संदर्भः
नववर्षाच्या शुभेच्छा!! याचसाठी म्हणून काही लिहावे म्हटले, पण भराभर ओळी सुचत गेल्या अन् लिहित गेलो.
या कवितेसाठी मागच्या ज्ञात इतिहासापासून ते आजपर्यंत घडलेले कोणतेही मृत्यूचे तांडव उदाहरणादाखल घेता येईल, ज्याला जे म्हणून घ्यायचे ते घेण्यास अडचण नसावी. पण त्यातून काहीतरी स्फूर्तीदायक अंगांगातून शिरशिरत उठले पाहिजे म्हणजे ही कविता लिहिल्याचे सार्थक झाले.
अरे मानवा, नववर्षाला भेट परंतू, थांब जरासा..
आठव थोडा मृत्यूचा तो नाच पुन्हा अन्.. थांब जरासा..
दे त्यालाही काही क्षण अन् समजुन घे त्या तीव्र वेदना..
उमजून त्यांचा अर्थ, उरातून, पाझर फुटू दे, थांब जरासा..
धावून जाती कोण कशास्तव, ज्याचा त्याचा मार्ग निराळा..
लोणी बघ ते, हृदयातिल का टाळूवरचे, थांब जरासा..
कुण्णाकुण्णावर नको वेळ ती.. नसतो जेव्हा कुठला खांदा..
त्या अश्रुंची धग सोसाया, सर्वस्व जळते, थांब जरासा..
त्या अश्रुंतुन रक्त उठावे, वा उमलावे अंकुर पुन्हा?
प्रश्न पडावा कधीतरी हा, उत्तर येईल, थांब जरासा..
--
संकल्प नाही विचार केवळ, दृढनिश्चय तो उद्धरणारा!
शिवरायांचा तो संकल्प; अपुला? पुन्हा करावा विचार जरासा..
राघव