सुट्टीचा दिवस

      नंदूने डोळे उघडले तेव्हां मच्छरदाणीच्या जाळीमागून अनिताच्या विचित्र हालचाली चाललेल्या दिसत होत्या‌. त्यामुळे अंगावरची चादर लाथेने उडवत मच्छरदाणीतून डोके त्याने बाहेर काढले तसा तिच्या हातातील झाडूचा फटकारा त्याच्या नाकावर बसला व पाठोपाठ जळमटे व कोळिष्टके यांचा एक थर अलगद त्याच्या चेहऱ्यावर उतरला. धुरळ्याचे कण नाकातोंडात जाऊन जबरदस्त ठसका त्याला लागला त्यामुळे झटकन डोके परत आत घेत पुढील धुळीचा मारा चुकवत तो ओरडला "अगं अगं हे काय चालवले आहेस आणि सगळ करण्यापूर्वी मला उठवायला काय झाल होत ? "
"अरे वा , "तितक्याच तडफेने त्याला उत्तर देत सुनिता फुत्कारली " मारे ऐटीत सांगतोस ना नेहमी तुझी झोप किती सावध असते ती पण ती कुंभकर्णालाही लाजवणारी आहे हे तुला पटवून द्यायचे होते. आजूबाजूचे शेजारी पाजारी सुद्धा डोकावून पाहून गेले की एवढं मी काय करतेय पण तू मात्र घोरासुराच आख्यान लावून बसलेला "
 दोघांनाही आपण घोरतो यावर विश्वास बसत नसे आणि त्यासाठी त्रयस्थ साक्षिदार म्हणून अजून कोणी लाभलेले नव्हते.त्यामुळे नंदूने जोरात विरोध प्रकट करत म्हटले.
" हे मात्र मी ऐकून नाही घेणार. "
"अस्सं? आणी इतका वेळ तुझं घोरणं मी मुकाट्यान ऐकून घेतल त्याच काय ? "
"बर बर मी घोरतो मग तर झाल ? आता गप्प बसायला काय घेशील? " नंदून नेहमीप्रमाणे पांढरे निशाण फडकावले.
"दुसर काय घेणार ? एक कप गरम गरम चहा मिळाला तर घेईन. "रविवारचा सकाळचा चहा नंदून बनवण्याचा प्रघात होता त्याला उद्देशून सुनिता म्हणाली.
"ठीक आहे पण त्यापूर्वी आपल्या हातातील ती तलवार कृपया बाजूस ठेवा मासाहेब,म्हणजे हा बालक न घाबरता बाहेर येईल. " नाटकी आविर्भावात असे म्हणून नंदून मच्छरदाणीबाहेर उडी मारायला व अनिताच्या झाडूच्या फटकाऱ्याने वरच्या  फळीवर ठेवलेला रद्दीचा गट्ठा धड धड करत खाली यायला आणि तोही बरोबर नंदूच्या डोक्यावर विराजमान व्हायला एकच गाठ पडली अर्थात बालके नंदूच्या रागाचा पारा चढणे आणि त्यामुळे "शर्थ झाली बुवा तुझी ! तुझ्या या रद्दीने माझा जीवच काय तो घ्यायचा बाकी ठेवलाय "या शब्दात तो बाहेर पडणे स्वाभाविकच होते
      अर्थात त्याचा हा तोंडाचा पट्टा शांतपणे ऐकून घेणे अनिताच्या कोष्टकात कुठले बसायला तिने त्याच्याही वरचा सूर लावत म्हटले,
"छान रद्दी माझी काय? तरी प्रत्येक सुट्टीच्या दिवशी तुला मी आठवण करत असते की ती रद्दी लवकर काढून टाक म्हणून"
"पण मग कोणताही रद्दीवाला तुमच नि आमच जमायच नाही असं म्हणत तागडी किंवा वजनाचा काटा आपटत निघून जातो तो कुणामुळे? ? " हा प्रश्न विचारताना आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे या नुकतच लग्न झाल्यानंतरच्या संवादाची त्याला आठवण झाली.अर्थात त्या प्रश्नाची गोडी या प्रश्नात नव्हती. पण त्यातल्या सत्यतेची जाणीव असल्यामुळे "तर काय मेले सगळे रद्दीवाले --- "असा कबुलीजबाबात्मक उद्गार काढण्याची तयारी अनिता करत असतानाच त्या रद्दीच्या गठ्ठ्यातून एका उंदराच्या पिल्लाने टुणकन उडी मारली आणि त्याबरोबर तिच्या हातातील झाडूच्या शेंड्याचा धक्का लागून रद्दीचा दुसरा गठ्ठा धबधब्यासारखा बरोबर तिच्या नाकाच्या शेंड्यावर कोसळल्यावर तिने "अयाई"करत खालीच बसकण मारली अर्थात