हे काय कसे घडले ?

 " अरे वसून डायव्होर्स घेतला म्हणे ! " विकास घरी आल्या आल्या शुभानं त्याच्या कानावर बातमी घातली.

" पण असे काय झाले तरी काय इतक्या टोकाचा डिसीजन घ्यायला ? दोघांच तर चांगलं जमत होत "

" अस आपल्याला वाटतंय प्रत्यक्षात त्या दोघात काय घडत होते ते आपल्याला काय कळणार ?"

" खरं आहे, पण आजकाल हे फारच वाढलंय, जरा काही पटेनास झालं की द्या घटस्फोट "  विकास अस म्हणून आत जाऊ लागला तेवढ्यात फोनची रिंग वाजली त्यामुळे त्यानं फोन उचलला.

" हॅलो विकास, बाबा बोलतोय"

"कसे आहात बाबा ? "

"  तसं सगळं ठीकच आहे म्हणायचं "

" काय झालेय काय बाबा नेहमीसारखा वाटत नाही तुमचा सूर.? "

" एक गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे खूप दिवस विचार करतोय "

" मग बोला ना त्यात एवढा काय विचार करायचा आहे?  नीट सांगा बघू काय झालेय ते ? "

" आता खरं तर सांगण्यासारखं काही राहिलं नाही आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलीय "

" हो पण काय करायचा विचार आहे तुमचा ? "

" काही नाही घटस्फोटासाठी अर्ज देतोय पुढच्या शनिवारी "

" काय काय सांगताय काय बाबा असे झालेय तरी काय ? "

" काय झाले म्हणून काय विचारतोस, आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आता सगळे संपवूनच टाकतोय. "

" उगीच काय बोलताय बाबा, मी आईला चांगले ओळखतो, ती किती काळजी घेते तुमची माहीत नाही का आम्हाला ? "

"अरे तो सगळा देखावा तुला काय माहीत आहे गप्प बसून ती माझा कसा कोंडमारा करते पण इतके दिवस तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मुकाट्याने सहन करत होतो. किती वेळा याच्या पूर्वीही असा विचार मनात आला होता पण त्यावेळी तुम्ही लहान होता म्हणून विचार केला केवळ स्वतःचा विचार केला तर तुमचे कसे होणार आता तसे काही नाही. तू तिकडे अमेरिकेत चांगली नोकरी करत आहेस, प्रतिमाही आपल्या नवऱ्यासह जर्मनीत खुशीत आहे मग आता मी तरी स्वतःचा विचार केला तर काय बिघडते ? "

" तुमचा एकट्याचा हा विचार झाला बाबा पण आईचे काय ? तिचा विचार केलात का? जरा आईशी बोलू का ? द्या बरं तिला फोन "

" आई, बाबांनी  हे  काय ठरवलंय आणि तू हे मान्य करतेस ? "

" मग काय करू ? पन्नास वर्षे मी त्यांचा  छळ केला आता तरी सुखात चार दिवस काढू दे त्यांना ! "

" आणि तुझं काय ? "

" मला काय माझी पेन्शन आहे आणि तुम्ही दोघ आहातच ना ? "

" हे बघ आई तू काळजी करू नकोस. असे काही होणार नाही, दे बरं त्यांना फोन "

" बाबा, आम्ही तिकडे येतोय आपण काही तरी मार्ग काढू पण असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आणी प्रतिमाला बोललात का? "

" नाही तुलाच प्रथम सांगतोय तिलाही करणारच आहे फोन"

फोन   बाजूला ठेवत शुभाला काय सांगावे याचा विचार विकास करू लागला. तो काही म्हणण्यापूर्वीच तिनेच विचारले,

" काय रे असा का चेहरा झालाय ? "

" काय सांगू तुला, फोन बाबांचा होता . "

"मग काय म्हणाले ? सगळं ठीक आहे ना ? "

" तसं सगळं ठीकच आहे पण बाबांनी हे कसलं खूळ डोक्यात घेतलेय कळत नाही."

" अरे स्पष्ट काय झाले का सांगत नाहीस ? "

"अग बाबा म्हणताहेत ते आईला घटस्फोट देणार आहेत . "

" काऽऽऽय ?" एकदम शुभा जवळ जवळ किंचाळलीच.

