वासोटा - सत्यात उतरलेलं माझं एक स्वप्न

ऑगस्ट महिनाअखेर पासूनच वासोट्याच्या ट्रेक ची चर्चा चालू झाली. सगळ्यांना यायला जमावे म्हणून २ महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली.
पाच आणि सहा नोव्हेंबर हा दिनांक नक्की झाला आणि तूर्तत: ११ जण नक्की झाले. जोरदार जाहिरात झाली.
येणाऱ्यांची संख्या आता २५ झाली होती. हळू जळू दिवस जवळ येत होता. अनेक वर्षांपासून बघत आलेलं माझं हे एक स्वप्न आता साकार होणार होतं.
वासोट्याची ट्रीप उद्या-परवा वर येऊन ठेपली. प्रथेप्रमाणे ४ जणांनी अचानक कल्टी मारलीच.
पण  ह्या वेळेस भरपूर संख्या असल्यानं कमी संख्येचं काही वाटलं नाही.

आम्ही ४-५ लोकांनी पूर्ण दोन दिवसांची ट्रीप manage करायची होती. निऱ्या सराफ नि मस्त टाइम टेबल बनवले. काही मिनिटातच ते आम्ही सर्वांना पाठवले.
सर्वांनाच ट्रेक चा एकंदर कार्यक्रम आणि ठरवलेल्या गोष्टी भरपूर आवडल्या.
आमच्या चौघा-पाच जणांचा आदला दिवस धावपळीतच गेला. प्राश आणि चंदू नि सगळ्या वस्तू आणून ठेवल्या.
सगळी तयारी झाली. आता फक्त कधी एकदा प्रयाण करतोय हीच उस्तुकता लागून राहिली होती.
सुमंतांचे ८ मित्र त्यांच्या इथे आदल्या दिवशीच राहायला आले होते. पहाटे साडेचार ला माझ्या इथे जमायचं होतं.

वासोटा .. खरंतर त्याला मी कधीच भेटलो नव्हतो. तरीपण त्याचा एक पुसटसा चेहरा रोज डोळ्यांसमोर येत होता. तो बोलवत होता मला.
का कोणास ठाऊक, तो माझ्या मनाला एकदम जवळचा वाटत होता. अगदी राजगड सारखा. खरंतर ह्या गड-किल्ल्यांनीच आम्हाला त्यांच्या अंगाखांद्यांवर खेळू दिलं आणि आम्हाला लाडावून ठेवलं.
ह्याच्या आधी माझ्या ह्या जीवलग दोस्ताला भेटायची संधी माझ्यासमोरून निघून गेली होती. ( की कोणी मुद्दाम हिसकावून घेतली होती ते मी नक्की सांगू शकत नाही. ते राजकारण परत कधितरी मांडीन. असो. ).
विरह त्यामुळे आता सहन करायच्या पलीकडे गेला होता. एकवीस मधले सगळे जण कल्टी मारून गेले तरी मी आणि "लाल अप्पा" मात्र जाणारच होतो.
पण मला आणि आप्पाला दोघांना चं जायची पाळी आली नाही.
मेल मध्ये सांगितल्या प्रमाणे स्वाती (नव्हे चिमणी) अगदी प्रामाणिकपणे पहाटे साडेचार ला माझ्या घरात हजर होती. महेश उर्फ सिंघम ला मी कोथरूड वरून लाल अप्पा वर घेऊन आलो.
प्राजक्ताला पण आणलं. मग प्राश ( किंवा मुंगूस म्हणा हवंतर ) कडून सगळं सामान आणलं.
काही मिनिटांतच चंद्या( हत्ती) , सुमंत  ( उर्फ आसुमंत ) आणि त्यांचे सवंगडी आले.
पण ज्यानं हे टाइम टेबल बनवलं तो भावडा कुठेय ? निऱ्या सराफ ( उर्फ नागोबा ) खूप वेळ झाला तरी आलाच नाही. शेवटी चंदू भैइंनी घरी जाऊन एक ढुशी दिली तेव्हा हा बाबू जागा झाला आणि आवरून खाली आला. मग सगळ्यांच्या पोटभर शिव्या खाल्ल्या.

गाडी रात्री ३ लाच येऊन थांबली होती म्हणे खाली. नारळ फोडला आणि आम्ही सगळे निघालो. निऱ्या, चंद्या आणि प्राश गाडीमध्ये जागा नसल्याने बाइक घेऊन येणार होते.
वाटेत मस्तापैकी छत्रपती शिवाजी महाराजांची पद्य म्हणत आणि आमचे आधीच्या ट्रेक चे अनुभव सांगत आमचा प्रवास सुरू होता.
गड-किल्ल्यांवर का जायचे ? त्यांचे आताचे महत्त्व काय ? गड - किल्ले चढताना पाय कसे टाकावे, बूट कसे असावेत अश्या अनेक गोष्टींचे बौद्धिक मी लोकांना गाडीमध्ये बसल्या जागी दिले.
सुमंतांनी वासोटा किल्ल्याचा थोडाफार इतिहास सगळ्यांना संगीताला. सर्व माहिती ऐकून सगळे एकदम उत्साही वाटायला लागले होते.
सकाळी लवकर उठून आलेल्या आळसाला सगळ्यांनी बाय बाय केला होता.

