समीकरण

बंगलोर हैदराबाद राजरस्ता सोडून रावसाहेबांची होंडा अॅकॉर्ड पुटपर्थीच्या रस्त्याला वळली आणि रावसाहेब मागच्या सीटवर जरा आरामात रेलून बसले. वेगात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा त्रास आता होणार नव्हता. त्यांना एकदम थोडेसे स्वस्थ, शांत वाटायला लागले. शेवटचे तीसचाळीस किलोमीटर. अर्ध्या पाऊण तासात आपण पोहोचू सुद्धा. मग कसलीच काळजी, चिंता उरणार नव्हती.

वास्तविक सकाळी बंगलोरहून निघाल्यापासूनच रावसाहेबांना अस्वस्थ वाटत होते. उलट सुलट विचार मनातील प्रश्नांचा  गुंता वाढवीत होते. नेमके उत्तर सापडत नव्हते आणि तर्कसंगत विचार करण्याची, एखाद्या प्रश्नाच्या मुळापर्यंत खोलवर जाण्याची इतक्या वर्षांची सवय आज उपयोगी पडत नव्हती.

गाडीचा वेग एकदम कमी झाला. रावसाहेबांनी खिडकीची काच खाली करून बाहेर पाहिले. शाळेला निघालेली पाच सहा मुले रस्ता ओलांडत होती. अगदीच लहानसे गाव. रस्त्याच्या लगतच शाळेचे आवार. शाळेची इमारत म्हणजे एका लांब व्हरांड्याला लागून चार खोल्या. त्यावर उतरते कौलारू छप्पर. समोर लहानसे पटांगण. मधोमध झेंडा उभारण्यासाठी लोखंडी नळीचा ध्वजस्तंभ. पटांगणात मुले खेळत होती. शाळा सुरू व्हायची घंटा अजून झाली नव्हती. सगळ्यांचाच निळी अर्धी चड्डी आणि पांढरा शर्ट असा गणवेश... पण त्यातही काही मळलेले, सुरकुतलेले, एखादाच स्वच्छ धुऊन, झटकून वाळवलेला. पण खेळण्याचा, दंगा करण्याचा उत्साह मात्र अमाप. स्वच्छंदपणे खेळायला मिळते आहे याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावरून ओसंडून चाललेला. शाळेच्या व्हरांड्यातच गजांची खिडकी आणि दार यांच्या मधल्या जागेत भिंतीलाच काळा रंग लावून फळा तयार केलेला दिसत होता. त्यावर खडूने काय लिहिले आहे ते रावसाहेबांना लांबून दिसत नव्हते. पण त्यांची खात्री होती की " आळस हा माणसाचा शत्रू आहे" किंवा " उद्योगी पुरुषाच्या गळ्यात लक्ष्मी माळ घालते" अशासारखा एखादा सुविचार किंवा सुभाषित तिथे लिहिलेले असणार. संस्कृतचे किंवा मराठीचे शिक्षक असा सुविचार फळ्यावर लिहिण्याची दैनंदिन कामगिरी  अक्षर आणि शुद्धलेखन चांगले असलेल्या एखाद्या  विद्यार्थ्यावर सोपवीत असणार.

"श्रीराम! आज काय सुविचार लिहिणार आहेस फळ्यावर. नीट लिहून आणला आहेस ना? " संस्कृतच्या भिडे मास्तरांचा जाड पण स्वच्छ आवाज. आज इतक्या वर्षानंतर, इतक्या अनोळखी जागी, अगदी अनपेक्षित क्षणी कुठून येतो आहे हा? रावसाहेब क्षणभर चमकले. पण मग लक्षात आले की हे तर आपल्याच मनाचे खेळ. असं का व्हावं? बरोबर. अशीच नव्हती का आपली शाळा, लहानपणी वडगावला असताना? गाडी पुढे पळत होती आणि रावसाहेबांचे मन मागे धावत होते.

