कार्यतत्पर म.न.पा.स एक पत्र

प्रती म.न.पा.,

सादर प्रणाम,

सध्या रस्त्यावरील
खड्ड्यांमुळे आपल्यावर होणारे कामचुकारपणाचे आरोप रोज ऐकतो. ते मला फारसे
रुचत नसल्याने आपणास आपल्या दिव्य कार्याची जाणीव करून देण्यासाठी मुद्दाम
हा पत्रप्रपंच करत आहे.

सर्वप्रथम मी वैयक्तिकरीत्या आपले आभार मानू इच्छितो कारण केवळ आपल्या
कर्तव्यनिष्ठेमुळे माझे दंतवैद्याकडे खर्ची पडू शकत असलेले रु. २०० मात्र
बचत झाले. त्याचे असे झाले की दुखरी दाढ काढण्यास मी दंतवैद्याकडे जात असता
आपल्या कृपेमुळे रस्त्यात असलेल्या खड्ड्यात पडल्याने माझी दुखरी दाढ अगदी
बिनखर्चात निघाली, अर्थात मुद्दलेच्या दाढेबरोबर चांगले असलेले दोन दातही
व्याज म्हणून पडले, परंतु ते ही फुकटात असल्याने मी तिकडे दुर्लक्ष करत
आहे.

माझा वैयक्तिक असा हा एक फायदा जसा मी आपणास प्रांजळपणे सांगितला तसेच
इतरांचेही अनेक फायदे मी आपणास सादर करू इच्छितो, त्यामुळे कदाचित
सर्वसामान्य जनतेला त्रास वाटणार्‍या खड्ड्यांच्या, रस्त्यात
असण्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारी दूर होऊ शकतील.

आजकाल ‘ट्युबलेस टायर’आणि ‘मेंटेनन्स फ्री’ वाहनांमुळे तमाम
गॅरेजधारकांच्या रोजगारावर गदा येऊ पाहतं होती परंतु केवळ आपल्या उदात्त
हेतूमुळे खड्ड्यात आपटून बंद पडलेल्या वाहनांमुळे त्यांच्यावरील उपासमारीचे
संकट टळले आहे. घरात हक्काचे आणि सुखाचे चार घास खाताना त्यांनी आपले
आभारच मानायला हवे.

रस्त्यावरून मोटारीतून जाताना बसणारे हादरे हे उत्कृष्ट व्हायब्रेटर कम
मसाजरचे काम करत असल्याने, आम्हा पामरांना सर्वांग सुंदर व्यायाम घडून आपला
बांधा फुकटात सुडौल राखता येतो तो केवळ आपण याच कारणास्तव रस्त्यांमध्ये
ठेवलेल्या खड्ड्यांमुळेच.

" आता सिझेरीन शिवाय पर्याय नाही !" असे डॉक्टरांनी निक्षून सांगीतल्यावर
प्रसूतिवेदनांनी व्याकुळ झालेल्या पत्नीची हॉस्पिटलामध्ये नेतानाच नॉर्मल
डिलिव्हरी करून तिची व खर्चाच्या कल्पनेने कासावीस झालेल्या पतीची अशी
एकावेळेस दोघांची सुटका करण्याची किमया आपण रस्त्यात तितक्याच कौशल्यपूर्ण
रितीने ठेवलेल्या खड्ड्यांमुळेच पर्यायाने आपल्यामुळेच घडत आहे.

घरापासून ऑफिसापर्यंतचा रिक्शाचा खर्च न परवडणार्‍या क्षुद्र
कारकुंड्याला बसच्या प्रवासात नौकानयनाचा आनंद देण्याची आपली दूरदृष्टी
काही नतद्रष्टांना कळत नाही. असा फुकटातला आनंद लाटता लाटता आजवर अनेक
प्रेमविवाह झाले आहेत, आणि त्याचे श्रेय त्या जोडप्यांनी निव्वळ आपल्यालाच
द्यावे लागेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाप्रलयाची साधारण कल्पना आम्हा सर्वसामान्य
जनांस यावी म्हणून आपण नालेसफाई अर्धवट ठेवता, त्यामुळे साठलेल्या गुढघाभर
पाण्यातून मार्गक्रमण करताना आम्हांस येऊ घातलेल्या महाप्रलयाचा सामना
करण्याची सवय तर होतेच, पण रस्त्यावरून चालताना ‘आपल्या पुढल्या पावलाखाली
काय येईल ?’ अशी रहस्यकथाही आम्हाला अनुभवता येते. आम्हा सामान्यजनांना
त्या कथेच्या नायकाची भूमिका आपण अगदी निर्व्याजपणे देऊन टाकता, अशातच
रस्त्यावरचे एखादे मॅनहोल उघडे टाकून आपण थोडाफार साहसकथेलाही वाव करून
देता. अश्या या आपल्या कथा नायकांनी आपले आभार मानायलाच हवेत.

फक्त आणि फक्त आपल्याच कृपेमुळे आजकाल आम्ही आमच्या अर्धांगीनीचा हात
हातात घेऊन खुशाल भररस्त्यातून मिरवू शकतो.आमच्या या रुक्ष आयुष्यातल्या या
रोमँटीक क्षणालाही आपणच ( जरी मोठ्या मनाने मान्य करत नसलात तरी )
कारणीभूत ठरता. रोमान्सचा विषय छेडल्या गेलाच आहे तर मी आपणास असे सुचवेन,
की शहराच्या गर्दीत सर्व बागा भरल्यावर एखादे प्रेमी युगुल जर एकांत शोधत
आपल्या दयेमुळे शाबूत असलेल्या एखाद्या खड्ड्याच्या आश्रयास आले, तर
त्यांना अभय मिळावे.

