तुपगुळपोळीची गुंडाळी..!

मनोगती कुशाग्र यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीत या लेखात खालील उतारा आहे,

"श्री. विनय हर्डीकर यांनी प्रस्तावनेत असेही म्हटले आहे "गेल्या पन्नास
वर्षातल्या कंठसंगीतामधल्या नायक (गायक नव्हे)कलाकारांची नावे द्यायला एका
हाताचीच बोटे पुरेत. श्रीयुत मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद अमीर खां, पंडित
कुमार गंधर्व, श्रीमती किशोरी अमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी एवढी
नावे घेतल्यावर बाकी सगळी नावे सहाव्या बोटावर येतात. " त्यात त्यांना
भारतरत्न भीमसेनजींचाही उल्लेख करावा वाटला नाही याचे कारण कदाचित
भजनसदृश्य अभंगवाणीसारख्या कार्यक्रमाची लोकप्रियता त्यांनी वाढवली हे
असावे. श्री. हर्डीकर यांच्या मते नायक कलाकार म्हणजे "शिस्त मोडायची नाही
पण नावीन्य आणि वैचित्र्य यांची मागणी पुरवून शिवाय संगीतामध्येही भर
घालायची" हे करणारे कलाकार."

या उताऱ्याला आम्ही प्रतिसादात थोडक्यात उत्तर दिलेलेच आहे परंतु तरीही पुन्हा एकदा या उताऱ्याचा विस्तृत समाचार घ्यावा व त्या निमित्ताने एखादा संगीतविषयक लेखच प्रसिद्ध करावा या हेतूने हे लेखन करत आहे. वरील उतारा हे केवळ निमित्त आहे, परंतु एकुणातच आजकाल अभिजात संगीतातील आवश्यक ठरत चाललेल्या तथाकथित (सो कॉल्ड) नावीन्याबद्दल जो काही डांगोरा पिटला जात आहे त्याबद्दलही आम्हाला काही भाष्य करावयाचे आहे.

एक गोष्ट मात्र सुरवातीलाच कबूल करतो की मज पामराला कंठसंगीतात नायक व गायक असे काही प्रकार असतात हेच ठाऊक नाही. आमच्या समजुतीप्रमाणे कंठसंगीतामध्ये जो कंठाने गातो तो गायक आणि फक्त गायकच. आणि गायक म्हटला की त्याच्याशी संबंधित असते ती त्याची गायकी. आता यात 'नायकी' चा संबंध कुठे आला हे आम्हाला माहीत नाही..!

हे जे कुणी संगीतज्ञ (? ) हर्डीकर आहेत ते म्हणतात की  'श्रीयुत मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद अमीर खां, पंडित
कुमार गंधर्व, श्रीमती किशोरी अमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी एवढी
नावे घेतल्यावर बाकी सगळी नावे सहाव्या बोटावर येतात.' आता स्पष्टच सांगायचं झालं तर यातील नायक-गायक हा आम्हाला केवळ एक फाजील शब्दच्छल वाटतो आणि  हर्डीकरांच्या रसिकतेविषयी आणि बहुश्रुततेविषयी शंका उत्पन्न होते. एक गोष्ट आम्ही प्रथमच नमूद करतो की वरील ५ गायकांविषयी आणि त्यांच्या कलेविषयी आम्हाला नितांत आदर आहे. आम्ही वेळोवेळी त्यांच्या उत्तुंग गायकीचा अनुभव घेतलेला आहे व प्रसंगी आम्ही त्यांच्या गायकीसंदर्भात विस्तृत विवेचनही करू शकतो. परंतु मुद्दा तो नाही. मुद्दा असा की काहीतरी गायक-नायक च्या अंमळ फाजील शब्दच्छलाआड वरील ५ गायक हेच काय ते नायक (आणि पर्यायाने गायकसुद्धा!) आणि मग अन्य सारे गवई काय रावसाहेबांच्या भाषेत केवळ 'मिरजेचे ब्यँडवाले'?

मग अब्दुल करीमखासाहेब, सवाईगंधर्व, भास्करबुवा, नारायणराव बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, अंतुबुवा, विलायतहुसेन खासाहेब, वझेबुवा, गजाननबुवा, जगन्नाथबुवा ही मंडळी कोण होती? गायक होती की नायक? प्रवाही, सुरेल, लयदार, बोलांशी मस्त खेळणारे आमचे फैयाजखासाहेब काय नायक नव्हते? जयपूर गायकीचा अत्यंत शांत व सुंदर आविष्कार करणारे निवृत्तीबुवा कोण होते? गायक की नायक..? श्रोत्यांना स्वरदार लयीवर अक्षरशः: खेळवत झुलवत ठेवणारे वसंतराव किंवा लयीवर आरूढ होऊन आक्रमक गायकी मांडणारे पं रामभाऊ मराठे ही मंडळी कोण होती? गायक की नायक? खडीसाखरेसारखा गळा असणाऱ्या आणि अगदी सात्त्विक गाणाऱ्या बापुराव पलुस्करांना तुम्ही काय म्हणणार? आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, आपल्या तेजस्वी स्वरात साऱ्या विश्वाला उजळून टाकणारे स्वरभास्कर पं भीमसेन जोशी कोण होते? नशीब आमचं,भीमण्णांच्या गायकीबद्दल हर्डीकरांचे विचार समजून घेण्याची आमच्यावर अद्याप वेळ आली नाही, आणि येऊही नये! भीमण्णांच्या बाबतीत,

अमृताचे डोही बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो,
मीपण संपले झालो विश्वाकार
स्वरात ॐकार भेटला गा..