वडगावच्या शाळेत श्रीराम देशपांडे म्हणजे आदर्श विद्यार्थी होता. लोकल बोर्डाची छोटीशी शाळा. प्रत्येक वर्गात जेमतेम वीस मुले. त्यात ब्राह्मणाच्या घरची दोन तीनच. सामान्यतः त्या काळी ब्राह्मणाच्या पोराला मिळणाऱ्या दोन्ही देणग्या - बुद्धी आणि दारिद्र्य - श्रीरामला उदंड मिळालेल्या होत्या. वडील पोस्टात कारकून. घरात तो, त्याच्या दोन लहान बहिणी, आई, एक लग्न न झालेली आत्या, दमेकरी आजोबा... असा सहासात माणसांचा संसार रेटता रेटता वडिलांची आणि आईची दमणूक व्हायची. पण घरचं वातावरण मात्र प्रसन्न असायचं. लक्ष्मी रुसली असली तरी सरस्वतीचा वरदहस्त होता. आजोबा कुठल्या कुठल्या जुन्या पोथ्या आणि ग्रंथ किलकिल्या डोळ्यांनी वाचायचे आणि श्रीराम हातात सापडला की त्याला त्यातल्या गोष्टी आणि विचार सांगत बसायचे. विचार कळण्याचे वय नव्हते पण गोष्टी ऐकायला मात्र मनापासून आवडायचे. ग्रामपंचायतीच्या मोफत वाचनालयातून दादा पुस्तके घरी आणायचे. ऑफिसचे घरी आणलेले काम रात्री दिवा जाळून संपवल्यानंतरही झोपण्यापूर्वी काहीतरी वाचत बसायचे. आई आणि आत्या दर शुक्रवारी देवीच्या देवळातल्या भजनात सहभागी व्हायच्या. खरंच किती छान होतं नाही आपलं घर. दिवसभर कष्ट करूनसुद्धा आईचा चेहरा कसा प्रसन्न दिसायचा. एकंदरीत सगळ्या घराचीच आपल्या वाट्याला आलेल्या कामावर, कष्टावर अमाप श्रद्धा होती.

आपला वर्गातला पहिला नंबर कधीच चुकला नाही. नियमित आणि झटून अभ्यास केला की पहिला नंबर यायलाच पाहिजे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालापर्यंत गाव, शाळा, सवंगडी, घर... एक छान, छोटेसे, बंदिस्त जग होते. दादा नेहमी म्हणायचे, " अरे राम! भरपूर कष्ट करावे, खूप शिकावे, मग यश आणि संपत्ती जाणार कुठे? त्यांना आपल्याकडे यायलाच लागेल. " हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात स्वतःला फार शिकता आले नाही त्याची खंत पण मुलगा खूप शिकेल आणि भविष्यकाळात कुटुंबाची स्थिती सुधारेल हा दुर्दम्य आशावाद यांचे मजेशीर मिश्रण दिसायचे.

श्रीराम देशपांडे बोर्डात सातवा आला आणि त्याचे आणि त्याच्या वडगावच्या शाळेचे नाव पुण्यामुंबईच्या पेपरात झळकले, घरोघरी पोचले. इतक्या छोट्या गावातून एखादा मुलगा इतकी मजल मारतो? सतत बातमीच्या शोधात असलेले बातमीदार वडगावला येऊन त्याची मुलाखत घेऊन गेले. त्याने अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले, " नियमित आणि भरपूर अभ्यास, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांचा पाठिंबा यामुळेच मी हे यश मिळवू शकलो. " बातमीदारासाठी हे शब्द, ही वाक्ये जुनीच, अनेकदा वापरून गुळगुळीत  झालेली होती. पण ती उच्चारताना श्रीराम मात्र मनापासून, प्रामाणिकपणे बोलत होता. मुलाखत सुरू असताना आणि ती फोटोसकट छापून आल्यानंतर त्याच्यावर पडणाऱ्या आजूबाजूच्या लोकांच्या कौतुकाच्या नजरा त्याचा विश्वास बळकट करीत होत्या. आता त्याला यशाचे समीकरण उलगडले होते.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे पत्र आले आणि दादांनी त्याला मिठीच मारली. महाविद्यालयाने त्याला शास्त्र शाखेत प्रवेश तर दिलाच होता शिवाय फी माफी आणि राहण्याजेवण्याचा खर्चही तेच करणार होते.

पुढचा सगळा प्रवास अगदी सुरळीत झाला. दोन वर्ष सायन्स, मग इंजिनियरिंग, त्यानंतर एम. टेक. दिवसरात्र सतत अभ्यास आणि त्यानंतर परीक्षेत मिळणारे भरघोस यश... एक साचाच ठरून गेला. याच्यापलीकडे काही असू शकेल असं कधी वाटलंच नाही. आजूबाजूचे विद्यार्थी पुस्तकातला किडा, स्कॉलर... अशी टवाळी करायचे पण श्रीरामने तिकडे कधीच लक्ष दिले नाही.

