मी आणि तो

            तो आला, नेहमी प्रमाणेच धाड धाड करून शूज रॅकमध्ये ठेवले आणि घरात आला.
धडामकन सोफ्यावर पडला, त्याच्या गाडीच्या आवाजानं मी बाहेर आले, पण नेहमीसारखी नव्हे. माझ्याकडे पाहताच त्याचा भडका उडाला, तो उडणारच होता हे मला माहीत होतं.

"आशु, अजून सकाळचाच ड्रेस अंगावर ? "
" हो ! काय वाईट आहे त्यात ? "
" तुला माहीताय मला आवडत नाही "
" नसू दे आवडत, मी काही बाउंड्रीवर फिल्डिंग करत नसते की डाइव्ह मारून चेंडू अडवताना कपडे खराब होतील "
" तू रैनासारखी फिल्डिंग कर, किंवा द्रवीडसारखी बॅटींग कर पण जरा टापटीप राहायला काही प्रॉब्लेम आहे का तुला ? "
" हे 'तू' मला सांगतोयस ? तू नेतोस का रे ऑफिसला कपड्यांचा स्पेअर  ? "
" देवी, मी जर असा भर ऑफिसात कपडे बदलायला लागलो ऑफिस म्हणजे फॅशन शो नाही का होणार ? "
" नाही ना जमत तुला ! मग मला कशाला आग्रह ? "
" तुला जमू शकतं म्हणून "
"माझ्याकडे  इतके ड्रेस नाहीयेत " मी नेहमीचं कारण रेटलं.
" मग घेऊन ये, नाहीतर साड्या नेस ना ! कपाटात साड्यांचे मजले चढवून तुला काय बिल्डिंग बांधायचीय ? "
" हे बघ, तू माझ्या साड्यांबद्दल काही बोलू नकोस " दुखऱ्या नसेला धक्का लागला.
" का गं ? तुझ्या सगळ्या साड्या एकत्र बांधल्या तर चंद्रावर जाण्याइतपत दोरी नक्की तयार होईल. मला नेहमी प्रश्न पडायचा की ऐनवेळी द्रौपदीला नेसवायला इतक्या साड्या कृष्णाने आणल्या कुठून पण आता कळतंय तिच्याकडेपण असाच ढीग असणार साड्यांचा त्याच गोळा करून वापरल्या त्याने " चिडला की असलं काहीतरी भन्नाट बोलतो हा.
" कैच्याकै बोलू नकोस "
" बोलणार "
" मग मी पण बोलणार " माझा दुखावलेला स्वाभिमान.
" काय बोलणार ? "
" तुझ्या त्या घाणेरड्या शूजबद्दल बोलणार, त्याचा वास इतका असह्य होतो की  त्यात डिओ मारायला लागतो त्यात. "
" पण डिओ माझाच वापरतो ना मी ? "
" पण तो आणते मीच ना ? खरं तर नुसती एखादी बाटली न आणता मोठासा कॅनच आणायला हवा आणि त्याचं ठिबक सिंचन करायला हवं तुझ्यावर" न राहवून मी त्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं.
" अगं, या असल्या वातावरणात साईटवर फिरताना घाम येणारच ना ! पण म्हणून काय डिओ ओतणारेयस माझ्यावर मी काय असाच घामेजलेला फिरतो घरात ? " एक दुःखी आवाज.
" नसशील फिरत, पण आल्या आल्या सोफ्यावर सुर मारतोस त्याचं काय ? रोजची कव्हर बदलतेय मी त्याची "
" मग काय आल्या आल्या गच्चीतल्या पाण्याच्या टाकीत सुर मारू ? "
" इतकं नको करायला, कमीतकमी हातपाय धुतलेस तरी पुष्कळ आहे चांगल्या सवयी लावून घे रे ! " मी कळवळले.
" एवढी एक सवय सोडली तर काय वाईट सवयी आहेत गं माझ्या ? "
" का ? चहाचं आधण ठेवलेलं पाणी तू खुशाल दाढी करायला ओतून घेतोस, घराच्या कुठल्याही कोपऱ्यात मोबाईल विसरून मग तो शोधायला लँडलाईनवरून फोन करतोस, झालंच तर बाहेर जाताना ते विचित्र कॅनव्हासचे शूज घालतोस ... "
" आता त्याला माझा नाईलाज आहे , देवानं माझ्या पायाभरणीत मटेरियल जरा जास्तच घातलंय त्याला मी तरी काय करणार ? माझ्या मापाचे शूजच नाही मिळत " माझी यादी अर्धवट तोडत तो म्हणाला.
" तुलाच बरे मिळत नाहीत, आणि तुझी कंपनी काय मंगळावरून मागवते ? नसतील मिळतं तर तयार करून घे ना ! "
" आणखी काही बाकी आहे ? " हार पत्करत तो म्हणाला.
" तुझं ते वेळी अवेळी कॉफी पिणं, तू याच वेगात कॉफी पीत राहिलास तर साईडबिझनेस म्हणून मलाच एखादा कॉफीचा मळा विकत घ्यावा लागेल आणि त्याचं एकमेव गिऱ्हाईक तूच असशील. "
" .... "
" साधा टाय तुला नीटं बांधता येत नाही "
" काहीही आरोप करू नकोस, माझा टाय मीच बांधतो " सुटकेचा अयशस्वी प्रयत्न.
" हो SS पण तो माझ्या गळ्यात अडकवून ना ? मी नसताना काय करतोस रे ? " हाच प्रश्न एकदा सासूबाईंनी विचारलेला मी ऐकलाय.
" जमेल गं हळूहळू " त्याची नजर एव्हाना भिरभिरायला लागली होती, ती माझ्या केसांकडे वळलेली पाहून मी आणखी वैतागले.
" आता माझ्या केसांकडे पाहू नको, एकसारखं मला केस शॉर्ट करायला सांगतोस आणि तुझ्या केसांना दोन महिन्यांतून एकदा कात्री लागते. मला वाटतं एक दिवस आई माझ्या ऐवजी तुलाच सूनबाई हाक मारतील "
" आता बस ना माते " कळवळला बिचारा.
" संध्याकाळी   देवासमोर उभं राहून एखादं स्त्रोत्र म्हण सांगितलं तर तू तिथे डोळे मिटून नेमकं काय गुणगुणत असतोस, शाळेतून घरी आलेल्या मुलाचा अभ्यास घे म्हटलं तर तू त्याच्या वहीत शून्य आणि फुल्यांचा खेळ खेळत असतोस हे मला माहीत नसेल असं वाटतं का तुला ? "
" संपलं की आणखी काही बाकी आहे ? " बिनशर्त शरणागती पत्करत असल्याची खूण.
" तुझं ते अशक्य वाचनवेड हातात पुस्तक असताना आतापर्यंत दहावेळा तरी तू घरातलं दूध मांजरीला समर्पित केलंयस , झालंच तर तुझे ते अवेळी येणारे कॉल्स .. "
माझी यादी आणखी लांबत गेली असती पण अश्यांवेळी  तो हमखास जी ट्रिक करतो तीच त्याने आता केली.
'च्युईईक' असा आवाज तोंडातून काढत आणि दोन्ही खांदे वर उडवत तो सरळ अंघोळीला सटकला.
आता मला माहीत आहे अंघोळ झाली की  आवराआवर करून स्वारी पी. सी . वर जाऊन कीबोर्डवर बोटं आपटत बसेल. एखादी भयकथा लिहीत.........