साडेदहा च्या सुमारास बामणोली ला बस थांबली. राहायची जागा आधीच बुक केली होती. त्याबद्दल चौकशी करून खात्री करून घेतली. खरंतर बामणोली ला पोचायला आम्हाला थोडा उशीरच झालेला.
पण व्यवस्थित वेळ manage केला तर किल्ला नीट पाहून होईल अशी आमची ४-५ जणांची खात्री होती. आम्ही लगेचच बोटीचे तिकीट आणि वनविभागाची परवानगी काढायला हात-पाय मारले.
तिकिटे काढली आणि घाई करतच आम्ही बोटीत जाऊन बसलो. दीड तासांचा एकवेळचा प्रवास होता. दोन बोटी करण्यात आल्या.
शिवाजी सागराच ते विहंगम दृश्य डोळ्याचं पारणं फेडत होतं. कोयना धरणाच्या त्या विशाल पात्रातूनच आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता.
पण "तो" मात्र अजूनही कुठे दिसत नव्हता. नावाड्याला विचारल्यावर समजलं की अजून खूप पुढे गेल्यावर नदीच पात्र उजवीकडे वळत. मग त्याचं दर्शन होईल.
बोटीत संघाच्या पद्यांनी उधाण आले. महाराजांच्या घोषणा त्या विशाल "शिवाजी सागरात" घुमू लागल्या.
काही जण पहिल्यांदाच ट्रेक ला येत होते तर काही जण आमच्या बरोबर पहिल्यांदाच येत होते.
त्यामुळे हिंदी गाण्याऐवजी आम्हा संघी लोकांची पद्ये त्यांना आश्चर्यचकित करून जात होती.

मी मात्र बोट उजवीकडे कधी वळतेय त्याकडे लक्ष लावून बसलो होतो. काही वेळानं बोट उजवीकडे वळली आणि "त्यानं" त्या घनदाट जंगलाच्या पलीकडून वाकून पाहायला सुरुवात केली.
बोट पूर्णपणे उजवीकडे वळली आणि आता "तो" समोर उन्हात न्हात असताना दिसत होता. मी डोळे मिटले, आणि स्वप्नातल्या "त्या"च धूसर चित्र त्याच्या ह्या खऱ्या रूपानं बदलून टाकलं.
मनातूनच त्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणाला माझं एक स्वप्न साकार होताना मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो.

स्वाभाविकपणे लोकांचे फोटोसेशन चालू झाले होते. मस्त गप्पा- टप्पा आणि मजा करत आम्ही कोयना अभयारण्याच्या प्रवेशापाशी पोचलो.
घनदाट जंगल आणि त्यातून जाणारी पायवाट मनाला भुरळ घालत होती.
आम्ही सपासप किल्ला चढायला सुरुवात केली. रस्ता अगदी सरळ होता. झाडांनी पूर्णपणे झाकून घेतलं होतं त्यामुळे किल्ला दिसत नव्हता.
अखेर पायवाटेचा चढ तीव्र व्हायला लागला आणि किल्ला जवळ असल्याची जाणीव झाली.
इतक्या वेळ सर्वांच्या बरोबरीने मागून येणारा मी आपोआपच निऱ्या बरोबर सर्वात पुढे आलो होतो.
आणि अखेर.. आमचे पाय वासोट्याच्या भग्न दरवाजाच्या चौथऱ्यावर पडले आणि इतक्या दिवसांची लागलेली माझी हुरहूर शांत झाली.

वर गेल्यावर सगळे येईपर्यंत तिथल्या गवतावर मी जरा "५ मिनिट" पडलो. हळू हळू एकएक जण आला. सगळे आल्यावर प्रत्येकानं आपापला कोरडा खाऊ काढला.
सगळ्यांनाच भूक लागली होती. सगळ्यांनी भेळ, बिस्किटं असल्या खाऊ वर ताव मारला.
पोटोबा झाल्यावर किल्ल्याच्या एका बाजूला असलेल्या माचीसदृश बुरुजावर आमचा मोर्चा वळला. समोरच असलेला "बाबू कडा" त्याच अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करून बसला होता.
त्याच्या नावावरून तो आधी "बाबो" कडा असावा अशी चर्चा झाली. :)
तिथून किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेलं शंकराच मंदिर पाहिलं. आणि उत्तरेकडचा बुरूज पण पहिला. नागेश्वर आणि अनेक उत्तुंग शिखरे आपली डोकी वर काढून उभी होती.   
येता येता राणीच्या महालाचे अवशेष पहिले आणि लगेचच उतरायला सुरुवात केली. खाली आल्यावर लगेचच बोटींनी प्रवासास सुरुवात झाली. येताना सगळे खूप दमले आणि पेंगाळले होते.

राहायच्या बंगल्यावर आलो आणि तिथे लगेचच चूल पेटवून माग्गी ची आणि चहा ची तयारी सुरू झाली.
दांडू नी लोकल दर्जाची दूध पावडर आणल्याने ती कितीही टाकली तरी त्या चहाला दुधाचा रंग येत नव्हता. शेवटी सगळ्यांनी गोड मानून त्या चहाचं प्राशन केलं.
लगेचच माग्गी पण झाली आणि सगळ्यांनी त्यावर बेदम ताव मारला.
पोटोबा भरल्यावर सगळे जरा सुस्तावले होते. मग रात्रीच्या कार्यक्रमामध्ये ठरल्याप्रमाणे मी माझ्या नवीनच "गिफ्टेड" टेलिस्कोप नी चंद्र, गुरु, त्याचे ३ उपग्रह, आणि कृत्तिका दाखविली.
निरंजन नी गिटारावर मस्तापैकी ४-५ गाणी वाजवून उपस्थितांची मने जिंकली. सुमंतांनी काही वैज्ञानिक माहिती सांगितली. श्रेयस आणि आमोद नी "नाना" नावाचा एक खेळ शिकवला.
२ मिनिटांच्या त्या खेळात सगळे मनमोकळे हसायला लागले होते.
पहाटे ५ ला जेव्हा सगळे एकत्र जमले होते, तेव्हा कोणीच कोणाचे ओळखीचे नव्हते. पण आता मात्र सगळे एकमेकांचे अगदी जिगरी झाले होते. :)

क्रमशः: