स्वप्न

नाही केला व्यायाम,    
ना कुणी प्रशंसाही खोटी     
तरीही फुगून छाती    
झाली भलतीच माझी मोठी   
   
माझ्या मनात आता    
विरह कोठेच नव्हता    
शब्द कलह अंतरीचा    
तोही थांबलाच होता    
जरी अजूनही घास,    
खानावळीचाच पडतो आहे पोटी.    
... तरीही फुगून छाती    
       झाली भलतीच माझी मोठी   
   
ना हिंडलो उद्यानात    
ना पाहिली हिरवळ कोठे    
ना जिंकलो कवितेत    
एखादे बक्षीस मोठे    
जगतो आहे आयुष्य तेच    
जे अर्पिले आरेखनासाठी   
... तरीही फुगून छाती    
       झाली भलतीच माझी मोठी   
   
संपताच वर्ष जुने    
मज चाहूल कशाची लागते    
मिळेल वेतनवृद्धी कधी    
मन दिवा स्वप्नात रंगते    
मिळाले स्वप्नात जरी    
पत्र ना भेटले प्रत्यक्ष अजून हाती      
... तरीही फुगून छाती    
       झाली भलतीच माझी मोठी