अश्यावेळी तिला सावरण्यासाठी उठणे हे आपले कर्तव्य आहे हे जाणून नंदूने रद्दीच्या गठ्ठ्यातून स्वतःला मोकळे करत उठण्याचा प्रयत्न करायला व तसाच प्रयत्न अनितानेही करायला एकच गाठ पडल्यावर लहानपणी कधीतरी खेळलेल्या "ठो दे ठकी दे " खेळाप्रमाणे त्यांच्या कपाळांची जोरदार टक्कर झाली व इतकावेळ दाबून धरलेला त्रागा व्यक्त करण्याचा आपला नेहमीचा मार्ग अनिताने अवलंबला व आपल्या दुखापतीचे दुःख करण्यापेक्षा तिचा आवाज बंद कसा करायचा याचीच चिंता नंदूला पडली पण अचानक जादू व्हावी तसे अनिताच्या रडण्याचे हसण्यात रूपांतर झाल्याचे नंदूला पहायला मिळाले व त्याविषयी तो आचंबा करत असतानाच "अरे ऐकलास का रद्दीवाल्याचाच आवाज " हे तिचे उद्गार ऐकल्यावर त्या जादूमागील कारण त्याच्या लक्षात आले. दोघेही उठून गडबडीने गॅलरीत जाऊन रद्दीवाला कोठे दिसतो का हे पाहू लागले
  "कुठय ग तुझा रद्दीवाला ? बहुधा तुझ्या डोक्याला मघा धक्का लागल्यामुळे तुला असे भास होत असावेत" नंदू खर तर सहानभूती दाखवायला गेला पण परिणाम उलटाच झाला. "हो हो तुला असेच वाटणार बायकोवर तुझा विश्वासच कुठे आहे "असे अनिताने फणकाऱ्याने
उद्गार काढले पण सुदैवाने पुन्हा एकदा तशीच हाळी कानावर आली आणि पुढच्याच क्षणाला प्रत्यक्ष रद्दीवालाच अनिताला दिसला.
" अरे तो बघ समोरच्या बिल्डिंगमधून खाली उतरतोय. बहुधा मालूताईंकडून येत असावा. मार बर हाक त्याला. " ती म्हणाली. अर्थात या आज्ञेचा अवमान करण्याची नंदूची प्राज्ञा नव्हती त्यामुळे आवाजात शक्य तेवढी धार आणण्याचा प्रयत्न करीत त्याने हाका मारल्या पण त्यावेळी रद्दीवाला उतरण्याच्या नादात असल्यामुळे त्याला त्या ऐकू आल्याच नाहीत आणि आपला मोहरा बदलायला तो तयार होईना मात्र अनिताच्या एकाच हाकेने ते काम झाले त्यामुळे विजयी मुद्रेने तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिले पण त्यावेळी तो शेजारी नव्हता हे तिच्या लक्षात आले. आतून नळ सुटल्याचा आवाज ऐकू आला.
"हे रे काय मला एकटीलाच त्या रद्दीवाल्याच्या तोंडी देऊन पळून गेलास ! " अनिता किंचाळली. त्याबरोबर तिचा मूड आणि कदाचित रद्दीवालाही निघून जाईल या धसक्याने टूथपेस्ट भरल्या तोंडाने " ऑग तॉस नॉही 'म्हणत तिला समजावण्यासाठी लगबगीने नंदू बाहेर येण्याला व अनिताने तरातरा आत जाण्याला एकच गाठ पडली व परिणाम अपेक्षितच झाला म्हणजे अनिताच्या गालावरही टूथपेस्टचा थर चढला. त्याबरोबर "ई काय घाण ही आणि काय कुकुल्ल्या बाळासारख अंग सगळ माखून घेतलय "म्हणत ती आत पळाली.तेवढ्यात रद्दीवाला हजर झाला व "हां साहेब, कुठ आहे ती तुमची रद्दी " अस विचारण्यासाठी त्याने तोंड उघडण्यापूर्वी तोच त्या रद्दीच्या गठ्ठ्याला ठेचकाळला व तो गठ्ठा पाहून गिऱ्हाईक मोठ आहे हे त्याच्या लक्षात आले. टूथपेस्टचा फेस बेसिनमध्ये थुंकून एक चूळ भरीत नंदू म्हणाला, "ए अनू बघ बर काय म्हणतो तो नाहीतर पुन्हा मला कमी भाव मिळाला असा तुझा माझ्यावर आरोप व्हायचा. "मात्र नंदूचे हे शब्द नेमके रद्दीवाल्याच्या कानावर गेले आणि तो म्हणाला , " हे बघा साहेब, आमचा भाव म्हणजे अगदी फिक्स. सायबांना वायला अने बाईसायबांना वायला असा बेपार नाय आपला"
"बर मग तुझा फिक्स रेट काय ते तरी कळू दे "असे अनिताने रोखठोक भाषेत विचारले.
