आम्हा सोयरी

           तुकारामांनी जरी "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " असा प्रेमळ संदेश देऊन ठेवला असला तरी रामदासांसारख्या रोखठोक माणसाला असला काही संदेश देणे मानवले नाही उलट  त्यातील काही सोयरे आपल्याला नकोसा जीव करून टाकतात आणि त्याचाच इशारा रामदासांनी त्यांच्या दासबोधाच्या पहिल्याच समासात देऊन ठेवला आहे.ते म्हणतात,

"मृत्तिका खणोनि घर केले । ते माझे ऐसे दृढ कल्पिले । परि तें बहुतांचे हें कळलें। नाहीच तयासी ॥१.१०.३४॥

अगदी हौसेने माणसाने घर बांधले व ते माझे घर असे तो समजू लागला पण ते त्याचे नाहीच हे त्याला कळलेच नाही कारण समर्थ सांगतात "अरे मूर्खा तुझे घर कसले समजतो आहेस?,त्या घरात तू किती वेळ असतोस त्यापेक्षा जास्त वेळ त्या घरात राहणारे तुझे सोयरे काय म्हणतात पहा,"मूषक म्हणती घर आमुचे।पाली म्हणती घर आमुचे।मक्षिका म्हणती घर आमुचे।निश्चयेसी।३५॥

एवढ्यानेच भागले नाही

विंचू म्हणती अमुचे घर । सर्प म्हणती आमुचे घर ।झुरळें म्हणती आमुचे घर ।निश्चयेसी ॥३७॥

     आम्हाला तुकारामांच्या वचनापेक्षा या समर्थ उक्तीचाच अनुभव अधिक येतो.

    अगदी नुकताच अमेरिकेत गेलो तेव्हा फिनिक्समधील भाच्याचे घर खूप मोठे अगदी प्रत्येकाच्या वाटणीस दोन शयनकक्ष पण त्यातही एक दिवस अगदी चक्क स्वयंपाकघरात भला मोठा विंचू निघाला व प्रत्येकजण "तू जपुन टाक पाऊल जरा" या उक्तीप्रमाणे वागू लागले.

      मला लहानपणी विंचू फक्त दिसलाच नाही तर त्याने प्रत्यक्ष माझ्यावर हल्लाच केला होता,हे आमचे खेड्यातले घर असले तरी बऱ्यापैकी बांधलेले होते.तरी शेवटी ते मातीचेच घर.या घराला  माडी पण होती व सोप्यातून माडीवर जायला लाकडी जिना होता.त्यावेळी मी असेन दहा बारा वर्षाचा ! संध्याकाळच्या अर्धवट प्रकाशात काहीतरी गुणगुणत जिना उतरत होतो आणि शेवटच्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर उजव्या पायाच्या अंगठ्याला एकदम सपकन जबरदस्त फटका बसला आणि माझ्या गाण्याचे एकदम रूपांतर झाले ते कर्णभेदक किंकाळीतच.

        माझ्या किंकाळीने आई व घरातील समस्त बंधु भगिनी वर्ग गोळा झाला.आईने बरोबर कंदील आणला होता तो वर पकडून थोरल्या बहिणीने सर्वांना बाजूस सारीत " काय झाले म्हणून विचारणा केली .माझा अंगठा इतका फुणफुणत होता की माझ्या रडण्यातून उसंत काढून काय झाले हे सांगायलाही मला जमत नव्हते शिवाय काय झाले हे मला तरी कुठे काय कळले होते.तेवढ्यात विजेचा दिवा आता लावता येईल हे कोणाला तरी सुचले. संध्याकाळी सात वाजता आमच्या गावातील पॉवरहाउस सुरू होई व मग घरातील विजेचे दिवे लागत.कोणीतरी बटण दाबले आणि त्या प्रकाशात एकदम जिन्याच्या भिंतीवरून एक मोठा विंचू तरा तरा जाताना सर्वांना दिसला व माझ्या गगनभेदी आरोळीचे रहस्य सर्वांच्या लक्षात आले.बहिणीने अगोदर कोपऱ्यातील वहाणेचा फटका मारून त्या विंचवाला गारद केले आणि मग माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला सुरवात केली.

