वासोटा - सत्यात उतरलेलं माझं एक स्वप्न (अंतिम भाग)

दुवा क्र. १ वरून पुढे ..
 
रात्रीचे सगळे मनोरंजन कार्यक्रम उरकले, आणि काही लोकांच्या पोटात परत एकदा कावळे ओरडायला सुरुवात झाली.
भिजत घातलेल्या तांदुळाची खिचडी करण्यात आली. सोबतीला लोणचे आणले होतेच. काही जणांनी नको नको म्हणता म्हणता दाबून खिचडी हाणली.
रसोई खाते प्रशांत सांभाळत होता. स्वाती, नवनाथ पण त्याला मदत करत होते. त्यांनी अगदी सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी खिचडी बनवली होती. :)
खिचडी खाऊन सगळे डाराडूर झाले.

सकाळी मला सुमंत आणि प्रशांत नी गदागदा हालवून उठवले तेव्हा चहा तयार होता आणि पोरींनी पोह्याची तयारी सुरू केली होती. :P
मोनाली नी पोहे केले होते. ते पण खूपच स्वादिष्ट झाले होते. ते खाऊन सगळ्यांनी आवरायला सुरुवात केली.
उशिरा उठण्याची शिक्षा म्हणून मला पातेलं धुवायला लागलं :( हे सगळं होईपर्यंत श्रेयस नी बोटी ची तिकिटे काढून आणली होती.
सर्व अनावश्यक समान गाडीत ठेवलं. खाऊ च्या पिशव्या आणि पाणी घेऊन सगळे परत एकदा बोटीतून प्रवासास निघाले.

महेश सिंघम ने पत्ते आणले होते. बोटीमध्ये चॅलेंज आणि झब्बू ला उधाण आले होते. , मी त्या वेळेस बोटीमध्ये "जरा पडलो" होतो.
पुढे जाताना वाटेत एक पांढऱ्या मानेचा अत्यंत देखणा गरूड आम्ही पहिला.
बोट पलीकडे पोचली आणि लगेचच सगळ्यांनी पायवाट पकडली. नागेश्वर ला धबधब्याच्या रस्त्याने जायचं ठरलं. वाट एकदम खडकाळ, गोल गरगरीत दगड धोंड्यांनी भरलेली होती.
प्रत्येक जण एकदा तरी त्या धोंड्यांवरून घसरून पडलाच ! त्यावरून चालताना दीप्ती च्या नाकीनऊ आले होते. आणि वाटेत त्रास द्यायला जळू होत्याच.
असल्या खडकाळ मार्गावरून चालायची बऱ्याच जणांना जास्ती सवय नसल्याने नागेश्वर ला वरती पोचायला आम्हाला जवळपास तीन वाजले.

लगेचच खाऊ च्या पिशव्यांचे आवाज परत एकदा चालू झाले. शंकरपाळ्या, करंजी, भुगा झालेले बेसनाचे लाडू, आणि मेथीचे खाकरे ह्यांवर सगळ्यांनी ताव मारला.
मग १५-२० पायऱ्या वर चढून गुहेत गेलो आणि शंकराच्या पिंडीच दर्शन घेतलं. तिथे लोकांचे परत एकदा फोटोसेशन चालू झाले.
खरंतर शंकराच्या पिंडीपेक्षा आम्हा वेड्यांना खुणावत होते ते सह्याद्रीचे अभेद्य कडे. गुहेच्या इथूनच एक विचित्र घसरडी अवघड पायवाट पुढे जाताना दिसली.
चंद्र, प्राश आणि मला त्यावरून पुढे जायचा मोह काही आवरला नाही. कोणी आमच्याबरोबर येऊ नये ह्यासाठी कोणाचे फारसे लक्ष नाही हे पाहून आम्ही तिघे त्यावरून पुढे गेलो.
(सगळेच आले असते तर वेळ गेलं असता आणि मग सुमंतांनी आम्हाला कच्चा खाल्ला असता.)

