बाहुल्यांच्या दुनियेत रमणारीः रमणी

बाहुल्या     चित्र चौकट 

'लहान माझी बाहुली तिची मोठी सावली घारे डोळे फिरविते नकटं नाक उडविते' असे म्हणत प्रत्येकच मुलगी बाहुलीशी खेळता खेळता मोठी होते. अशीच रमणी बाहुलीशी खेळता खेळता मोठी झाली, लग्न झाले अन तिलाही एक बाहुली झाली ती पण मोठी झाली. पण रमणीचं बाहुलीत रमणं कमी व्हायच्या ऐवजी वाढतंच  गेलं. छोट्या छोट्या बाहुल्या बनवणारी रमणी मनुष्याकृती बाहुल्या बनवून घेऊन चालली आहे चंदीगढला.   तिच्याकडून जाणून घेऊया ह्या बाहुल्यांच्या जन्माची कहाणी.

प्रश्न: कधी आणि केव्हा सुरुवात झाली?

रमणी: ह्या बाहुल्या बनवायला सुरुवात करून जवळपास बावीस वर्षे झाली. माझी आई कापडाच्या बाहुल्या बनवायची.    माझी आई कोणत्याही टाकाऊ पासून शोभिवंत टिकाऊ वस्तू बनवायची. हा तिचा फावल्या वेळातला उद्योगच होता. माझी आई नागपुरातल्या मातृसेवा संघाचं अपंग महिला पुनर्वसन केंद्र आहे तिथे ती मुलींना भेटकार्ड, बाहुल्या शिकवायला जायची. हे सगळं बघतच मी लहानाची मोठी झाले. मी विज्ञान शाखेची पदवीधर. त्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एमफील केलं. काही वर्ष मी औषध विक्रेत्याची नोकरी केली. पण नोकरीत मन काही रमलं नाही. मीही आई बरोबर बाहुल्या बनवू लागले. माझा मामा नॉर्वेत होता. त्याने आमच्या बाहुल्यांच प्रदर्शन नोर्वेत भरवलं तिथे खूपच छान प्रतिसाद मिळाला. डेन्मार्कमध्येही एक हस्तकला प्रदर्शन होतं. जवळपास सगळ्याचं बाहुल्या नॉर्वेत विकल्या गेल्या होत्या. त्या गिऱ्हाईकांना न देता त्या आम्ही डेन्मार्कच्या प्रदर्शनात दाखवण्याकरिता ठेवल्या. तिथेही खूप छान प्रतिसाद मिळाला. तिथे बाहुल्यांच्या  ऑर्डर्स घेतल्या व नंतर भारतात आल्यावर तयार करून पाठवल्या. अश्या तऱ्हेने बाहुल्यांच्या विक्रीला सुरुवात झाली. तत्पूर्वी आम्ही बाहुल्या बनवायचो पण विकायचा कधी विचारच केला नव्हता.   इथे भारतातही अनेक प्रर्दशनातून बाहुल्या विक्रीसाठी ठेवायला सुरुवात केली. पूर्वी तयार बाहुल्या ठेवायच्या कुठे हा प्रश्न होता तो आता राहिला नव्हता.   अश्या तऱ्हेने हा आमचा छंद, आवड व्यवसायात रूपांतरित झाली.

प्रश्न: कागदाच्या बाहुल्या केव्हापासून बनवायला सुरुवात केली?

रमणी: आधी आम्ही कापडाच्याच बाहुल्या बनवायचो.   आमच्याकडे म्हणजे आंध्रात वेळूच्या सुपांना व टोपल्यांना कागद व भिजवलेल्या मेथीचा लेप लावला जायचा. त्यावर नक्षीकामही केले जायचे. त्यामुळे त्या टिकाऊ, मजबूत तर व्हायच्याच त्याचबरोबर शोभिवंतही व्हायच्या.   ते मी बघितलेलं होतं. कागदाच्या लगद्यापासून बाहुल्या बनवण्याचे प्रयोग करून पाहणे चालू होते. एकदा दूरचित्रवाणीवर पपेट शोवरचा कार्यक्रम बघितला त्यात त्यांनी कागदाच्या लगद्यापासून पपेट बनवायची कृती दाखवली होती.  मुंबई हॅडीक्राफ्ट बोर्ड रिसर्च केंद्रानेही प्रयोग करून बघितले. त्यात यश मिळालं.  ज्याच्यावर कारागिरी करायची आहे समजा धातू असेल किंवा लाकूड असेल त्याप्रमाणे कागद, डिंक व सिरॅमिकच प्रमाण बदलावं लागतं. अजूनही काही प्रयोग सुरूच आहेत. एकोणीसशे ब्याण्णव पासून कागदलगद्याच्या बाहुल्या बनवू लागलो.

