प्रिय देवा,

   
      जॉन एका पोस्ट ऑफिसात काम करत असे व ज्या पत्रावरील पत्ते अगम्य असत अशी पत्रे योग्य स्थळी पाठवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. एक दिवस एक पत्र त्याच्या टेबलावर आले त्यावर " प्रती देव" एवढाच पत्ता थरथरत्या हाताने लिहिलेला पाहून त्याने ते उलटपालट करत पाहिले शेवटी ते पाकिट फोडून ते वाचण्याचे त्याने ठरवले. पत्र असे होते
प्रिय देवा,
      मी ८३ वर्षाची म्हातारी विधवा आहे आणि नवऱ्याच्या तुटपुंज्या निवृत्तिवेतनावर कशीबशी गुजराण करत आहे. तशात परवाच माझा बटवा कोणीतरी चोरला त्यात १०० डॉलर्स होते आणि माझ्याक्डे पुढील निवृत्तिवेतन मिळेपर्यंत वापरण्यासाठी तेवढीच रक्कम होती. पुढच्याच रविवारी नाताळाच्या निमित्त माझ्या दोन मैत्रिणींना मी जेवायला बोलावले आहे. आणी आता त्यांच्यासाठी जेवायला काही करण्यापुरतेही पैसे माझ्याकडे उरले नाहीत. कोणाकडे मी मागीन म्हटले तर तसेही माझे कोणी परिचित नाही.तेव्हां आता तूच काय तो मला आशेचा किरण आहेस. देवा मला मदत कर.
तुझीच विश्वासू, एडना
     पत्र वाचून जॉनला गंहिवरून आले. आपल्या आईचीच त्याला आठवण झाली. त्याने ते पत्र आपल्या बरोबर काम करणाऱ्या इतरांना दाखवले, सर्वानाच त्याच्याप्रमाणेच वाटल्याने प्रत्येकाने जमेल तेवढी रक्कम त्याच्या हवाली केली‌. शेवटी त्याच्याकडे ९६ डॉलर्स जमा झाले ते मग त्याने एका पाकिटात घातले आणि त्या म्हातारीच्या पत्त्यावर ते  पाठवून दिले. आता एडना किती आनंदित होईल व आपल्या मैत्रिणींना जेवायला बोलावून आपल्या आनंदात त्यांना कसे सहभागी करून घेईल याविषयी कल्पना करत आपण एक सत्कृत्य केल्याच्या आनंदात जॉन आपल्या कामात गढून गेला.  
       ख्रिस्तमस होऊनही गेला.थोड्याच दिवसांनी त्याच म्हातारीकडून देवाच्याच पत्त्यावर आणखी एक पत्र आले.जॉनचे सगळे सहकारी त्याने ते पत्र उघडल्यावर मोठ्या औत्सुक्याने त्याच्याभोवती जमले.
पत्रात लिहिले होते,
  प्रिय देवा,
मला केलेल्या मदतीबद्दल तुझे आभार कोणत्या शब्दात मानावे कळतच नाही. तुझ्या भेटीमुळे मी माझ्या मैत्रिणींना अतिशय चांगली मेजवानी देऊ शकले. तो दिवस किती आनंदात गेला म्हणून सांगू. माझ्या मैत्रिणींना तुझ्या या आनंददायक भेटीविषयी सांगितले व त्यानाही माझा खूप हेवा वाटला.
    पण देवा कसे सांगू तुला तू पाठवलेल्या पैशातले चार डॉलर्स पोस्टातल्या त्या कर्मदरिद्री कर्मचाऱ्यांनी ढापलेले दिसतात.
तुझी एडना
       लहानपणी आपण सगळ्यानीच वाचलेली एक गोष्ट अशी होती. एका बाईचा लहान मुलगा चुकलेला असतो,
त्याला सुदैवाने एक सदगृहस्थ भेटतो व त्याला नाव गाव वगैरे माहिती विचारून
मोठ्या प्रयासाने तो त्याच्या घरी त्याला पोचवतो व त्याच्या आईच्या
स्वाधीन करतो व आता ती काहीतरी कौतुकाचे उद्गार काढेल अशा अपेक्षेने
तिच्याकडे पाहत राहतो तेव्हां ती बाई आपल्या मुलाला जवळ घेऊन त्या
गृहस्थाकडे पाहत म्हणते , " भल्या गृहस्था, तू माझ्या मुलाला शोधून आणलेस
त्याबद्दल धन्यवाद, पण त्याची टोपी कुठे गेली? तो हरवला तेव्हां ती त्याच्या डोक्यावर होती. " वरील विरोप वाचल्यावर एकदम त्या  गोष्टीचीच  आठवण झाली.