सुट्टीचा दिवस (उत्तरार्ध)

अनवधानाने ही कथा दोन भागात असल्याचे सूचित करण्याचे राहून गेले होते.
         पिंटू मोठा गोड पोरगा होता पण नेहमी चळवळ करत असे आणि तरी तो इतका शांत बसलेला पाहून अनिताला नवलच वाटले. त्याची पाठ तिच्याकडे होती त्यामुळे ती आल्याचे त्याला कळले नव्हते आणि तो आपल्याच नादात तोंडात काही तरी चघळत बसला होता. त्यामुळे गुपचुप त्याला उचलून त्याचा पापा घ्यावा असा तिला मोह झाला त्यामुळे तिने त्याला उचलले आणि काहीतरी विचित्र वास तिला आला आणि रद्दीच्या गठ्ठ्यावर पिंटूने नसता उद्योग करून ठेवल्याचे तिच्या ध्यानात आले आणि "ई ई कसली घाण ग बाई"म्हणत दाणकन त्याला तिने खाली ठेवले आणि "अरे नंदू कुठ लक्ष आहे तुझं ? इकड या पिंटून काय घाण करून ठेवलेय पाहिलस का ? माझा सगळा गाउन घाण झाला "म्हणून तिन त्याच्या पाठीत हलकासा धपाटा घातला तेवेढे निमित्त त्याला भोकाड पसरायला पुरे झाले आणि त्या आवाजाने मात्र नंदू धावतच बाहेर आला आणि अनिताकडे पाहून त्याला हसू आवरेना आणि तो गडबडा लोळायचाच बाकी राहिला. पण त्याच्यावर रागवायलाही अनिताला वेळ नव्हता कारण ताबडतोब गाउन बदलणे तिला आवश्यक होते.
       आपल्या पोराचा आवाज ऐकून देशपांडे वहिनी धावतपळत तेथे आल्या व त्याचा प्रताप पाहून त्याला व त्याने घाण केलेला पेपरचा कागद घेऊन त्या परत आपल्या ब्लॉकमध्ये गेल्या तरी  नंदूचा हास्योद्रेक आवरतच नव्हता पण अनिता कपडे बदलून बाहेर आल्यावर मात्र पुढील संकटाच्या कल्पनेने त्याला तो आवरता घ्यावा लागला. अनिताने भर भर रद्दी आवरायला सुरवात केली.पण तरी त्यातही  "कायरे थोडावेळ रद्दीवाल्याला थांबवून ठेवले असतेस तर काय बिघडले असते? " असा प्रश्न विचारण्याइतके भान तिला होतेच.
"अग मी त्याला बांधूनच ठेवणार होतो पण त्याने पोलिसकडे जाण्याचा धाक घातला त्यामुळे त्याला सोडावे लागले, "अतिशय निरागस म्हणजेच बावळट मुद्रा करत नंदूने उत्तर दिले.
"पोलिसकडे कशाला ? "
"आपल्यावर त्याच्या वेळेची खोटी केल्याबद्दल फिर्याद करण्याचाही त्याचा विचार आहे असे जाताना म्हणत होता."
"अस्स? कळतात बर ही उपरोधिक बोलणी आम्हाला. काय पाप केल होत गेल्या जन्मी कुणास ठाउक अशी बोलणी खायला"
आता नंदूचा उपरोध अधिकच धारदार झाला कारण सकाळपासून चहाच काय पण आणखी काहीही आपल्या पोटात पडले नाही याची जाणीव त्याला झाली आणि त्याच रागात त्याने"हो बोलणी खाऊन तुझ पोट भरत असेल पण मला मात्र काहीतरी खरोखरच खाव लागत "असा बाँबगोळा टाकला. त्याबरोबर तितक्याच जोरात अनितानेही " तुला कुणी अडवल आहे खायला ? "असे प्रत्युत्तर केले.
 "ठीक आहे तर मग निघतोच कसा मी किनाऱ्यात जाऊन जेवणच करून येतो. " नंदून आपला विचार जाहीर केला.
"दोन मिनिटेच थांबशील का ? "एकदम अनिताच्या स्वरातील बदल त्याला जाणवला .
"का दोन मिनिटात कणकेचे नकाशे आणि तांदळाची पेज करून मला वाढणार की काय ? "उपरोधिकपणाचा कळस करत  त्याने विचारले,अर्थात हे आपण अगदी जिवावर उदार होऊन म्हणत आहोत याची जाणीव त्याला होती. पण त्याला वाटत होता तितका भयानक परिणाम झाला नाही़ उलट निर्विकारपणे अनिता म्हणाली, "छे छे दोन मिनिटात मीही तयार होते आणि तुझ्याबरोबर येते. "
"दर महिन्यात पंध्रा दिवस डबा आणि उरलेले पंध्रा दिवस किनाऱ्यात जाण्यासाठी तुझ्याशी लग्न केल वाटत ? "सात्त्विक संतापाने व कपाळावरील आठ्यांचे जाळे दाट करीत त्याने उद्गार काढले.
"मग काय फुकटात स्वैंपाकीण मिळत्येय म्हणून केलस का लग्न माझ्याशी ? कुठ गेल ते लग्नापूर्वी माझ्यासाठी जीवही देण्याचे वचन? " अनितासमोर आपण युक्तिवाद करण्यात टिकणार नाही याची कल्पना असली तरीही नंदूने बोलण्याचा प्रयत्न केलाच.
