पिल्ले ..!!

अचानक फोन आला. तुमच्या अंगणातील झाडाखाली कुत्रीने पिल्ले टाकली आहेत..
काल संध्याकाळी मी दादाच्या  घरी गेलो  होतो.  
घरातून निघताना  काम्पौंडचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला होता.  
मग कुत्री आत घुसली कशी.?
कोणी गेट उघडले..?
का उघडले..?
उघडले तर बंद का नाही केले..?
अशा अनेक प्रश्नांनी मन भरून गेले.  
आता त्या कुत्रीला नि त्या पिल्लांना बाहेर काढणार तरी कसे..?
माझी रात्र खराब होऊन गेली.  
गेल्या दोन चार दिवसा पासून कुत्री गेट जवळच  झोपत होती.
तेथेच रेंगाळत होती.
पण ती गर्भार आहे ह्याची  मला तरी सुतराम  कल्पना  नव्हती. आणि असे कधी दिसले,   वाटलेही नव्हते.  
दुसऱ्या दिवशी दुपारीच आम्ही निघणार होतो.
सकाळी परत फोन आला. कुत्रीने ओट्यावर घाण करून ठेवली आहे..
साफ कसे करायचे ते मी बघते. असा शेजारचा फोन..
घाण केली म्हणजे काय केले..? मला संदर्भ लागत नव्हता.
दुपार..!
आम्ही निघालो.  
गाडी पकडली नि जवळ जवळ संध्याकाळी सहाच्या दरम्यान घरी पोहचलो.
हलकेच गेट उघडले  
कुत्री कोठे बसली असेल.  ?
अंगावर तर येणार नाही..?
चावणार तर नाही...?
आम्ही पूर्ण सावध होतो.  
आम्ही अंगणात प्रवेश केला. पारिजातकाच्या झाडाखाली कुत्री अंगाचे मुटकुळे करून पिल्लाना कुशीत घेऊन झोपली होती. गेटच्या आवजाने ती सावध झाली असावी.  
तिने हलकेच डोळे किलकिले करून आमच्या कडे बघून घेतले.  
नि शांतपणे डोळे मिटून घेतले.  
काय करावे कळत नव्हते.  
लेकुरवाळ्या  नि कालच  जन्म दिलेल्या पिल्लांच्या आईला  बाहेर काढणे मनाला पटत  नव्हते. तिची केविलवाणी नजर आमचा जीव खालीवर करीत होती  .  
तशी ती रोज बघण्यातली होती. दोन वर्षापासून आम्ही तिला लांबून बघत होतो. अंगणात घुसली तर तिला हाकलून देत होतो. तिला आम्ही कधी भाकर तुकडा दिला पण नव्हता.  
कुत्री भटक्या ग्यांग मधीलच  होती.  
पण ती आज असहाय होऊन आमच्या अंगणात शिरली होती. पिल्ले जन्माला घातली होती. आम्ही घरी असतो तर तिला आत येऊ दिले नसते. आणि हे अगदी खरे होते.  
पण आमच्या अपरोक्ष घटना घडून गेली होती.  
आम्ही हलकेच ओटा नि अंगण साफ केले. कारण अंगणात तिने खूप माती माती केली होती नि ओट्यावर घाण करून ठेवली होती.. अंगण साफ करताना तिने हू का चू देखील केले नाही. ती शांतपणे पडून होती. नवल वाटले...
मग बायकोने दूध नि पाव एका भांड्यात कुस्करून तिच्या पुढ्यात काही अंतरावर ठेवला बायकोला भीती वाटत होती कुत्री अंगावर आली तर काय घ्या..?  
कुत्री गप्प पडून होती. मधूनच डोळे किलकिले करून बघत होती खाण्यासाठी धडपडत होती परंतु उठण्याचे त्राण देखील नव्हते तिच्यात
ती शक्तिहीन झाली होती.
शेवटी धाडस करून  पाव नि दूध  मीच तिच्या जवळ सरकवले.  
डोक्यात मात्र विचारचक्र चालू होतेच 
तिला बाहेर कसे काढावे..?
काय निर्णय घ्यावा काहीच कळत  नव्हते.  
शेवटी निर्णय तिच्या बाजूने झाला 
राहुद्या काही दिवस.
पिल्ले थोडी मोठी झाली की ती त्यांना कोठेतरी घेऊन जाईल. नि आपली सुटका होईल.  
मग मी धीर करून कुत्रीजवळ गेलो. ती शांत होती. बिलकुल गुरगुरली नाही.  
आता तिने दूध नि पाव फस्त केला होता. नि ती पिल्लाना चाटून स्वच्छ करीत होती.  