"हे पगा बाईसाहेब, पुस्तकाची रद्दी किलोला २ रु. अंग्रेजी पेपर ५ रु. किलो आणि मराठी पेपर चार रु. किलो तस कशाला हे आमच दरपत्रकच पाहा ना" एक अगदी चोळामोळा झालेला कागद तिच्या पुढ्यात टाकत रद्दीवाला म्हणाला.
"" मग जा बाबा उगीच इथ वेळ वाया नको घालवू. "अनिताने एकदम असा पवित्रा घेतल्याचे पाहून नंदूला आश्चर्य वाटले पण ही माघार हा केवळ युद्धातील एक चाल आहे हे नंतर त्याच्या ध्यानात आले. कारण त्यानंतर तिने आपले बोलणे न थांबवता "आमची रद्दी सगळी इंग्रजी पेपरची आहे आणि ती सात रु. किलो च्या खाली मुळीच देणार नाही. आताच तर समोरच्या घरात साडेसात रु. किलो भाव दिलास आणि आम्हाला मात्र दरपत्रक दाखवतो  " असा आपला इरादा प्रकट केला.
समोरच्या बिऱ्हाडातील दर अनिताला इथ बसून कसा काय कळला हा पेच नंदूला पडला पण रद्दीवाल्याला मात्र तो पडला
 नसावा, कारण लगेचच निघण्याच्या पवित्र्यात वळता वलता तो म्हणाला, "मंग ऱ्हायल बाईसाहेब, दुकानात बी रद्दीला सात रु. भाव कुनी देत नाही मग असा घाट्यात बेपार कोन करेल ? "
"फिर एक बारही बोलो क्या भाव देगा? " राष्ट्रभाषेत बोलल्यामुळे आपल्या बोलण्यास अधिक जोर येतो असे अनिताचे मत असावे.
"एकही भाव बाईसाहेब "रद्दीवाला असे म्हणाल्यावर त्याला झाशीच्या राणीच्या थाटात अनितानेही "फिर मेरी रद्दी नही दूंगी"असे उद्गार काढल्यावर हिला काय वेड बिड लागले की काय असे वाटून नंदून "थांब ग असं एकदम उडवून नको लावू त्याला "असं म्हणून आलेली संधी हातची न दवडण्याचा प्रय्र्त्न केला.
"अच्छा बाई अब एकही लास्ट बोलता हूं छे रुपिया अभी अभी सामनेवाली बिल्डिंगमे यही भाव दिया "
"बघ मी म्हटल नाही तो मालूताईंकडे गेला असणार म्हणून, मी त्यानाच विचारून येते पाच मिनटात" म्हणून अनिता झपझप पावले टाकीत गेली सुद्धा आणि नंदू आणि रद्दीवाला एकमेकाकडे पाहत उभे राहिले.
     अनिता आणि मालूताईंची पाच मिनिटे एक तास होऊन गेल्यावरदेखील संपलीच नव्हती मध्ये चुकून अनिताचे लक्ष घड्याळाकडे गेले आणि ते बंद पडले असावे असा तिला संशय येवून तिने त्याना विचारलेसुद्धा "कायहो मालूताई घड्याळ बंद आहे की काय ? "
"नाही चालू आहे , का काय झाल ? "
"अग बाई मग मला येवून एक तास झाला की काय ? "अस म्हणून अनिताने पळत पळतच जिना उतरायला सुरवात केली आणि तेव्हां आपण रद्दीचा भाव विचारलाच नाही हे तिला आठवले म्हणून खालूनच ओरडून तिने विचारले ,
"अहो मालूताई तुम्ही काय भावान रद्दी विकली "
"आम्ही कुठ रद्दी विकली ? "मालूताई आश्चर्याने म्हणाल्या पण त्यांची कान आणि डोळे तीक्ष्ण असल्यामुळे कीर्तन्याच्या सुधाताईंनी रद्दी विकली व त्याना काय भाव मिळाला याची नोंद त्यानी घेतली होती त्यामुळे आपल्या ज्ञानाचा फायदा अनिताला देण्यासाठी तत्परतेने त्यानी ती माहिती तिच्या कानावर घालत म्हटले "अग त्या कीर्तनेवहिनींनी विकली आणि भाव होता साडॅपाच रु. "
"अहो आमच्याकडे तो सहा रु. भाव द्यायला तयार आहे " असे अनितान सांगितल्यावर त्यानी "अरेवा सहा रु. म्हणजे चांगलाच आहे भाव पण वजन मात्र पाहा हं, नाहीतर हे रद्दीवाले वजनात मारतात."
"बर बघते बाई, अच्छा ! "असा त्यांचा निरोप घेऊन घाईघाईने आपल्या ब्लॉकमध्ये शिरल्यावर अनिताला नंदू आणि रद्दीवाला दोघांपैकी कोणीच दिसले नाही.मात्र शेजारच्या देशपांडेवहिनींचा छोटा पिंटू एका रद्दीच्या ढिगावर सिंहासनावर बसावे तशी बैठक मारून बसलेला तिला दिसला.