प्रश्न: कागदाचा लगदा बनवण्याची पद्धत काय?

रमणी: कागद आधी तीन दिवस भिजवून ठेवावा लागतो. तो चांगला मळून घ्यावा लागतो. त्यात डिंक व पुट्टी मिसळावी लागते. तीन दिवस कागद भिजवला की त्याला सडल्याचा वास येतो. पण आता भिजवण्याच्या ऐवजी  मशीनने कागदाची बारीक भुकटी करतो.  त्यामुळे काम सुकर आणि सुसह्य झाले आहे.  कागदाची पूड करणे एवढंच काम मशीनने होतं बाकी सगळी कामे कलाकुसरीची असतात ती हातानेच करावी लागतात.  माझ्या एकटीच्याने ती कामे करणे शक्य होत नाही.   त्यासाठी मी बऱ्याच मुलींना प्रशिक्षण दिले. अनाथगृहातील मुलींना प्रशिक्षण दिले. त्या चांगल्या तरबेजही झाल्या. अठरा वर्षाच्या झाल्या की त्यांना आश्रम सोडावा लागतो.  त्यामुळे त्या आश्रमात असेपर्यंतच मदत करू शकतात. मातृसेवा संघातील एक मुलगी चांगल्या बाहुल्या करायला शिकली. त्यावेळी आम्ही गोकुळपेठेत राहायचो. नंतर आम्ही ओंकारनगरला राहायला आलो. हे घर तिला खूप दूर पडायचे. आमच्या घरी आम्ही तिला ठेवून घ्यायला तयार होतो पण ती तिच्या गावी गेली. ती गेली तेव्हा असं वाटलं की आमचा उजवा हात निकामी झाला. आम्ही तिला सहारा देता देता तिच आमचा सहारा बनली होती.

प्रश्न: बाहुल्यांशिवाय इतर काय काय बनवता?

रमणी: देवी-देवतांच्या मुर्त्या, भित्तिचित्रे, शोभिवंत, आकर्षक टेबले इ. पूर्वी मी बनवायचे आणि विकायचे पण नंतर माझ्या लक्षात आलं की  गिऱ्हाईकाची आवड वेगळी असू शकते. मग मी गिऱ्हाईकाच्या आवडीनुसार, मागणीनुसारही बनवू लागले. कोणी विहिणीची पंगत मागतं, कोणी अष्टवर्गाची पंगत मागतं, असे मागणीनुसार मी वस्तू बनवू लागले.  ह्यातूनच मी शिकत गेले, नवीन नवीन कल्पना सुचत गेल्या आणि आज मला विश्वास वाटतो की गिऱ्हाईक जे मागेल ते मी देऊ शकते.

प्रश्न: ह्या बाहुल्या व इतर वस्तू मजबूत असतात का? आणि त्यांची काळजी कशी घ्यायची?

रमणी: कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या ह्या सगळ्याच वस्तू खूप टिकाऊ असतात. रंगही चांगल्या प्रकारचे वापरलेले असतात. ओल्या कापडाने पुसल्या की स्वच्छ होतात. फक्त एकच काळजी घ्यायची खूप वेळ पाण्यात किंवा ओल्या राहायला नको.

प्रश्न: तुम्हाला कोणी स्पर्धक नाही पण व्यवसायात स्पर्धा असावी की नसावी?

रमणी: हो, हे खरंच आहे की मला स्पर्धक नाही. स्पर्धा असावी की नसावी हे मात्र मी सांगू शकत नाही. मी नफा-तोट्याचा विचारच करत नाही. मी केवळ माझ्या आनंदासाठी करते. मला खूप समाधान मिळतं. मी बस्स आयुष्यभर फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या, शोभिवंत वस्तू बनवत जाव्या ज्यांना माहिती असते त्यांनी त्या घेऊन जाव्या. मी कुठेही जाहीरात करत नाही. पण मी विक्रीला सुरुवात केली ते प्रदर्शनांमधूनच.   प्रदर्शनांमधून खूप लोकांपर्यंत पोचता येतं.  दक्षिण मध्य कला केंद्रांच दरवर्षी प्रदर्शन भरतं त्यात किंवा महिला उद्योजिकांच प्रदर्शन भरतात त्यात माझा नेहमीच सहभाग असतो. विक्री करणं त्यासाठी खटाटोप करणं, मला जमतंच नाही म्हणा किंवा तो माझा पिंडच नाही. त्याबाबतीत मी जरा कमीच पडते. खरं तर ह्या कामासाठी मला मदतनीस हवा आहे जेणेकरून मी जास्त उत्पादन करू शकेन अन जास्तीत जास्त महिलांना रोजगार देऊ शकेन. मी एक स्त्री आहे ह्याचा मला अभिमान, गर्व आहे.   महिला  सर्व तऱ्हेने सक्षम व्हायला हव्या. मला त्यांच्यासाठी खूप काही करावेसे वाटते. मी खूप काही करू शकत नाही पण महिला सक्षमीकरणात माझा खारीचा वाटा म्हणजे माझ्या सगळ्या मदतनीस  महिला आहेत.

