मी
माझ्या किनाऱ्याच्या शोधात
माझी वाळू, माझे माड,
माझा वारा, सूर्य,
माझा उजेड, माझा अंधार.
आणि माझ्या पायांना
जमिनीची शाश्वती.
माझ्या सागराचा शेवट
लाटांवरच्या अनंततेनंतरचे स्थैर्य
जिथे रुतेल माझा नांगर,
रुजण्याच्या खात्रीसोबत.
जणू अढळपद ध्रुवबाळाचे
आकाशाचा तो कोपरा जिथून त्याला कोणी 'उठ' म्हणणार नाही...
प्रवास तर होता आहेच चालू,
प्रश्नांचीच सोबत...
आणि कदाचित,
कदाचित
त्या किनाऱ्यावर
सापडतील मला उत्तरे,
तिथे उलगडतील कोडी,
आणि निवतील साऱ्या शंका
'होता का काही अर्थ खरंच, ह्या सगळ्याला?'
कदाचित,
तिथे सापडतील मला
मी शोधत असलेले, आणि माझ्या प्रवासाचेही
अर्थ.
मी
माझ्या किनाऱ्याच्या शोधात...