"हे बघ तरीही बायको म्हणून काही कर्तव्ये असतात की नाही ? "
        पूर्वी कधीतरी पुरुषाचे हक्क आणि बायकोची कर्तव्ये या विषयावर आपण केलेल्या भाषणाची टेप नंदूने सुरू केली आणि ती संपता संपता अगदी ठेवणीतील साडी नेसून केसावरून हात फिरवत अनिता पुढे आली आणि हंसत हंसत " बर चल आता तुझ भाषण आटोपल असेल तर"अस म्हणाली आणि ते भाषण केले तो काळ आता बदलला आहे हे लक्षात येऊन नंदू बिचारा निमूटपणे तिच्या मागे चालू लागला आणि तितक्यात आपण रात्रीचे कपडेसुद्धा बदलले नाहीत ही गोष्ट त्याच्या लक्षात आली.त्यामुळे कपडे बदलण्यासाठी त्याला परत घरात शिरणे भाग होते. त्यानंतर दहा मिनिटे नंदूच "अग झालच माझ आलोच"आणि अनिताच उच्च स्वरात , "किती हा उशीर आटप लवकर "हे संभाषण चालू असतानाच मध्येच टेपरेकॉर्डरचे बटण दाबून तो बंद व्हावा तसा तिचा आवाज बंद झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याचे आश्चर्य वाटून पँटमध्ये शर्ट खोचतच तो बाहेर आला तो अनिताचे तोंड बंद नसून खालच्या मजल्यावरील कमाताईंशी गप्पा मारण्यात अधिकच जोरात चालू आहे हे त्याच्या लक्षात आले.
"अग मग या रद्दीच्या गठ्ठ्याच काय करायच ? "त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न त्याने केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही व वाटेत काहीही अडथळा आला तरी तो चिरडून पुढे जाणाऱ्या रणगाड्यासारख ते चालूच राहिले. अखेरीस जोरात दार आपटून बंद करीत कुलूप लावून अनिता पाठोपाठ येतच असेल या कल्पनेने नंदू चालू लागला.
     होटेल किनारा मध्ये पोचेपर्यंत त्याचा राग शांत झाला आणि खुर्चीत बसल्यावर अनिता आपल्या मागोमाग आली नाही ही गोष्ट लक्षात आलयावर तो क्षणभर हादरला अन नंतर बराच सुखावला. त्यानंतरचे चारपाच तास नंदूचे फारच मजेत गेले. कारण छानपैकी जेवण नंतर मसालापान व नंतर मित्र भेटल्यामुळे त्यांच्याबरोबर एक भन्नाट पिक्चर असे एकाहून एक आनंददायक कार्यक्रम कुठलेही विघ्न न येता त्याला पार पाडता आले.
   मात्र घरी परतताना त्याच्या छातीतील  धडधड त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागली. घरी जाण्या ऐवजी तोफेच्या तोंडी जावे लागले तरी परवडले असे विचार त्याच्या डोक्यात नाचू लागले. अशा चिंताक्रान्त अवस्थेत आपल्या घराच्या दारासमोर नंदू आला तेव्हां दार बंद पाहून त्याच्या काळजाची धडधड जरा कमी झाली. पण नंतर आपणच कुलूप लावून बाहेर पडलो होतो हे आठवल्यावर मात्र दार बंद कसे या गोष्टीचा उलगडा त्याला होईना.
   कुलूप काढताना संभाव्य संकट आणखी काहीवेळ पुढे ढकलले गेले या  आनंदात दार ढकलून आत शिरला  आणि कशाला तरी अडखळून  सपशेल आडवा झाला हाताने चाचपून उठताना त्याला कळले की सकाळपासून  त्याच जागेवर पडलेला तो रद्दीचा  गठ्ठा होता. कसाबसा उठून दिवा लावायला जातो तो बाहेरून आवाज ऐकू आले एक आवाज होता "अगबाई दार उघडच दिसतय, नंदून कुलूप लावल होत ना? " अर्थात हा अनिताचा होता
"अनिता आजचा पिक्चर बाकी मस्त होता" हा दुसरा आवाज बहुधा शेजारच्या सुधाताईंचा असावा.
"आणि जेवणही , अग पण सुधा मला भीती वाटतेय आमचे साहेब डोक्यात राख घालतील याची"
" अग का काळजी करतेस, घालील राख थोडावेळ अन मग बसेल गप्प, बर जाते मी अच्छा गुड नाइट "
"गुडनाइट "असे अनिताचे शब्द त्याच्या कानावर पडले, पाठोपाठ सँडल्स काढण्याचा  आवाज अन आत येणारी व्यक्ती  नंदूप्रमाणेच दारात  रद्दीच्या गठ्ठ्याला अडखळून सपशेल आडवी झाली. त्याबरोबर आपण दिवा लावला नसल्याचे नंदूच्या ध्यानात आले. त्याने पटकन बटण दाबले तेव्हा लख्ख पडलेल्या प्रकाशात घरभर पसरलेल्या रद्दीच्या गठ्ठ्यात उभे राहून अनिता व तो एकमेकास खाऊ की गिळू अशा आवेशात पाहत असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तो चटकन सकाळी काढावयाच्या राहून गेलेल्या मच्छरदाणीत लगबगीने  शिरला व  क्षणार्धात घोरू लागला.