त्या घसरड्या पायवाटेवरून ५-१० पावले पुढे गेलो आणि समोर पाहतो तर काय ... तो अभेद्य, प्रचंड, विक्राळ सह्याद्री त्याचे पाय मस्तापैकी कोंकणातल्या मातीत सोडून बसला होता.
त्याचे ते अतीभक्कम उभेच्या उभे कडे स्वराज्याचं रक्षण करत होते. अनेक गगनचुंबी शिखरे स्वराज्यावर चौफेर नजर ठेवून होती. डाव्या बाजूला वासोटा ताठ मानेने उभा होता.
सह्याद्रीचे हे लोभस दर्शन घेऊन त्याला दंडवत घातला. ती वेळ आणि जागा अशी होती की अश्या एकांतातून परत जाऊच नये असं वाटत होतं.
तितक्यात सगळ्यांची मागे निघायची लगबग सुरू झाल्याच ऐकायला येत होतं. हाका कानी पडू लागल्या.
"लवकरच परत भेटू !" असं त्या सह्याद्रीला म्हणून आम्ही तिघे तिथून मागे फिरलो.

परत जाताना वेगळ्या वाटेनं जायचं होतं. ही वाट पुढे जाऊन वासोट्याला जी वाट जाते त्या वाटेला मिळणार होती. त्या डोंगररांगेच्या अगदी टोकावरून आम्ही चाललो होतो.
उजवीकडे सह्याद्रीचे अजस्त्र कडे आणि कोंकण यांचे विलोभनीय दृश्य नजरेस पडत होते. तर डावीकडे कोयनेच्या खोऱ्यातील घनदाट जंगल. ही वाट तुलनेनं अवघड होती. त्यामुळे सगळ्यांनी बरोबर चालायला वेळ लागत होता. कोणत्याही परिस्थतीत ५ च्या आत खाली पोचणं भाग होतं. नाहीतर नावाडी आम्हाला ना घेताच परत फिरले असते.
अज्या, प्राश आणि मी भरभर पुढे जाऊन नवा रोखायचे ठरले. सपासप पावले टाकत आम्ही निघालो.
हळूहळू अंधार पडायला लागला होता. रातकिड्यांची किर्रकिर्र एकेका क्षणाला दुपटीने वाढत होती.
खाली आलो तेव्हा अपेक्षेनुसार नावाडी वाट पाहून खूप वैतागले होते. त्याचं कसबसं सांत्वन करतोय तोच सगळे सवंगडी खाली आले. आणि लगेचच सगळे लोक बोटीत बसले. अंधार वाढत चालला होता. त्यामुळे दोन्ही बोटी जरा जोरातच चालल्या होत्या. सगळे मावळे इतके दामले होते की सर्वांनीच बोटीत पडी टाकली.
काही वेळानं बामणोलीला पोचलो. तिथे "वेटिंग चार्ज" साठी नावाड्यांबरोबर थोडी हुज्जत घातली. अचानक एका सापाने दिलेल्या दर्शनाने हा विषय बाजूला पडला.

सगळे गाडीत जाऊन बसले आणि लगेचच आम्ही निघालो. ह्या वेळेस मी लाल आप्पा वर होतो. प्राश त्याची मेजोर खर्रब मारत होता. येताना साताऱ्यात राजवाडा परिसरात कच्छी दाबेली खाण्यात आली.
आम्ही "पाणीपुरी वेड्यांनी" २-२ प्लेट अप्रतिम चवीची आणि प्रचंड मोठ्या मोठ्या आकाराच्या पुऱ्या असणारी पाणी पुरी हाणली. (पुण्यातल्या पुऱ्या खूपच सूक्ष्म आकाराच्या असतात).
पेट्रोल भरून आमच्या बाइक्स एकदाच्या एनएच ४ ला लागल्या आणि गाड्यांचा वेग ७५-८० च्या दरम्यान स्थिरावला.
येताना निऱ्या उर्फ नाग मागे बसला होता. त्याला झोप इतकी अनावर झालेली की तो अक्षरशः: मागे बसून डुलत होता. त्याला गदागदा हालवून जागा केला. तिथून गाडी इतकी जोरात मारली की नाग परत डुलायच्या आधीच लाल आप्पा मंडई मध्ये हजार होती.
मोठी गाडी सर्वांना आपापल्या घरी सोडून आरामात येत होती.

काही वेळानं मोबाईल फोन, मेसेजेस झाले आणि वासोट्याचा हा एक मस्त खुसखुशीत अनुभव घेऊन सगळे घरी सुखरूप परतले असल्याची खात्री झाली.

समाप्त.