चोरी झालेले दुसर्‍या शतकातले अमूल्य शिल्प परत मिळवण्यात काबूल संग्रहालयास यश

पांढर्‍या लाईमस्टोन प्रकारच्या प्रस्तरावर
कोरीव काम करून निर्माण केलेले एक शिल्प, जर्मन राजदूतांनी नुकतेच काबूल
संग्रहालयाला परत दिले आहे.साधारण 12 इंच उंच व 10 इंच रुंद असलेले हे
शिल्प, अफगाण यादवी युद्धाच्या वेळी या संग्रहालयातून चोरीला गेलेले होते.
या शिल्पात 8 व्यक्ती कोरलेल्या असून या व्यक्ती प्रत्येक ओळीत 4,
याप्रमाणे दोन ओळीत उभ्या असलेल्या , कोरलेल्या आहेत. एका व्यक्तीच्या
शरीराचा भाग तुटून गेला आहे तर बाकीच्या व्यक्तींची नाके बहुतांशी विद्रूप
केलेली आहेत. सर्व व्यक्ती डावीकडे बघताना दाखवल्या आहेत. असे समजले जाते
की डाव्या बाजूला असलेल्या आसनावर बसलेल्या भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकताना
या व्यक्ती दाखवलेल्या आहेत. हे शिल्प पहिल्या किंवा दुसर्‍या शतकातले
(इ.स. 100 ते 200) असावे असा अंदाज आहे व गांधार देशातील शिल्पकलेचा हे
शिल्प म्हणजे एक उत्तम नमुना असल्याचे समजले जाते.

हिंदुकुश व हिमालय पर्वतराजी ज्या स्थानावर एकत्र येऊन मिळतात त्याच्या
दक्षिणेपासून ते थेट सिंधू नदी पर्यंत गांधार देश पसरला होता असे मानले
जाते. भारतीय उपखंड, मध्य एशिया व पश्चिम एशिया यांच्या मध्ये असलेल्या या
देशाचा बराचसा भाग अतिशय डोंगराळ आहे आणि पाण्याची विपुलता असल्याने घनदाट
जंगले या डोंगराळ दर्‍याखोर्‍यांत पसरलेली आहेत. भारत व एशिया खंड या मधील
सांस्कृतिक संबंध जोपासले जाण्यासाठी आवश्यक असलेली सांस्कृतिक देवाण
घेवाण, गांधारच्या भौगोलिक स्थानामुळे सहज शक्य होती व म्हणूनच गांधारमधील
कला ही अतिशय महत्त्वाची मानली जाते.

प्रसिद्ध चिनी भिख्खू व यात्रेकरू शुआन झांग इ.स. 629 ते 647 मध्ये भारत
देशाच्या यात्रेवर आला होता. त्याच्या वर्णनाप्रमाणे, सिंधू नदीच्या
पश्चिम किनार्‍यपासून ते पेशावर जवळचा सखल भाग आणि पाकिस्तानचे सध्याचे
स्वत, बुणेर व बजौर हे भाग त्या काळच्या गांधार देशामध्ये मोडत होते.

शुएन झांग आपल्या वर्णनात लिहितो की (बील याचे भाषांतर)
" गांधार राज्य पूर्व- पश्चिम साधारण 1000 ली व उत्तर-दक्षिण साधारण 800 ली
पसरलेले आहे. पूर्वेला त्याची सीमा सिन (सिंधू) नदीपर्यंत आहे. या देशात
अनेक प्रकारची फुले व फळे यांची विपुलता आहे. या शिवाय येथे विपुल प्रमाणात
ऊसाची उपलब्धता आहे. या उसाच्या रसापासून घन स्वरूपातील साखर येथे बनवली
जाते. गांधार राज्याची राजधानी पुरुषपुर (पेशावर) ही असून तिचा परिघ 40 ली
एवढा आहे."
इ.स.पूर्व 305 मध्ये गांधार राज्यावर सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची सत्ता
होती. इ.स.पूर्व 255 मध्ये सम्राट अशोक गादीवर आला. त्याने गांधार मध्ये
बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केले होते. पहिल्या व
दुसर्‍या शतकात पहिला कनिष्क- 1, सुविष्क, कनिष्क- 2 वगैरे कुषाण राजांची
गांधारवर सत्ता होती.
गांधारमधील कला ही संपूर्णपणे बौद्ध धर्माला वाहिलेली होती. गांधारमध्ये
भगवान बुद्धांचे शरीर अवशेष जतन करून ठेवण्यासाठी विशाल स्तूप उभारलेले
होते. हे स्तूप अतिशय सुंदर कलाकुसरीची कोरीव कामे केलेल्या पॅनेल्सनी
सजवलेली होते. या रिलीफ पॅनेल्सवर, भगवान बुद्धांच्या आकृती, त्यांच्या
आयुष्यातील प्रसंग, पूर्वायुष्यातील प्रसंग (जातक कथा) आणि वेलबुट्ट्या व
नक्षी वगैरेचे अप्रतिम कोरीव काम केलेले होते.
गांधार कला ही अनेक प्रदेशांतील कलावैशिष्ट्ये व परंपरा आत्मसात करून
विकसित झालेली होती. ग्रीक, रोमन, बायझेंटाईन, पर्शियन, मध्य एशियन, चिनी व
भारतीय परंपरा व कला वैशिष्ट्ये या ठिकाणच्या कलेत बघायला मिळतात.
काबूल संग्रहालयाने परत मिळवलेले शिल्प गांधार कलेचा उत्तम नमुना आहे असे
मानले जाते. या शिल्पात दाखवलेली चेहरेपट्ट्यांची वैशिष्ट्ये, अंगावरचे
कपडे किंवा वस्त्रे, केशभूषा हे सर्व मोठ्या बारकाईने दर्शवलेले आहे.

असे समजले जाते की काबूल संग्रहालयात असलेल्या मूळ वस्तूंपैकी सुमारे
70% किंवा 70000 वस्तू यादवी युद्धात चोरीला गेल्या आहेत. संग्रहालय या
पैकी शक्य तेवढ्या वस्तू जगभरातून परत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे

या शिल्पाची छायाचित्रे माझ्या अनुदिनीवर या दुव्यावर उपलब्ध आहेत.