जंगलचा कायदा

कोल्होबाने शेळी खाल्ली
केस फाईल झाली
कावळोबा झाले वकील
वाघोबा झाले न्यायाधीश

एकच डोळा फिरवीत
कावळोबांनी काढला पॉइंट
शेळी तर आजारीच होती
केव्हातरी मरणारच होती

कोल्होबांना वाईट वाटते
डोळ्यांमधून पाणी गळते
पुन्हा शेळ्यांकडे पाहणार नाहीत
त्या रस्त्याने जाणार नाहीत

मिशितल्या मिशीत हसत
वाघोबा म्हणाले, " ओके "
नका चालवू उगाचच डोके
कोण आहे साक्षीदार ? "

कोल्होबांच्या नजरेतली पाहून लाली
ससोबांनी घाबरून साक्षच फिरवली
जंगलचा कायदा वेगळाच निघाला
वाघोबांनी भला मोठा" शेअर" मागितला.
        ते म्हणाले,
"या वेळी सोडून देतो
इथून पुढे ताकीद देतो
माझा शेअर मला हवा
शिकार करून माझ्यापुढे ठेवा "

"वाटे माझे मीच करीन
उरले सुरले सर्वांना देईन"
कोल्होबांना मारून डोळा
कावळोबा म्हणाले आता मात्र पळा

केसचा फज्जा केव्हाच उडाला
ससोबांच्या मागे कोल्होबा लागला
पटकन ससोबा बिळात शिरले
कोल्होबांना मग ते टाटा करू लागले.