दिले नाहीस काही, असे म्हणणार नाही
काही दिलेस तू, असेही म्हणणार नाही....
लेखनी होती हातात, शब्द होते मनात
भावनांची उबळ होती, दाह होता क्षणात
बळ दिलंस मनगटात, लिहीन म्हणालो काही
हा कसला न्याय म्हणावा, संपली होती शाई
म्हणून काहीच दिले नाहीस ......
भरकटलो या जंगलामध्ये, तूच दाखवलीस वाट
घशाला पडली कोरड जेव्हा, बाजूला होता पाट
बुडली नाव नदीत माझी, शोधीत होतो धरती
तू मात्र उभा होतास, पाहत एकटक किना~यावरती
म्हणून काहीच दिले नाहीस ......
सा~याच गोष्टी दिल्यास उशीरा, सजा मात्र अचूक
भरले माझे ताट सुखाने, पण शमली आहे भूक
मन करूनी घट्ट स्वतःचे, टाकले पाऊल पुढचे
काटे तितकेच पायी पायी, काहीच आता न सुचे
म्हणून काहीच दिले नाहीस .....
इवलासाही मज स्वार्थ नाही,सारी उठाठेव त्यांच्यापायी
त्यांनाच हे न कळावे, भोग हे कसले माझ्या ठायी
आज मागावे तुझ्यापाशी, पण शब्द राहतात मुके मुके
आशीर्वादासही मंदिरात या, मस्तकही आता का न झुके
म्हणून काहीच दिले नाहीस .....