           तोपर्यंत माझ्या आरोळीचा नाद आसमंतात इतका घुमला होता की शेजारपाजारच्या तीन चार कुटुंबांना यांच्या घरी कोणी अचानक निजधामाला गेले की काय अशी शंका येऊन बराच मोठा जमाव आमच्या घरासमोर जमला व मला विंचू चावला हे जगजाहीर झाले.लगेच विष चढू नये म्हणून माझ्या त्या पायाच्या पोटरीवर एक फडके घट्ट पिरगाळण्यात आले ते पिरगाळणाऱ्याचा उत्साह एवढा दांडगा की विंचू चावल्याच्या वेदनेपेक्षा त्याचीच कळ माझ्या मस्तकात त्याहूनही अधिक जोरात शिरली.बहुधा एक दु:ख विसरण्यासाठी त्याहून दुसरे मोठे दु:ख कोसळावे लागते या मानसशास्त्रीय बाबीचा त्याने अभ्यास केला असावा.

       विंचूदंशाच्या जागी चिंचोका किंवा आणखी काही पदार्थ उगाळून लावावे असे निरनिराळ्या लोकांनी सुचवलेले पदार्थ उगाळण्याची व त्यांचा लेप माझ्या पायावर चढवण्याची एकच स्पर्धा तेथे सुरू झाली तेवढ्यात आमच्या घराच्या मालकीणबाई आज्जी तेथे आल्या व त्यांनी आपणास मंत्र येतो असे सांगितल्यावर बाकी सर्वांनी आपले उपाय थांबवून त्यांच्या ताब्यात मला दिले.त्यांचा मंत्र मला माझ्या रौद्र रुदनात ऐकू येणे शक्य नव्हतेच.शिवाय तो  विंचूही मारण्यात आल्यामुळे त्यालाही ऐकू येणे शक्य नव्हते. पण त्या विंचवाच्या मृत देहाला साक्षी ठेवूनच आजींनी मंत्रोच्चारण सुरू केले.त्यानंतर कशाचा परिणाम झाला कोणास माहीत कारण मला ग्लानी येत असल्याने माझे रौद्र रुदन मंदावले व विंचवापेक्षा माझ्या रडण्यानेच अधिक त्रस्त झालेले शेजारी ही शांत होऊन आपआपल्या घरी परतले व मला झोप लागली एवढे आठवते.

        हा विंचवाचा माझा प्रथम परिचय.त्यानंतर मी थोडा मोठा झालो होतो.एस.एस.सी.ला असेन.रात्री अंथरुणावर बसून पुस्तक हातात घेऊ अभ्यास करत होतो.तेवढ्यात पाठीवर काहीतरी सरकले व एकदम सुई टोचल्यासारखे वाटले .पाठीवर जसा पुरेल तसा हात नेऊन मी पाठ खाजवण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे आणखीनच जोरात सुई टोचल्यासारखे वाटले शेवटी अंगातला शर्ट काढून उलटा केला तो काय एक छोटे विंचवाचे पिल्लू त्यातून बाहेर पडले बहुधा ते माझ्यावर पहिला हल्ला करणाऱ्या व त्यावेळी धारातीर्थी पतन पावलेल्या  त्या विंचवाचे हे वंशज असावे व   माझ्यावर आपल्या पूर्वजाच्या रक्ताचा बदला घेण्याचा प्रयत्न त्याने केला असावा.यावेळी विंचू छोटा असल्यामुळे की विंचवाच्या विषाची माझ्या शरीरास सवय झाल्यामुळे कशामुळे कोण जाणे पण मला फारसा त्रास झाला नाही .त्या पिल्लाला त्याच्या पूर्वजाच्या भेटीस पाठवून पुन्हा मी शांतपणे अभ्यासाला लागलो.