प्रश्न: स्पर्धा म्हणजे आव्हानं! पण तुम्हाला स्पर्धक नाही त्यामुळे आव्हाने नाहीत का?

रमणी: मला स्पर्धक नाही हे खरंय, स्पर्धेत टिकण्याची आव्हानं नाही हेही तितकंच खरंय पण माझी माझ्याशीच स्पर्धा असते. उत्तमोत्तम कलाकृती माझ्या हातून घडाव्या असं मला वाटतं. आव्हानं नाही असे नाही. थोर पुरुषांचे/व्यक्तिमत्त्वांचे पुतळे बनवणे हे आव्हानात्मक असते कारण त्यात बदल करून चालत नाही, चुका चालत नाही किंवा नर्तकांच्या मुद्रा अगदी अचूक  असाव्या लागतात आणि ह्या अश्याच बाहुल्या मी प्रामुख्याने बनवते. एकदा भरतनाट्यम नर्तिकेची बाहुली बनविली जिच्यात मुद्रेचा हात चुकला होता. उजव्याच्या ऐवजी डावा झाला होता. एका प्रदर्शनात एका नर्तिकेने ती चूक लक्षात आणून दिली.   प्रादेशिक अथवा विशिष्ट नृत्य प्रकाराच्या बाहुल्या बनवताना अभ्यास करावा लागतो. कपडे, दाग-दागिने, केशरचना इत्यादीचा अभ्यास करावा लागतो. पूर्वी वेगवेगळ्या वाचनालयात जाऊन, पुस्तक शोधून, संदर्भ मिळवून अभ्यास करावा लागायचा त्यात वेळ व श्रम खूप लागायचे. पण आज संगणक व आंतरजालामुळे हे काम सोपे झाले आहे.

प्रश्न: आव्हानं आहेत तश्याच अडचणी पण असतील त्या कोणत्या?

रमणी: अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच त्यावर मात करतच पुढे जायचं असतं.   घर सांभाळून जेव्हा सुरू केलं तेव्हा बऱ्याच अडचणी होत्या. पण मी जिद्दी अन हट्टी आहे. एकदा ठरवलं ते तडीस नेते, अडचणींवर मात करत. आता मदतनिसांची कमतरता हीच एक मोठ्ठी अडचण आहे.  मी मगाशी म्हटलं तसं माझ्या सगळ्या मदतनीस महिला आहेत. स्त्रिया मुळात खूप कामसू, नीटस अन शिस्तबद्ध असतात. त्या जेवढ्या वेळ काम करतात ते अगदी मन लावून करतात.  त्या आपलं घर कुटुंब सांभाळून हे काम करत असतात. त्यांना त्यांच्या कौटुंबिक अडचणी असतात. मुलींना मी प्रशिक्षण देते  लग्न झालं की त्या सोडून जातात. त्यांच्या जश्या कौटुंबिक अडचणी असतात तश्याच माझ्याही होत्याच.   काही वर्षांपूर्वी माझ्या सासूबाई अंथरुणाला खिळून होत्या. मुलगी लहान होती. घरात त्यांचे करणारे कोणी नव्हते. मग मी काही वर्ष काम बंद ठेवले होते. पण आज मला खंत वाटत नाही उलट मी समाधानीच आहे.  प्रत्येक स्त्री आपल्या घराला, कुटुंबाला प्राधान्य देते आणि ते योग्यच आहे, असे माझेही मत आहे. सासूबाई निवर्तल्या, मुलगी शिकायला बाहेर गेली मी आता भरपूर वेळ देऊ शकते. नव्या जोमाने मी आता कामाला लागले आहे.

