बायकांच हे फार विचित्र असत त्यांना जगातले सगळे पुरुष बुद्धिमान आणि आपला तो बावळट हे नेमक आपला मित्र आल्यावर कस आठवत कोण जाणे?
"हो तर! चहा टाकायला मी केव्हाच, फक्त आता वाढवावा लागेल एवढच!, आणते. तुम्हाला सांगते भावोजी.. " साहेबांवरून डायरेक्ट भावोजी म्हणाल्यावर मला ही थोड सैल झाल्यासारख झाल मी काही बोलणार तेवढ्यात काकुळतीला येत जोश्या म्हणला,
"चहा आणल्यावर हं!, आता थोड एकट सोड, मग तू बोल हंऽऽ. आण, चहा आण!. "
 " हो कळल जातेऽऽऽ.  ! म्हणे तालमीत जाताय साधी शिळ जरी घातली तरी दहा वेळा छातीचा भाता वर खाली होईल आणि म्हणे.. "
" अग.. ( मनात कदाचीत माझी आई म्हणाला की काय देव जाणो). " जोश्या गहिवरायचाच बाकी राहिला होता.
 " काय जोशी बुवा काय करून घेतल हे! " वहिनी गेल्यावर मी म्हणालो.
" काय सांगू फाटक?, झाल! आता एवढच बोलू शकतो! " जोशी म्हणाला.                    
" पण हा खटाटोप कश्यासाठी? "
" काय करणार फाटक?, साल जो बघतो तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघतो. तोंडावर कोणी बोलत नाही, मात्र माघून सगळे हसतात थट्टा
उडवतात. सांगा ना माझा काय दोष आहे? मी गोलमटोल आहे हा दोष माझा मान्य पण रंग कोणाचा कोणता असावा ह्यावर कोणाचा अधिकार आहे सांगा बर?. " जोशी पोडतिडकीने बोलत होता.
"मग हे तालमीच खुळ का डोक्यात घातल जोशी? बर जाऊ दे.. " एवढ्यात " मी सांगते ना!, " म्हणत जोशी वहीनींनी खोलीत पुनर्प्रवेश केला. चहाच्या कप हातात देत  त्या म्हणाल्या " परवा आमची सरू आली  ना तीने सांगितल आणि मग काय घेतल मनावर. एका दिवसात बारीक व्हायला निघाले अहो एका दिवसात म्हणे तालमीतली सगळी शस्त्र वापरून टाकली. हापत हापत काय ते मेलऽऽ वजन उचलायला गेले
तर आजुबाजुचे म्हणताय काका एवढ नको, एवढ नको!, पण कोणाच ऐकल तर शपथ्थ!, कण्हत कण्हत, कस बस उचलल आणि, घेतल छाताडावर पाडून!. अंगाला मास होत म्हणून बर नाही तर बरगड्यांचा खुळ खुळा झाला असता ना!. अहो आज तरी बर आहे, निदान उजव्या डाव्या बाजूला वळतात तरी  तालमीतून पोरांनी घरी आणल तर अंगाला हात जरी लागला तरी हुळहुळायचे. " एकादमात वहीनींनी जोश्याच वस्त्र हरण केल आणि अगोदरच काळा असलेला जोश्या लाजेने काळा ठीक्कर पडला एवढा की डोक्याला लावलेल्या काळ्या कलपाचे ओघळही त्यात विरून गेले.
                आता जोश्याची केविलवाणी अवस्था पाहवत नव्हती. मी कार्यालयात बर नाही म्हणून सांगतो, रुजू झाल्यावर अर्ज देऊ म्हणत मी निघालो. ते जोश्याच्या घराबाहेर. मनात एकच विचार होता कीतीही प्रयत्न केला तरी गणपतीचा मारोती काही होत नाही निदान ह्या वयात नाहीच नाही.