आपल्या दूरगामी विचारांची आम्ही पाहिलेली एक प्रचीती,
दोनच दिवसांपूर्वी आमचे शेजारी मुलाला पोहोण्याच्या वर्गाला घेऊन जात असता
त्यांचा सुपुत्र एका खड्ड्यात पडला केवळ आपल्या महान वरदहस्तामुळे अफाट
आवाक्याच्या त्या खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी त्याला जे प्रयत्न करवे
लागले त्याचा परिणाम म्हणून तो चक्क पोहोणे शिकला. आता आपला मुलगा दमडीही न
खर्च करता पोहायला शिकला याचा त्या पित्यास आनंद व्हायला हवा, परंतु तो
आपल्या नावाने बोटे मोडताना दिसला. असे प्रकार वारंवार घडू लागले तर लवकरच
आपल्या शहरातली अनेक चिमुरडी इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा विक्रम करताना
दिसतील. याचे सारे मोठेपण आपल्याला द्यायलाच हवे.

आपल्यामुळे आजकाल आम्हाला अण्वस्त्रधारी अतिरेक्यांची भितीही वाटेनाशी
झालेय. आततायीपणे केलाच जर त्यांनी एखादे दिवशी अणुहल्ला, तर आम्ही आपल्या
कुटूंबकबिल्यासहीत एखाद्या खड्ड्यात लपून अनेक महीने किरणोत्सारापासुन
सुरक्षित राहू शकतो. अर्थात आपल्या या उच्च दर्जाच्या तयारीची त्या
अतिरेक्यांना कल्पना असावी, म्हणूनच केवळ ते नुसत्याच वल्गना करत आहेत.

आपल्यामुळेच रस्त्याकडेच्या फडतूस चहाच्या टपरीला लोक बेधडक ‘लेक
व्ह्यू’ असे हाय फ़ाय नाव देऊ शकत आहेत परंतु तरीही आपल्याबद्दल आदर
दाखवण्याचे साधे उपचार ते दाखवत नाहीत.

काही विघ्नसंतोषी माणसांना आपली ही सेवाभावी वृत्ती पसंत नसावी,
म्हणून ते आंदोलनं करतात, रस्त्यात आपण काळजीपूर्वक जोपासलेल्या खड्ड्यात
वृक्षारोपण करतात. अर्थात त्यांना तुमचे वृक्षप्रेम माहीत नसते, तुम्ही
रस्त्यात आडव्या पडलेल्या वृक्षाला इजा होऊ नये म्हणून कित्येक दिवस तिकडे
फिरकतंच नाही, तर नवीन लावलेल्या झाडाला मुळासकट उपटून टाकण्याची राक्षसी
वृत्ती आपल्याकडे कुठून असणार ? ते आपले काम करून बाजूला होतात, आणि तुम्ही
त्यांच्या अरेरावी कारवाईकडे दुर्लक्ष करता, मग खड्डा हळूहळू मोठा होतो
आणि त्यात लावलेले झाड त्याच्या पोटात गडप होते.
इथे एक प्रश्न पडतो, असे म्हणतात की दगडी कोळसा हा कधीतरी हजारो
वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या झाडापासून बनतो, याचा अर्थ
हजारोवर्षांपूर्वीही अशी आंदोलनं होत असावीत काय ? आणि तेव्हाही आपण इतकेच
कार्यक्षम होतात का ?

असो, इतके दिवस आपल्या छत्राखाली राहिल्याने मलाही काही कल्पना सुचत आहेत. आपली परवानगी आहे असं गृहीत धरून मी त्या मांडत आहे.
आपण जर या खड्ड्यांची रुंदी व खोली अशीच वाढवत नेली तर आपल्या शहरात
भुयारीमार्गांचे जाळे सहज पसरवता येईल जेणे करून आमच्यासारखे पामर ट्रॅफिक
जॅम, सिग्नल, मेगाब्लॉक असले अडथळे न येता सहजासहजी वेळेवर ऑफिसात पोहोचू
शकू. पुढे कधी शक्य झाल्यास याच भुयारीमार्गाचे विस्तारीकरण करून त्यात
एखादे भूमिगत शहरही वसवता येईल. आणि वर साठलेल्या नाल्यांचे पाणी मातीतून
फिल्टर होऊन खालच्या शहराला चोवीस तास पाणिपुरवठाही करता येईल.

कदाचित या कल्पना आपल्याला आधीच सुचलेल्या असू शकतील व त्यावर आपली
कार्यवाही चालूही असू शकेल, परंतु सामान्य नागरिकांना आपले उदात्त हेतू कळत
नसल्याने ते उद्दामपणा करत असतात. जमल्यास या पत्राची प्रत काढून
परिपत्रकाप्रमाणे नागरिकामध्ये वाटल्यास गैरसमज कमी होण्यास हातभारही
लागण्याची शक्यता आहे.

पत्राच्या शेवटी आपले पुनश्च आभार मानून मी देवाजवळ विनंती करतो की
पुढच्या जन्मीही आपल्याच कृपाछत्राखाली वावरण्याची संधी मिळावी ( आणि तो
जन्म माणसाचा असू नये )
माझ्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत, धन्यवाद.

आपलाच एक

सुजाण नागरिक.