मी तुला

मी तुला सर्वस्व माझे मानले होते जरी

प्रीत तू केलीस तेव्हां ती कुठे होती खरी.

कोणत्या या वादळाने तोडल्या या पाकळ्या

अन् मनाला जखडताती कोणत्या या साखळ्या

वेदनेच्या बरसल्या होत्या इथे काही सरी.

ते सुखाचे भास होते भोवतीने दाटले

तू दिला होता निखारा फूल होते वाटले

स्वप्न ते मी सत्य तेंव्हा मानले होते तरी.

वेगळी झालीस तू अन् वेगळा मी ही अता

अंतरीचा प्रीत गंधच जाहला आहे रिता

सांग ना तू तूच ना ही पाडली आहे दरी.