असं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर म्हणतात, तेवढाच अभिप्राय आम्हाला आयुष्यभराकरता पुरेसा आहे.

उगाच काहीतरी 'गायक-नायक'  करायचे आणि हाताची बोटं मोजून आपल्या दळिद्री आणि संकुचित रसिकतेचे प्रदर्शन करायचे याला काय अर्थ आहे?!

आता जरा आम्ही येतो ते संगीतातल्या सो कॉल्ड नावीन्यावर!

अभिजात संगीताच्या दुनियेत 'नवीन काहीतरी करावं, नावीन्य पाहिजे' अशी एक फॅशनेबल ओरड आम्ही तरी गेले बराच काळ ऐकत आहोत. ख्यालगायनात मुख्यत्वेकरून असते ती त्या त्या ख्यालगायकाची अभिव्यक्ती आणि ती करण्याची पद्धत. आता याचे अपवादात्मक व सन्माननीय उदाहरण म्हणजे पं कुमार गंधर्व. मान्य, अगदी मान्य. कुमारांनी खऱ्या अर्थाने आपले विचार मांडण्याकरता कुठल्याही प्रस्थापित घराण्याचा आधार न घेता आपल्या गायकीचा स्वत:चा असा एक वेगळा ढाचाच निर्माण केला. कुमारांचा हा अपवाद मान्य..!

परंतु अन्य गायकांचं काय? अगदी भीमण्णांसकट असे कितीतरी उत्तुंग गायक आहेत जे घराण्याच्या चौकटी मानतात आणि त्या चौकटीत राहून तितकाच उत्तुंग आविष्कारही करतात. परंतु 'नावीन्य! नावीन्य! वैचित्र्य! वैचित्र्य! ' असे डराव डराव करणारे बेडूक हे दर पावसाळ्यात उपजतच असतात आणि पावसाळा संपला की आपोआप नाहीसे होतात! आमचा या बेडकांवर राग आहे.

अहो घराणेदार-वळणदार गायकी म्हणून काही चीज आहे की नाही? तुम्ही परंपरेनं चालत आलेली घराणेदार गायकी मानणार आहात की नाही? की नावीन्याच्या आणि वैचित्र्याच्या नावाखाली सगळा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार माजवणार आहात? खरंतर घराण्याची शिस्त अंगी बाणवून त्यात काही अभिव्यक्ती करण्याची तुमची लेको कुवतच नाही. आणि मग तो दोष झाकण्यासाठी उगाच  त्यावर 'आम्ही घराणेदार गायकी मानत नाही, आम्ही काहीतरी नवीन, वैचित्र्यपूर्ण शोधतो आहोत' असे  इमले रचायचे झालं!

केवळ अलौकिक, अप्रतिम अशा चिजांचं भांडार असलेलं समृद्ध आग्रा घराणं आणि त्यातले नोमतोमवाले, बोलबनाववाले आग्रा गवई, लोचदार-लयदार जयपूर गायकी अधिक समृद्ध करणारे मन्सूरअण्णा आणि किशोरीताई (हर्डीकरांनी ही दोन नावं जरी नावीन्यासंदर्भात घेतली असली तरी दोघेही जण घराण्यात राहूनच गातात असे आमचे म्हणणे आहे! ), तर कुठे ग्वाल्हेरचा 'चमेली फुली चंपा.. ' चा झुमऱ्यातला जमलेला रंगतदार हमीर, तर कुठे हिराबाई-भीमण्णांचा हरिद्वारच्या गंगेइतका शुद्ध, सात्त्विक असा शुद्धकल्याण!

हे सारं सारं आपल्या घराणेदार गायकीनेच दिलं ना??

उगाच काय काहीतरी नावीन्याची आणि वैचित्र्याची थेरं माजवायची??

आता तुमचे ते अलीकडच्या काळातले महागडे कॉर्नफ्लेक्स की काय म्हणतात ते दुधात बुडवून खायचे फ्लेक्स. क्षणभर मान्य करू की ते पौष्टिक असतात, सात्त्विक असतात. अहो, पण कधीतरी तुम्ही तूप-साखर घातलेला कुस्करलेल्या पोळीचा 'भूकलाडू' खाल्ला आहे काय हो? कधीतरी गरम गरम पोळीवर थोडं तूप आणि लसणीचं तिखट पेरून त्याची गुंडाळी करून खाल्ली आहे काय हो? अहो जळ्ळी तुमची ती आधुनिक फ्रँकी का काय ती आत्ता आली, पण तिची मूळ कल्पना त्याच आमच्या पारंपरिक गुंडाळीवर बेतलेली आहे हे तुम्हाला माहित्ये का?!

आधी नाकाला लोंबणाऱ्या शेंबडाच्या लोळ्या पुसायला शिका, पहिली २५ वर्ष तरी किमान एखाद्या घराणेदार गायकीत मुक्तपणे वावरा, बुद्धी असेल तर त्यातली डेप्थ शोधायचा प्रयत्न करा. खूप मोठं सात्त्विक समाधान मिळेल, आनंद मिळेल!

नावीन्य! नावीन्य! वैचित्र्य वैचित्र्य! म्हणून नाचणं बंद करा.. ज्ञानी व्हा, आनंदी व्हा, स्वानंदी व्हा, सुखी व्हा..!

तथास्तु.. :)

-- तात्या अभ्यंकर.
(संपादित : प्रशासक)