पुन्हा हुलकावणी देऊन गेले मेघ काळे
कितीदा कोरडे गेलेत सारे पावसाळे ||धृ||
कितीदा येउनी आच्छादुनी आभाळ गेले
धरेच्या अंग-प्रत्यंगात लावुन जाळ गेले
कशाला दाह वाढवण्यास करती थेंब चाळे? ||१||
कधी लागेल, देवा, क्षेत्रपालाला सुगावा?
कधी भिडणार धरणीला तिचा अनिरुद्ध रावा?
कधी होतील गंधित चिंब भिजुनी देहवाळे? ||२||
कशी हो एकटी फळणार ही सुजलाम माती?
भिजवल्यावाचुनी ठरणार आहे वांझ माती
किती आसूसली ऐकावया घुंगूरवाळे ||३||