पिल्लू घरी येता.....

पिल्लू घरी येता.....

वळवाची जोरदार सर नुकतीच पडून गेलेली. इतका वेळ बंद केलेली घराची दारे-
खिडक्या उघडली. दारातून बागेत पाउल ठेवले तर समोरच एक पक्ष्याचे पिल्लू
उताणे पडलेले दिसले..... पाय वर .... चोच वासलेली ....
मी जवळ जाऊन नीट निरखले तेंव्हा लक्षात आले अरे हे मेलेले नाही. अजून धुगधुगी आहे तर ! पण याला कसे वाचवायचे?
त्याला उचलले व घरात आणले. त्याला उब कशी आणावी बरे? एक जाड कापड शोधले.
त्यावर त्याला ठेवून दुसऱ्या कोरड्या फडक्याने ( ईस्त्रीवर गरम करून)
त्याला हळू हळू शेकत राहिलो.
एकीकडे विचार करत होतो हे असे पावसात सापडले कसे? बहुतेक, याची आई याला
उडायला शिकवत होती का हेच आगावूपणा करून उबदार घरट्याच्या बाहेर पडले?
नीट निरखताना लक्षात आले की ते ब्राह्मणी मैनेचे पिल्लू होते. त्याच्या डोक्यावरील काळ्या टोपीमुळे हे लगेच लक्षात येत होते.
काही मिनिटातच त्याच्या अंगात उब आली. हुश्श, याचा जीव तर वाचला! पण आता
हे दमले असेल तेंव्हा खाणार काय व कसे? कारण पंखांची वाढ झालेली असली तरी
पिल्लूच होते.
परत एक प्रयत्न करावा म्हणून साखरेचे पाणी करून ड्रॉपरने हळू हळू त्याच्या
चोचीत सोडत राहिलो. काय आश्चर्य ! काही वेळातच ते पट्ठे आपल्या पायावर उभे
राहिले की! म्हटले वा ! परमेश्वराला याला जीवदान द्यायचेच होते तर!

एवढे करेपर्यंत संध्याकाळ झालेली होती व आता याला रात्रभर कुठे व कसे ठेवायचे?
एक खोके मिळवले व त्यात उबदार फडक्यावर त्याला ठेवले. मांजरापासून
वाचवण्या करता बेडरूम मधे बेडखाली महाराजाना स्थानापन्न केले एकदाचे!
रात्रभर मला वाटत होते की हे उडून जाण्याचा प्रयत्न करू लागले तर ?

सकाळी प्रथम हे महाराज कुठे आहेत ते पाहिले तर बिचारे खोक्यात बसून होते की चक्क!
आता परत प्रश्न, याला साम्भाळायाचे कसे व साम्भाळले तरी याचे आई-बाप याला
स्वीकारतील का नाही ? कारण लहानपणी पाहिले होते चिमण्यांच्या पिल्लाना हात
लावला तर काय होतं ते!
विचार केला बघू पुढचे पुढं ! आता तरी याला साम्भाळायाचे कसे ते पाहू.

मग काय, घरातील सगळ्याना ड्यूटीलाच लावले. आई त्याच्यासाठी भात करायला!
मी, भाऊ, बहिण व वडिल त्याच्या सेवेला - त्याला पाणी दे, त्याला खाऊ घाल,
मांजरापासून त्याचे रक्षण कर - अशा अनंत गोष्टी.

या महाराजांचे एक बरे होते की याला शारीरिक इजा काहीही नव्हती व ते
खोक्यातून बाहेर कुठे फिरायला वा उडायला राजी नव्हते. फ़क्त आमच्या सतत
सरबराईमुळे म्हणा किंवा त्याची सवय - सतत थोड़ी शी व शू चालू ! मधूनच ते
विशिष्ट आवाजही काढायचे.
आम्हाला असे वाटत होते की जशी आपली पिल्लं किरकिर करतात तसेच हेही करत
असेल झालं. पण नंतर जशी उन्हं चढू लागली तसं याचा आवाज का येत होता ते
लक्षात आलं.

आमच्या घराबाहेरही एका पक्ष्याचा आवाज येवू लागला. बाहेर येऊन पाहिले
तर काय त्या पिल्लाची आई (अशा ठिकाणी आईच असणार, तिची मायाच तेव्हढी तीव्र
असते) घुटमळत होती! आता परत पोटात गोळा की पिल्लाला जवळ करेल का ?
सगळे म्हणू लागले आपण ज़रा लांब थांबून पाहू या तर, कारण एवढी धिटाइने आली
आहे तर बघू या काय होतयं ते! आम्ही सर्व पिल्लापासून दूर झालो व त्या
खोलीचे दार उघडे ठेवून या जिवंत नाट्याच्या पुढील अंकाकरता सज्ज होवून
बसलो. पिल्लाची आई अंदाज घेत पिल्लाकडे सरकत होती. काही धोका नाही हे
लक्षात आल्यावर तिचे पिल्लाशी त्यांच्या भाषेत काहीतरी हितगुज झाले. आता
ती पक्षीण बाहेर उडून गेली. आम्ही सारे हिरमुसलो. पण आता आमच्या आईने तिचे
हृदगत जाणले व म्हणाली ज़रा दम धरा व पहा.
झालं ! पुन्हा वाट पहाणं आलं. मात्र ज़रा वेळानं आमच्या आईचे खरे झाले. आता
ती पक्षीण परत आली ते चोचीत त्या पिल्लाला खाणे घेऊनच. आम्ही सर्वानी मोठा
सुस्कारा सोडला. जसजशा तिच्या फेऱ्या वाढू लागल्या तसे आमचे सर्वांचे
चेहरे फुलू लागले व जेव्हा ते पिल्लू त्याच्या आईबरोबर बाहेर झाडाच्या
फांदीवर बसले तेव्हा असं वाटलं की वा ! लागले बाबा सगळ्यांचे श्रम सार्थकी
!
आता ते पिल्लू व आई किती परिपूर्ण चित्र दिसत होतं ते !