वकिली कावा पण फसलेला !

                ही घटना अमेरिकेत शर्लो (Charlotte)उत्तर कॅरोलिना मध्ये घडलेली आहे.
                एका वकिलाने अतिशय दुर्मिळ आणि किंमती सिगारची पेटी खरेदी केली.आणि त्या सिगार्सचा आगीपासून संरक्षणार्थ विमा उतरवला. त्याने महिन्याभरात त्या सर्व सिगार्सचा स्वतःच फुंकून फडशा पाडला आणि त्यानंतर विमा उतरवणाऱ्या कंपनीकडे विम्याच्या रकमेची मागणी केली त्यासाठी त्याने असा दावा केला की सर्व सिगार्स निरनिराळ्या छोट्या छोट्या आगीत जळून गेल्या.विमाकंपनीने अर्थातच त्याचा दावा अमान्य केला आणि त्या व्यक्तीनेच त्या सर्व सिगार्स फुंकून संपवल्या असे म्हणत विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. त्यावर वकिलाने दावा केला आणि तो जिंकलाही.
असे कसे झाले ? कायदा खरच गाढव असतो ?
         पण तसे झाले. निकाल देताना न्यायाधीशाने हे मान्य केले की हा खटला चुकीच्या पायावर उभा आहे पण त्याचबरोबर पॉलिसीमधील शर्तीनुसार कोणत्या प्रकारच्या आगीचा या प्रकारच्या पॉलिसीमध्ये समावेश होत नाही याचा उल्लेख नसल्यामुळे व सिगार आगीनेच जळून गेल्या हे निश्चित झाल्यामुळे   वकिलाचा दावा मान्य करण्यासारखा आहे. त्यावर अपीलाची वेळकाढू व खर्चिक बाब टाळण्यासाठी विमा कंपनीबेही वकिलाने मागणी केलेली १५,००० डॉलर्सची रक्कम नुकसानभरपाई म्हणून देणे मान्य केले.
पण एवढ्यावरच थांबले नाही :
         या घटनेचा उत्तरार्ध अधिक मनोरंजक आहे.वकिलाने विमा कंपनीकडून मिळालेला धनादेश वठवल्यावर २४ तासातच त्याला विमा कंपनीच्या फिर्यादीनुसार अटक करण्यात आली.त्याच्यावर त्यानेच नोंदवलेल्या जबानीनुसार ज्या मालमत्तेचा विमा त्याने उतरवला होता तीच मालमत्ता जाणूनबुजून जाळून नष्ट आरोप करण्यात आला होता.अर्थात त्याच्यावर खटला चालला आणि आरोप सिद्ध होऊन त्याला २४ महिने तुरुंगवास आणि २४,००० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. विमा कंपनीला आर्थिक नुकसान सोसावे लागले खरे पण वकिलालाही चांगलीच अद्दल घडवल्याचे समाधान तरी मिळाले हे निश्चित !
या सत्यकथेला अमेरिकेतील त्या वर्षातील गुन्हेगारी वकिली स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.असे फक्त अमेरिकेतच घडू शकते नाही का ?कारण कायदे हे पाळण्यासाठीच असतात याविषयी आपल्या देशाइतक्या बेपर्वाई वृत्तीचा तेथे अभाव दिसतो.