नक्कीच तिला आमच्या विषयी विश्वास वाटत होता.  
रात्री आम्ही शांत झोपलो. तिला बाहेर काढले नाही ह्याचे काहीसे समाधान वाटत होते.
एवढ्या रात्री ती कोठे जाणार होती..?
रात्री कधीतरी पिल्लांचा बारीकसा आवाज येत राहिला. कुत्री मात्र शांत होती. गप्प होती.  
दुसऱ्या दिवशी अंगण स्वच्छ केले. कुत्री किलकिले डोळे करून शांतपणे बघत होती. काही हालचाल करीत नव्हती. तिची सहा पिल्ले तिला लुचत होती.  
सकाळचे कोवळे कोवळे उन्ह पडले होती. पारिजातकाच्या फुलांचा सडा  कुत्रीच्या आणि तिच्या पिल्ला भोवती  सांडला होता  आणि ती निवांत डुलक्या घेत होती.  
तिच्या डुलकीत  शांतपणा होता  
ह्या दृश्याने आमच्याही मनाला विलक्षण  प्रसन्नता लाभली.  
दुपार झाली. बारा वाजून गेले. तिला परत दूध नि पाव दिला. तिने शांतपणे सगळे पोटात ढकलले.  
तिने एकदा सुद्धा गुरगुर  केली नाही.  
जशी काय ती आमच्या खूप परिचयाची होती. तिच्या  नजरेत तसा भाव वाटत होता.  
मध्येच मी ब्यांकेत जाऊन आलो. जसा मी आलो तशी ती बाहेर जाऊन आली. मी येताच हलकेच अगदी आपलेपणाने अगदी हक्काने  आत  आली. नि संथ पावले ढकलीत  पिल्लांकडे गेली. परत शरीराचे मुटकुळे करून पिल्लाना कुशीत घेऊन डोळे मिटून बसली  .  
मी त्या पिल्लांकडे बघून घेतले.  
शुभ्र पांढरे नि काळे ठिपके असलेले पिल्लू दिसले.  
त्यांची गुलाबी पावले नजरेस पडली.  
मी पिल्लांकडे बघत होतो नि ती शांतपणे मला बघत होती.  
आमच्या नजरेतील आपलेपणा तिने ओळखला होता.  
तिला अभय मिळाले होते  
बिन ओळखीचे आम्ही आम्हाला समजत असलो तरी तिला आमचा सहवास सुखाचा वाटत असावा.  
ती एकदम निर्धास्त झाली होती.  
तिला खाण्यासाठी आता बाहेर जाण्याची जरूरी वाटत नव्हती. तिला वेळच्यावेळी खाणे मिळत होते.
प्रत्येकाचे कसे  नशीब असते बघा. काय योग होता तिच्या नशिबात..?
मी स्वतः प्राणी प्रेमात  कधीच पडलो नव्हतो. प्राणी, पक्षी मला आवडत जरी असले तरी त्यांच्यात गुंतून पडणे म्हणजे स्वतःवर बंधन घालून घेतल्यासारखेच  वाटत होते.  
मग आपल्याला कोठे बाहेर जायचे म्हणजे त्यांची सोय लावणे खूप कठीण वाटायचे.  
मी प्राण्याच्या अगदी विरोधात होतो.  
तरीही अशा पद्धतीने प्राण्याचा सांभाळ करण्याचा  योग आला होता. घरी असतो तर तिला माझ्या घरी आश्रय मिळणे शक्य नव्हते. परंतु ती माझ्या गैरहजेरीत आली. नि चिकटून बसली.. हा कुठला योग होता...?
चार -पाच दिवसात काय काय होते  असा विचार आम्ही  करून काही दिवस गप्प राहावे असे ठरवून ठेवले आहे 
बघूया..?
तिच्या नि आमच्या नशिबात काय योग आहेत ते....??  
------------------------------------------------------------------------------------
दुसरा दिवस.  
आमच्या घरी येणारी माणसे बिचकत येत होती. किंवा येण्याचे टाळीत होती.  
गेट न उघडता बाहेरूनच निरोप देत होती. मग आम्हीपण त्यांना येण्याचा आग्रह करीत नव्हतो. आमच्या दृष्टीने आमच्या अंगणातील कुत्री आमच्यापण मुळीच परिचयाची नव्हती.
तिला  आम्ही कधी यु.ss. युss  करीत  तिचे कधी लाड पण केले नव्हते.
