शब्दबद्ध

सहज स्फुरली म्हणून लिहिली कविता
शब्दबद्ध झाली म्हणून लिहिली कविता

वाचणारा वाचतो प्रेमाने
 कोणी नुसतीच नजर फिरवतो
कोणी स्मरतो, कोणी विसरतो
तरी लिहिली जाते कविता
 कोणाच्या गाली आठवणींचे
मोरपीस फिरविते कविता
कोठे आठवणींच्या जखमेवर
मीठ चोळते कविता

सहज स्फुरली म्हणून लिहिली कविता
शब्दबद्ध झाली म्हणून लिहिली कविता

 कविता लिहिण्या कोणा लाभे
मोरपीस अन ओंकाराची साथ
कोणाहाती गवताची काडी
अन धूळपाटीच परिसरात
नेहमीच कोठे महाकाव्य
सहज जन्माला येते
कधी वेदनेची, कधी संतापाची
कळ कागदावर उतरते

सहज स्फुरली म्हणून लिहिली कविता
शब्दबद्ध झाली म्हणून लिहिली कविता

 नेहमी कोठे लागतात
 यमक-छंद-अनुप्रास
याविनाच जमून येते कधी
 कविता विनासायास
 तुम्हा वाटते 'तो' नुसते
 र-ट-फ ला 'ल' जोडतो
टरफल उचकटून पाहता
आशयाचा गाभा हाती लागतो

सहज स्फुरली म्हणून लिहिली कविता
शब्दबद्ध झाली म्हणून लिहिली कविता

कोणी लिहितात ते असते
 प्रतिभावंतांच्या सर्जनाचे दर्शन
आणि कोठे घडते ते असते
उथळ विचारांचे प्रदर्शन?
मौन तोडते अनावर भावना
तेंव्हा सहजच जन्माला येते कविता
प्रत्येकासाठी ज्याची-त्याची
अर्थवाही असते कविता

सहज स्फुरली म्हणून लिहिली कविता
शब्दबद्ध झाली म्हणून लिहिली कविता