लाकूडतोड्याची गोष्ट

     फार लहानपणी वाचलेल्या लाकूडतोड्याच्या गोष्टीच्या दोन नव्या आवृत्त्या मला आलेल्या विरोपातून वाचायला मिळाल्या. मजेशीर वाटल्या म्हणून त्यांचा अनुवाद येथे देत आहे.
                                                             -- १ --
    तोच लाकूडतोड्या अलीकडे असाच नावेत बसून नदी ओलांडत असताना एकदम नाव उलटते.  लाकूडतोड्या वाचतो पण दुर्दैवाने आपल्या बायकोला वाचवू शकत नाही. आणि त्यामुळे नदीकाठी बसून शोक करू लागतो. त्याचा शोक ऐकून नदी देवतेला कारुण्याचा उमाळा येतो व ती प्रकट होऊन त्याला विचारते, " बाळा कारे रडतोस ? " त्यावर लाकूडतोड्या उत्तर देतो, "माते, माझी पत्नी या प्रवाहात वाहून गेली, मी तिला काही वाचवू शकलो नाही. " नदीमाता म्हणते, "काही रडू नकोस मी तुझी बायको तुला देते" असे म्हणून ती पाण्यातून एक अगदी प्रती ऐश्वर्या राय शोभावी अशी स्त्री वर काढते  व लाकूडतोड्याला विचारते , "बघ बर ही आहे का तुझी बायको? " लाकूडतोड्या एकदम आनंदाने उद्गारतो, "हो हो, हीच माझी बायको" यावर नदीमाता संतापून बोलते, "मूर्खा, अशा प्रकारे मला फसवतोस काय ? मला माहीत आहे ही तुझी बायको नाही . आणि तरीही तीच आपली बायको असे सांगायला लाज कशी वाटली नाही ? " लाकूडतोड्या हात जोडून नदीमातेची क्षमायाचना करत  म्हणाला, "माते, क्षमा कर , मला तसे करायचे नव्हते, पण एकदा अनुभव आल्याने मी शहाणा झालो आहे जर मी ही माझी बायको नाही असे म्हटले असते तर आणखी एकादी माधुरी दीक्षितसारखी दिसणारी स्त्री प्रवाहातून काढून तीच माझी बायको आहे का असे तू विचारले असतेस आणि मी नाही म्हटल्यावर शेवटी तू माझ्या बायकोला बाहेर काढून तीच माझी बायको आहे का असे विचारले असतेस, त्यावर मी हो म्हटल्यावर तू माझ्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन त्या तिन्ही स्त्रिया मला देऊन टाकल्या असत्यास, आता तूच सांग माते, या महागाईच्या दिवसात एक बायकोला पोसणेही कठीण जाऊ लागले आहे तर तीन तीन बायकांना पोसणे मला कसे जमणार? तेव्हां कृपा करून मला माझीच बायको परत कर " हे ऐकून नदी मातेचा राग शांत झाला व लाकूडतोड्याचीच बायको त्याला परत मिळाली.
                                                                    -- २ --
        त्या लाकुडतोड्यासारखाच एके काळी एक सॉफ्टवेअर अभियंता होता. निरनिराळ्या संगणक प्रणाली आपल्या अद्यावत ऍपलच्य संगणकावर नदीच्या काठी एका झाडाखाली बसून बनवत असे व त्या विकून पोट भरत असे. एका दिवशी तो काम करत असताना त्याच्या टेबलावरील संगणक त्याचा धक्का लागून नदीच्या पाण्यात पडला. पंचतंत्रातील लाकूडतोड्याची गोष्ट वाचल्यामुळे त्याने नदी देवतेची प्रार्थना करायला सुरवात केलीं.पण यावेळी नदीदेवी सहजासहजी प्रसन्न न होता तिने त्याच्या प्रार्थनेत कितपत तथ्य आहे हे तपासण्यासाठी महिनाभर वाट पाहिली व नंतरच ती प्रकट झाली.व त्यानंतर तिनेही नित्याच्या प्रथेस अनुसरून त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. प्रथम तिने त्याला एक काड्याची पेटी दाखवली व त्याला विचारले, "हाच आहे ना तुझा संगणक ?"नदीदेवीचे संगणकविषयक अज्ञान पाहून निराश झालेल्या संगणक तज्ञाने मान हलवली व नाही असे उत्तर दिले.त्यानंतर तिने त्याला एक पेनसारखी दिसणारी वस्तू दाखवली आणि तो त्याचा संगणक आहे का अशी पृच्छा केली.त्यावर अगदी त्राग्यानेच मान हलवीत त्याने "नाही हा तर मुळीच नाही" असे उत्तर दिले.शेवटी त्याचा मूळचा संगणक आपल्या हातात घेऊन देवीने त्याला हा तरी त्याचा आहे का असे विचारले.अर्थात आता त्याला हो असेच उत्तर देणे भाग पडले.त्याच्या प्रामाणिकपणाचे नदीदेवीला कौतुक वाटले व ती त्याला तीनही वस्तू देण्याचा विचार करत असतानाच संगणकतज्ञाला आपली अक्कल पाजळल्याशिवाय बरे वाटेना शिवाय ती काड्याची पेटी आणि पेन यात त्याला मुळीच रस नव्हता त्यामुळे न राहवून तो बरळला, "माते, मला वाटत होते तू माझ्या संगणकापेक्षा काहीतरी वरच्या दर्जाचे संगणक अगोदर दाखवशील आणि मग माझा संगणक दाखवशील पण तू तर एक काडेपेटी आणि पेन मला दाखवून माझी अगदी दांडीच गुल केलीस."
     त्याचा हा अगाऊपणा पाहून रागावलेल्या देवीने उत्तर दिले, "महामूर्खा, ही गोष्ट मला माहीत नाही असे वाटले का तुला? पहिले दोन दाखवलेले ट्रिलेनियम व बिलेन्निअम संगणक तू इथे माझी प्रार्थना करत असताना गेल्या महिन्यातच बाजारात आले आहेत "असे म्हणून तिन्ही संगणकासह ती अंतर्धान पावली.तात्पर्य संगणक तज्ञाला तर आपले ज्ञान अद्यावत राखणे अत्यावश्यक आहे.