सोन्याची साखळी अणि वेडा

एक सोन्याची साखळी होती. खूप सुंदर, मोहक. अनेक रत्नांनी सजलेली ! ती कोणाच्याही मालकीची नव्हती. स्वतंत्र होती. कोणाचीही नजर जावी आणि त्याला ती आपल्याकडे हवीहवीशी वाटावी.
प्रत्येक जण आपापल्या परीनं तिला स्वतः:कडे ओढायचा प्रयत्न करायचा. 
मग ती साखळी अजूनही स्वतंत्र कशी होती? तिचा कोणीच कसं मालक नव्हता.? त्याचंही एक कारण आहे. 
त्या साखळीच्या सोन्यामध्ये आणि त्यातल्या हिऱ्यामध्ये एक वेगळीच गंमत होती. 
त्या साखळी मध्ये  असलेल्या रत्नांना स्वतः:ची अशी "आवड" होती. त्यामुळे आपल्याला जी व्यक्ती आवडेल त्याच्याच गळ्यात असल्यावर ती साखळी एकदम चकाकून दिसायची.
सगळी रत्ने एकदम चमचम करायला लागायची. मोहक रंगांची चौफेर उधळण व्हायची.
सगळ्यांचीच तिच्यावर नजर होती. पण सगळे लांबून बघायचे आणि समाधान मानायचे. कारण आपण तिला गळ्यात घातल्यावर ती चमकेलच ह्याचा त्यांना विश्वास नव्हता. 
काहींनी व्यर्थ प्रयत्न केला होता ती माळ गळ्यात घालायचा पण त्यांना काही ती नीट सूट झालीच नाही.
पण त्यांची हाव मात्र संपली नव्हती. कधीच नाही संपली .. आजपर्यंत नाही ... 
कोण कुठून अचानक एकदा एक वेडा आला. आणि त्याच्या दृष्टीस ती साखळी पडली. त्याला खूप आवडली. त्यानी कसलाही विचार केला नाही आणि ती साखळी उचलली आणि गळ्यात घातली. 
आणि आश्चर्य म्हणजे ती साखळी इतकी चमकू लागली. त्यातल्या रात्नांमधून इंद्रधनू चे रंग बाहेर पडू लागले. आतापर्यंत ती अशी कधीच चमकली नव्हती. 
वा.. काय जोडी शोभतेय .. लोक म्हणायचे. 
वेडा ती साखळी घालून खूप मिरवायचा. त्या चाकाकिनी त्याला अस वाटायला लागलं की ती साखळी आपलीच आहे. कारण साखळी त्याच्याच गळ्यात सर्वात जास्ती चमकत होती. त्यांची जोडी चमकू लागली.
साखळीच्या मोहात असलेल्या काही लोकांना मात्र हे काही पटत नव्हत. वेडा आणि साखळीची हीच जोडी काही लोकांच्या नजरेत भरू लागली. त्यामुळे स्पर्धा चालू झाली. 
ती साखळी वेड्याच्या गळ्यात चमकू नये त्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालू केले. भले भले लोक येऊन ती साखळी स्वतः:च्या गळ्यात घालून हिंडू लागले. आज ह्याच्या गळ्यात तर उद्या त्याच्या. 
प्रत्येक जण आपापल्या परीनं ती साखळी घालून मिरवू लागला. वेड्याचा गळ्यात ती साखळी कमीत कमीत कश्या प्रकारे जाईल अशी अनेक लोक खबरदारी घ्यायला लागले.
ती साखळी जरी त्यांच्या गळ्यात चमकत नसली तरी ती मुळात: खूप छान होती. तिला ज्यांनी परिधान केलंय, त्याच्यापेक्षा लोकांची नजर साहजिकच तिच्याकडेच खिळलेली असायची. 
साखळीचा नक्की मालक कोण ह्याचा इतर लोकांना संभ्रम होऊ लागला. 
वेडा मात्र ह्याला खूप वैतागला. त्याच्या हक्काच्या साखळीला कोणीही दुसऱ्याने गळ्यात घालू नये ह्यासाठी वेड्यानं अनेक खटाटोप केले. पण त्याचा फार उपयोग झाला नाही. 
साखळी "आपल्या गळ्यात जितकी चमकते, तितकी कोणाच्याही गळ्यात चमकत नाही" हे त्याला माहीत होतं. त्यामुळे तिला कुलुपात बंद करून ठेवायचा प्रश्नच नव्हता. कारण मग तसं केलं असतं तर तो तिचापण अपमान झाला असता. 
साखळी वरून अनेक वादावाद झाले. वेड्याच्या जीव अगदी सोलवटून निघत होता..
खूप प्रयत्न करून थकलेल्या वेड्याला एका क्षणाला असा वाटायला लागलं की "ती साखळी आपली नाहीये". तिला गळ्यात घालायची वेळ जरी आली तरी वेड्याला पूर्वीइतकी आपुलकी वाटत नव्हती. 
शेवटी ह्या त्रासाला कंटाळून वेड्यानं त्या साखळीचा मोह आवरता घेतला. आणि तिला परत कधीच गळ्यात न घालायचा निर्णय घेतला.
साखळी अजूनही तशीच आहे. सगळ्यांची नजर तिच्यावरच खिळलेली असते. पण एक मात्र नक्की आहे. वेड्याच्या गळ्यात असल्यावर ती जशी चमकायची, तशी ती कोणाच्याच गळ्यात चमकत नाही.!