" उगीच थट्टा करू नको माझी , हे शक्यच नाही. "

" ठीक आहे मग तूच फोन करून विचार . "

तिने फोन लावला पण एंगेज्ड लागला.

" काय झालं ? " विकासने विचारले

" एंगेज्ड लागतोय" शुभा म्हणाली

" मग ते ताईशी बोलत असतील " विकास म्हणाला.

" मग तू काही काळजी करू नकोस ती बरोबर बाबांना पटवेल "

" बघू या काय होते ते " विकास हताश होत उद्गारला. तेवढ्यात परत फोनची रिंग वाजलीच

" हॅलो, विकास का? "

" हो ताई मी विकासच बोलतोय काही विशेष ? "

" अरे तुला बाबांचा फोन आला ना ? "

" हो मी तुलाच फोन करत होतो पण ---"

" अरे मी बाबांशीच बोलत होते , तुला त्यांनी काही सांगितले का? "

" माझा तर विश्वासच बसत नाही तुला काय म्हणत होते ? "

" मला तरी काय जे तुला सांगितले तेच सांगितले . "

" मग तू काय म्हणालीस ? काही उपयोग झाला का तुझ्या बोलण्याचा ? "

" नाही ते काही माझं ऐकायला तयार नाहीत. मी म्हटले आता या वयात तुमची काळजी आईशिवाय कोण घेणार याचा तरी विचार करा . "

" बरोबर आहे. तसं माझ्याकडे मी त्यांना आणीन पण तरी आम्ही दोघेही नोकरी करणार आणि मुलं शाळेत जाणार त्यांना येथे एकटे वाटणार"

" अरे त्यांनी त्याचाही विचार केला आहे म्हणे ते पुन्हा लग्न करणार आहेत. "

" काय सांगतेस काय? या वयात कोण करणार आहे लग्न त्यांच्याशी. "

" काही कल्पना नाही पण त्यांनी तसेच ठरवले आहे म्हणे. "

  " मग आपण काय करायचं ? की नुसतं बघत बसायचं ? "

' नाही मी त्यांना सांगितले आहे मी तिकडे येतेय , म्हणजे आम्ही सगळेच जातो आणि बघू सांगून त्यांना, आम्ही येईपर्यंत काही करू नका" अस बजावून सांगितले आहे तू पण चलतोस का ? आपण सगळेच गेलो की त्यांना समजावून सांगता येईल शिवाय आईलाही बरे वाटेल. "

" ती काय म्हणतेय ? "

" ती काय म्हणणार आहे ? मला काही बोलायचं नाही म्हणते. "

" उघडच आहे. मग तुम्ही केव्हा निघताय आम्ही त्याच सुमारास निघतो "

" शक्य तेवढ्या लवकरची तिकिट बघतो आणि निघतोच "

मुंबईच्या विमानतळावर जणू त्यांची वाटच पाहत असल्यासारखे दिलीपकाका त्यांना दिसले,

" काका, तुम्ही कसे काय --- "

"पण विकासच वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच दिलीपकाकांनी त्यांच्या ट्रॉलीचा ताबा घेतला आणि  " चला, चला लवकर, मी गाडी घेऊन आलो आहे. सरळ घरीच जाऊ " म्हटल्यावर विकास प्रतिमाला त्याच्या मागे जाणे भाग पडले.

" हो पण काका ही काय भानगड आहे ? " प्रतिमाला विचारल्याशिवाय राहवलं नाही . आश्चर्य म्हणजे काहीच घडले नाही असा त्यांचा चेहरा दिसत होता.

"भानगड वगैरे काही नाही.  घरी गेले की सगळं कळेल. "

पुण्याला घरी पोचेपर्यंत दिलीपकाका अगदी मोकळेपणाने बोलत होते असा काही गंभीर प्रकार घडल्याचे जणू त्यांच्या गावीही नव्हते. मुलांना तर काय बरेच दिवसांनी आजी आजोबा भेटणार याचाच आनंद ! विकास व प्रतिमा यानी त्यांना आपण भारतात का निघालो आहे याचा पत्ता लागू दिलाच नव्हता.त्यामुळे गाडीत त्यांच्यासमोर काही बोलणे शक्यच नव्हते मग काय बाबांनी थट्टा केली की काय अशी शंका दोघांच्याही मनात येऊन गेली तसे असेल तर बरेच झाले . पण गाडी घराबाहेर थांबल्यावर निर्मलामामी घरातून बाहेर आली आणि त्यांच्याकडे बघून म्हणाली " सगळीजणं लवकर फ्रेश होऊन कार्यालयाकडे या. आम्ही सगळे तेथेच आहोत. "

" कार्यालयाकडे कशाला ? "

" म्हणजे लग्न आहे ते तुम्हाला दिलीपकाकानं सांगितलंच नाही का?बरं मी पुढे होते दिलिपकाच्याबरोबर या तुम्ही  " म्हणून मामी गेलीही.

