खरे..... खोटे...

खरे.... खोटे......

दाणापाणी संपे येथील, नवीन शोधा चला उठा
कोण इशारे करतो आतून, धुंडायाच्या नव्या दिशा

दिवसामागून येती राती, वर्षामागून वर्ष सरे
किती समय तो रमलो येथे, निघणे आता हेची खरे

मित्र मिळाले केल्या गोष्टी, सुखदू:खाच्या त्यांसंगे
भावुक मन ते आत हुरहुरे, भेट पुन्हा योगायोगे

सळसळणारा प्रवाह हा तर, जीवनसरिता नाव खरे
थांबायाचे नाव न येथे, वाहत वाहत तरायचे

गढूळ डबकी नकोच काही, कुजून नाही पडायचे
"चला पुढे" या जीवनमंत्रा, मनापासुनी जपायचे

खंत न उरली सुखदु:खाची, क्षणिकाचे ओझे "खोटे"
क्षणोक्षणी बदलाचे वारे, "खरे" कशाला म्हणायचे.........