            पूर्वीच्या मोठ्या घरात भुजंग किंवा नाग हे घराचे व घरातील संपत्तीचे रक्षण करणारे अशी समजूत होती,ती कदाचित त्यांचेच संरक्षण व्हावे म्हणून करून देण्यात आली असावी पण तरीही "साप म्हणू नये धाकला ’या म्हणीतून साप दिसला की मारावा असाच संदेश जातो.माझ्या लहानपणी एकदा आमच्या घरातही साप निघाला होता व त्यावेळी सापाला मारू नये असा संदेश इतरांना देण्या इतका किंवा मी सांगितले तरी माझे ऐकले जाण्याइतका मोठा झालो नव्हतो.त्यामुळे तो बिचारा साप मारला गेला.त्यानंतर सोलापूरला वसतिगृहप्रमुख होतो त्यावेळी ते वसतिगृह अगदी रानातच असल्यासारखे होते व तेथे अनेक साप निघत पण माझे व प्राचार्यांचे निवासस्थान मंतरून टाकले असल्यामुळे घरात कधी साप निघाला नाही असे तेथील कर्मचारी सांगत.अं.नि.स.चे कार्य त्यावेळी फारसे अस्तित्वात नव्हते त्यामुळे मांत्रिकांची चलती असावी.पण आवारात बरेच साप निघत.आमच्या वास्तव्याच्या काळात ठराविक दिवशी एक विशिष्ट मुळी घेऊन येऊन काही सर्पमित्र आवारातील साप पकडून घेऊन जात.तरीही आवारात साप निघतच.एकदा मी व माझा मोठा मुलगा तो त्यावेळी नऊ दहा वर्षाचा असेल आम्ही आवारातून बाहेर पडताना एक भला मोठा साप आमच्या दोघांच्या अगदी पायामधून गेला.

          अमेरिकेतही सापाचा अनुभव आम्हाला आलाच.एडिसनला माझे दोन्ही मुलगे व आम्ही हिडन व्हॅली भागातील सदनिकेच्या तळमजल्यावर राहत होतो .एक दिवशी सकाळी सकाळी आमच्यापैकी कोणीतरी सहज दार उघडले तर दारासमोरच एक साप वेटोळे घालून बसलेला.ताबडतोब ज्याने दार उघडले होते त्याने ते बंद केले.पण आमची अवस्था चिमणरावांच्या पाहुण्यांना येऊ न देण्यासाठी पाळलेल्या कुत्र्याने घरातील लोकांनाही बाहेर येऊ देऊ नये तशी झाली,सुदैवाने या सदनिकेला मागील बाजूने एक प्रवेशद्वार होते त्यामुळे आमची रहदारी मागून सुरू झाली.९११ ला फोन लावल्यावर त्यांनी कालियामर्दन करण्याऐवजी आम्हाला उलट माहिती दिली की एडिसनमधील साप विषारी नसतात.त्याचा गर्भित तो तुम्हाला काही इजा करणार नाही व त्यामुळे  आम्हीही  काही करणार नाही. तरी बरे मूक प्राणी अधिकार समितीने त्या सापाला घरात घेऊन त्याला खायला प्यायला घाला नाहीतर त्या प्राण्यांचे हक्करक्षण न केल्याबद्दल तुमच्यावर खटला भरण्यात येईल असे बजावले नाही हे आमचे भाग्य त्यावेळी जगातील  मानवाधिकार संरक्षणाची जबाबदारी आजच्याइतकी अमेरिकेने घेतली नव्हती असे दिसते.