श्वान दयेबद्दल  जो तो आमचे कौतुक मात्र करीत होता 
परंतु आम्हाला त्याचे काहीच वाटत नव्हते  
हे सर्व सहजगत्या घडले होते. घडत होते 
घरी येणाऱ्या पाहुण्याकडे कुत्री मुळीच डोके वर उचलून बघत नव्हती.  
तिला पूर्ण ठाऊक झाले होते की  ती येथे पूर्णपणे सुरक्षित आहे  ..
तिची पिल्ले सुरक्षित आहेत.  
शेजारपाजारची काही मित्र मंडळी तिला काही काही खावयास देत होतीच.  
तिचे नशीब तिच्यावर प्रसन्न  होते.  
आम्ही घरी  असतो तर ती मुळीच आतमध्ये येऊ शकली नसती.
मग तिने कोठेतरी पिल्ले टाकली असती. नि तिला खूप त्रास झाला असता.  
आता ती एकदम बिनधास्त झाली होती.  
ती अधून मधून पिल्लांना चाटून पुसून स्वच्छ करीत होती.
रात्र.
आम्ही झोपी गेलो.  
मला गार झोप लागली.  
कधीतरी मध्येच मला बायकोने उठवण्याचा प्रयत्न केला.
म्हणाली -गेट कोणीतरी ढकलल्यासारखा   आवाज येतोय. बघता का..?  
मी तर वैतागून गेलो. गाढ झोपेत होतो. मी लक्षच दिले नाही. मग तीच उठली. दरवाजा किलकिला केला. गेटच्या बाहेर आमच्याच  अंगणातली  कुत्री आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होती. तिला आतमध्ये मात्र येता येत नव्हते.   
आतमध्ये येता  येत नव्हते तर ती बाहेर गेली कशी..?  
बाहेर जशी गेली तशी मग आतमध्ये का नाही आली...?
का तिचा अभिमन्यू झाला होता..?
जसे अभिमन्यूला चक्रव्यूव्हात  कसे शिरायचे माहित होते परंतु बाहेर कसे निघायचे  माहित नव्हते. तशी तिची अवस्था झाली होती का..?  
मग बायकोनेच गेट  उघडले नि ती चटकन आत आली.  
सकाळी सकाळी मला तिने हे सर्व सांगितले. नि मी थक्क झालो.  
कशाला गेली होती बाहेर..?
तिला कंटाळा आला होता का..?
का ती अन्नशोध  मोहिमेवर गेली होती.  
आणि परत येऊन ती गेट वाजवीत होती..
बायकोने तिच्या लेकरासाठीच  तिला आतमध्ये घेतले.  
सकाळी मी जागा झालो. छान कोवळी उन्हे पसरली होती. हवेत छान गारवा होताच  तिची पोरे तिला लुचत होती. ढुशा मारीत होती.
ती ध्यान लावल्यासारखी शांत तृप्त दिसत होती  .
ती ज्या झाडाखाली झोपली होती. त्या बाजूने अडीच फुटावर विटांचा सिमेंटने बांधून जो कट्टा  बांधलेला होता. माती बाहेर येऊ नये म्हणून.  
काल खूपशी माती आवरली होती तरी झाडाच्या पासून कट्ट्याजवळ  जी थोडीफार माती होती ती  मी हलकेच झाडून साफ करू लागलो. जरा सावध होतो. तिने एकदा डोळे किलकिले  करून बघून घेतले नि मग डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून डोळे बंद करून घेतले.  
कोवळे ऊन सांडलेले होतेच  . हवेत प्रसन्न असा गारवा होता. झाड-पानातून  उन्ह गळत होते. कुत्री छान झोपली होती. पिल्ले तिच्याशी झटत होते. तिच्या अंगावर चढत होते. मधूनच की.ss.. कीss असा चित्कार करीत होते. चला मनात आले एखादा फोटो काढून बघूया.  
मी हलकेच क्यामेरा हातात घेतला. दुरूनच फोटो घेतला 
एक.. दोन.. तीन 
मला वाटते माझा क्यामेरा मला झूम करता येत नसावा. फोटो बरे आले परंतु ठळक नाही आले.  
घरात येऊन फोटो बघितले.
मला बरे वाटले.
काल पासून तिने एक काम केले होते.
माती मुळीच उकरली नव्हती. तिच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छच होता.  
मग कोणी मित्र सहज म्हणाला 
काळजी करू नको. जेथे पिल्ले आहेत त्याच्या जवळपास कुत्री काही घाण करणार नाही आणि हे अगदी पटले होते. तिने विष्ठा वगैरे टाकली नव्हती.  
बघूया पुढे काय होतेय ते...?
कारण मी ह्या बाबत बराचसा नव्हे पूर्ण अनभिज्ञ होतो... आणि आहे!!