प्रश्न: ह्या तुमच्या यशाच श्रेय कोणा-कोणाला द्याल?

रमणी: यादी करायची म्हटलं तर अगदी वरच्या क्रमांकावर आहे ती माझी 'आई' नंतर मामा ज्याच्यामुळे आमची कला लोकांपर्यंत पोचली,  माझे कुटुंब खास करून माझे पती ज्यांनी मला प्रोत्साहित केलं, रसिक चाहते व टीकाकार माझे वडिल ज्यांच्यामुळे सुधारणा करत उत्तमोत्तम कलाकृती घडवत गेले.  आणि हो, विशेष म्हणजे सरकारी हँडीक्राफ्ट बोर्ड. वेळोवेळी मला बोर्डाकडून प्रदर्शनांसाठी बोलावल्या जायचं.  जाण्यायेण्याचा खर्च, सामानाच्या वाहतुकीचा खर्च बोर्ड करतंच करतं  तसेच छोट्या-मोठ्या, नवशिक्या कलाकारांना सर्वतोपरी मदत करतं  ही आणखीनं एक विशेष बाब. मी लगद्याचे प्रयोग करत होते तेव्हा मला हँडीक्राफ्ट बोर्ड रिसर्च सेंटरची खूप मदत झाली. दक्षिणमध्य सांस्कृतिक मंडळाच्या आयुक्त रश्मी शुक्ला ह्यांनी पण नागपूरमध्ये खूपच छान काम  केलं  त्यांनी कलाकारांना उत्तेजन व प्रोत्साहन दिलं.

प्रश्न: बाहुल्या बनविण्या व्यतिरिक्त अजून काय छंद आहेत?

रमणी: मला साहित्य कलेची आवड आहे.   वाचायला, गाणं ऐकायला आवडते. विणकाम भरतकाम करायलाही आवडते.  मला स्वयंपाकाची खूप आवड आहे मी वेगवेगळे पदार्थ करून बघत असते. मला फिरायला खूप आवडते. प्रदर्शनांच्या निमित्त्याने बरेच प्रांत, देश फिरता आले. मी कॉलेजमध्ये असताना एनसीसी एअरविंगमध्ये होते. सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये भाग घेतला होता.   काही वर्ष मी विदर्भ महिला उद्योजक बोर्डाची सेक्रेटरी होते. जे जे काही आहे त्याचा आस्वाद, अनुभव घेत समृद्ध जीवन जगायला आवडतं.

प्रश्न तुमचे आदर्श कोणते?

रमणी: माझी आई माझा आदर्श आहे. इंदिरा गांधी, झाशीची राणी मदर तेरेसा ह्या तर माझ्या आदर्श आहेतच त्याचबरोबर ज्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे म्हणूनच की काय मला देवाने मुलगी दिली.

प्रश्न राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुमचं नाव देण्यात आलं आहे, कसं वाटतं?

रमणी: प्रांतीय स्तरावर कुठलेही पुरस्कार नाही. महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यांमध्ये हस्तकलेसाठी पुरस्कार आहेत.  राज्यातून 'दशावताराच्या बाहुल्या' राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या आहेत. खूप छान वाटतं. खूप आनंदी अन समाधानी आहे मी. ह्या बाहुल्यांमुळे मोठ-मोठ्या व्यक्तींकडून भरभरून कौतुक मिळालंय. चंडीगढला होणाऱ्या रौप्य महोत्सवी हस्तकला 'अपना उत्सव' साठी  पाच राज्यांतून हजार कलाकार बोलावण्यात आले आहे त्यात मलाही बोलावण्यात आले आहे.  तामिळनाडूत ही कला बघायला मिळते. तिथे कागदलगद्याचे मोठमोठे पुतळे व मुखवटे बनवतात.    राज्यस्तरावर अथवा राष्ट्रीयस्तरावर एखादं प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावं ज्यामुळे ही कला विकसित व वृद्धींगत होईल अशी इच्छा आहे.   मला एकच खंत आहे कोणत्याही कलाक्षेत्रातलं उदाहरणार्थ चित्रकला, मूर्तिकला,  मी तांत्रिक शिक्षण घेतलेलं नाही. ते कदाचित घेतलं असतं तर ह्याहून सुंदर, सुबक बाहुल्या बनवू शकले असते.

 ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोचावी अशी तुमची मनापासून इच्छा आहे ती पूर्णं होवो!  त्यासाठी तमाम रसिकांतर्फे 'हार्दिक शुभेच्छा'