" म्हणजे लग्न आहेच म्हणायचे, आम्ही येईपर्यंत थांबा सांगितले होते पण तेवढाही दम याना धरता आला नाही तर " प्रतिमा विकासच्या कानात कुजबुजली .

" आई कुणाच लग्न ? मामाच लग्न आहे का ? " मुलांनी सुरवात केली.

" हो हो अगोदर स्वच्छ स्नान करा आणि चला कार्यालयात तिकडे गेल्यावर कळेलच सगळं " दिलिपकाकांनी मध्येच सगळ्यांना बजावले. आणी घरात शिरल्यावर सगळ्यांना स्नानगृहात ढकललेच.

         कार्यालयाच्या दारातच बाबांची मित्रमंडळी हसत गप्पा मारत उभी असल्याचे दिसले. विकास, प्रतिमा याना पाहिल्यावर सगळ्यांनी

" सुस्वागतम् अमेरिका आणि जर्मनी केव्हा आली ? " म्हणून त्यांचे स्वागत केले. त्यांच्याही मुद्रा अगदी आनंदित दिसल्या कार्यालयात प्रवेश करताच समोर वैदिक विधी चाललेले दिसले आणि एका चौरंगावर भगवंतराव म्हणजे बाबा दिसले.  आता हे कोणाशी  लग्न  करायला  निघाले आहेत याची उत्सुकता विकास व प्रतिमा यांच्या मनात होती, पण समोरील चौरंग रिकामा होता. त्यामुळे विकास आणि प्रतिमा यांच्या मनातील गोंधळ आणखीच वाढला.शिवाय आईचा पत्ता कोठेच नव्हता. बिचारीला कस यावंसं वाटणार. प्रतिमाला तर वाटलं बाबांना तेथल्या तेथे जाब विचारावा काय हा सगळा प्रकार चालवलाय म्हणून. तेवढ्यात समोरच्या चौरंगावर डोक्यावरून पदर घेतलेली व डोक्यास मुंडावळ्या बांधलेली स्त्री आली आणि गुरुजींनी अंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणायला सुरवातही केली. अर्थात यापुढे जे होईल ते पाहत राहण्याशिवाय दुसरे काही करता येणे शक्यच नव्हते.शेवटी मंगलाष्टक संपली व वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात टाळ्यांच्या गजरात हार घातले आणि प्रतिमा व विकास नवविवाहित जोडप्याकडे धावलेच.

      " या, या, अग पाहिलंस ना सगळे आले की नाही आपल्या लग्नाला ?" बाबांनी अस म्हटलं आणि पलीकडच्या स्त्रीने चेहऱ्यावरील आवरण बाजूला करून दोघांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि दोघे आश्चर्याने सर्दच झाले कारण पलीकडील स्त्री आईच होती.

" हा काय प्रकार आहे बाबा ? "

" अग दादाचा हा सगळा डाव होता त्याने माझ्याशी पैज मारली होती माझी दोन्ही पोर आणि नातवंड आमच्या लग्नाला येतील म्हणून " दिलीपकाका मध्येच टपकले.

" पण हे लग्न कसलं काका ? "

" अरे त्याच्या लग्नाला पन्नास वर्ष झाली ना मग हे अस पुन्हा एकदा लग्न करतात."

" इतकी वर्ष एकमेकाला त्रास दिल्याबद्दल ही शिक्षा "  गुरुजी हसत हसत म्हणाले.

" हॅपी मॅरिड लाइफ भगवंतराव आणि पुष्पाताई. " बाबांची मित्रमंडळी तोवर त्यांचं अभीष्टचिंतन करायला तेथे गर्दी करू लागली होती.