     याच सदनिकेत असताना नवरात्रीच्या काळात घटस्थापनेनंतर उगवलेले धान्य दसऱ्यानंतर माझ्या पत्नीने बाल्कनीत ठेवले होते ते खारीने ते  रात्री पळवून नेले व त्यानंतर त्या बाल्कनीत कोणताही खाद्यपदार्थ टिकू शकला नाही.मुलाने स्वतंत्र घर घेतल्यावर मागील बाजूस खूप मोठी जागा असल्यामुळे माझ्या बायकोला आपली बागेची हौस पुरी करण्याची इच्छा झाली व तिने मोठ्या हौसेने कुंड्या आणून डॅकवर त्यांची प्रतिष्ठापना केली व त्यात वेगवेगळ्या बिया पेरल्या.पण दुसऱ्याच दिवशी कुंडीतील माती उकरली जाऊन त्या बिया गायब झालेल्या दिसल्या,मुलाने अगोदरच आईला बजावले होते की इथे बागकाम करण्याच्या फंदात पडू नको कारण खारी व ससे तुला ते करू देणार नाहीत व तोच अनुभव तिला आला.पण तीही इतकी चिकाटीची की तिने बारीक जाळी आणून त्या कुंड्या आच्छादून बियांचे पुन्हा रोपण केले व काही वांगी ,काही काकड्या असे उत्पन्न मिळवण्याची जिद्द दाखवली.

    औरंगाबादला स्वत:चे घर बांधल्यावर एका घुशीने आम्हाला असेच त्रस्त केले होते.आमची वसाहत अगदी नवीच असल्याने खरेतर त्यांच्या निवासस्थानावर आम्हीच आक्रमण केले होते.शिवाय आमच्या घरांच्याच रांगेतील एक प्लॉट रिकामा होता.त्या प्लॉटमधील घुशीने अगदी ओळीने सर्व घरांच्या जमिनीखालून मार्ग काढत रांगेतील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या माझ्या घराच्या मोरी व संडासासाठी केलेल्या सेप्टिक टँकला आपले लक्ष केले होते.तेथील जमीन ती रात्री पूर्णपणे उकरून ठेवत असे.सकाळी उठल्यावर मग माझे काम त्या उकरलेल्या भागात काचेचे तुकडे वगैरे घालून पुन्हा जमिनीचा तो भाग पूर्ववत करणे हेच असे.तरी ती घूस आमच्या या संरक्षक फळीला दाद न देता आपला उपक्रम पुन्हा चालू ठेवी.त्यानंतर आम्ही गावाला गेल्यावर तर तिला मोकळे रानच सापडले त्यामुळे आम्ही घरी परत आल्यावर पाहतो तो काय ती घूस चक्क संडासामध्ये आमचा समाचार घेण्यास येऊ लागली.त्यामुळे संडासामध्ये जाण्यापूर्वी घूस तेथे आहे की नाही याची दखल घेऊन मगच आत प्रवेश करावा लागे.कधी आम्ही आत असताना तिला आमची भेट घेण्याची इच्छा झाली तर मग आमची तारांबळ काही विचारता सोय नाही.शेवटी तिच्या मूळ वसतिस्थान असलेल्या प्लॉटधारकासच तिचा बंदोबस्त न केल्यास त्याचा प्लॉट सोसायटी जप्त करेल असा दम दिल्यावर त्याने त्या घुशीला पळविल्यावर आमचा त्रास दूर झाला.

      आम्ही पुण्यातील सदनिकेत राहत असताना आमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा लाभ घेऊन उंदरांनी आमच्या सगळ्या सदनिकेचाच ताबा घेऊन आपला संसार प्रचंड बहरास आणला होता याचे वर्णन मी वारीच्या एका भागात केले आहे.

     या सोयऱ्यांना दोष देण्यापूर्वी खरे तर आपणच त्यांच्या वसतिस्थानावर आक्रमण केले आहे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.प्रत्येक प्राणी आपल्या कक्षा ठरवून घेतो हे मारुती चित्तमपल्लीं किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारख्या लेखकांचे साहित्य वाचल्यावर समजते.त्यांच्या जागेवर आपण आक्रमण केल्यामुळे उंदीर,साप,घुशी इतकेच काय पण आता लांडगे,बिबळे हे प्राणीही घरात दिसू लागणार किंवा दिसेनासेच होणार ह्या दोन शक्यता दिसत आहेत.