"मिस्टर देशपांडे! यू हॅव अॅन एक्सलंट अॅकॅडेमिक करिअर रेकॉर्ड! अवर कंपनी इज प्लीज्ड टू ऑफर यू अ पोझिशन ऑफ डिझाइन इंजिनिअर. "

"थॅंक्यू सर! आय विल डू माय बेस्ट! "

"ऑल राइट यंग मॅन! रिपोर्ट टू अवर बंगलोर युनिट अॅज सून अॅज पॉसिबल. "

 "येस सर! "

श्रीराम एशिया ब्राऊन बोवरीच्या बंगलोर युनिटला रुजू झाला तोपर्यंत घरची परिस्थितीही बदलली होती. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाच आजोबा गेले. वडिलांची बदली पुण्याच्या हेडऑफिसला झाली. धाकट्या बहिणींच्या शिक्षणाचा मार्ग सोपा झाला. त्याची नोकरी सुरू झाली आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही झपाट्याने सुधारली. एकंदरीत सगळे काही पूर्वीपेक्षा खूपच छान होते.

पुढची दहा बारा वर्षे फार झपाट्याने गेली. उशीरापर्यंत फॅक्टरीत काम... नियमित होत जाणारी प्रगती... वैयक्तिक जीवनात झालेला बदल... लग्न, एक मुलगा, दोन वर्षानंतर एक मुलगी... सगळे कसे अगदी सुरळीत, आखून दिल्याप्रमाणे चालले होते. मुले इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शाळेत शिकत होती आणि भाषा बदलली तरी संस्कार तेच होते.

पण मग नेमके कधी आणि काय झाले कुणास ठाऊक पण गोष्टी बदलायला लागल्या. कंपनीने एका मोठ्या प्रकल्पावर डायरेक्टर म्हणून श्रीरामची नेमणूक केली. प्रकल्पावर तीन चारशे माणसे काम करीत होती. आता त्याचे यश त्याच्या एकट्यावर अवलंबून नव्हते. अनेकांचा सहभाग, सहकार्य आणि परिश्रम  त्यासाठी आवश्यक होते. पहिल्या काही महिन्यानंतर त्याला प्रश्न पडायला लागले... आपण स्वतः एवढे जीव तोडून काम करतो पण आपले अनेक सहकारी बोनस, कॅन्टिन, मेडिकल बेनेफिटस अशा गोष्टींवर चर्चा करीत वेळ का वाया घालवितात? आपली जशी कष्टांवर, कामावर श्रद्धा आहे तशी यांची का नाही? इतक्या वर्षात आपण आजूबाजूचे जग बघितलेच नाही  की बघूनही ते आपल्याला कळलेच नाही?

हळूहळू प्रकल्पाचे माइलस्टोन्स गाठता येईनासे झाले. सहकाऱ्यांशी संवाद कठीण होऊन बसला. एखाद्याने त्याचे काम नीट केले नाही किंवा त्याला कामाला उशीर झाला तर श्रीराम त्याच्यावर ओरडायला लागला, त्याचा सर्वांसमक्ष अपमान करायला लागला. श्रीरामच्या वागणुकीविरुद्धच्या तक्रारी हळूहळू वरिष्ठांपर्यंत जात होत्या. जसा जसा प्रकल्प पुढे जात होता तसा तसा श्रीरामच्या मनावरचा ताण वाढतच होता. उच्च रक्तदाब, अल्सर वैगेरे पाहुणे शरीरात वस्तीला आले. स्वभाव चिडचिडा झालाच होता आणि अशातच एक दिवस...

दिवसाभराचे काम उरकत आले होते. रीले विभागाच्या इन्सपेक्शनची एक फेरी बाकी होती. आज ही कन्साइनमेंट नाशिकच्या युनिटला जायलाच हवी होती. त्यावर पुढच्या अनेक गोष्टी... जोडणी, चाचण्या... अवलंबून होत्या. दोन जिने उतरून तो रीले विभागात पोचला तेव्हा सगळी सामसूम होती. सुपरवायझर रघुरामनचा पत्ताच नव्हता. एक मदतनीस एका कोपऱ्यात खोकी भरत होता. श्रीरामच्या डोक्यात सणक उठली. त्याने त्या मदतनिसालाच विचारले,

"नाशिकची कन्साइनमेंट तयार झाली का नाही? पाठवली का आहे अजून इथेच? आणि तो रघुरामन... आहे कुठे तो? "

"सर! मला काहीच माहीत नाही सर! "

"माहीत नाही? का माहीत नाही? रघुरामनवरचा राग त्या बिचाऱ्या मदतनिसावर निघायला लागला होता.

" सर! माझे काम फक्त खोकी भरण्याचे आहे... कोण कुठे जातो आणि केव्हा येतो हे पाहायचे नाही! "

"उलट उत्तरं देतो? मला उलट उत्तरं देतो? नोकरीवरून काढून टाकीन... एकजात कामचुकार सगळे. " श्रीरामचा आवाज किंचाळल्यासारखा यायला लागला. आजूबाजूच्या विभागातले कामगार, सुपरवायझर गोळा व्हायला लागले. वातावरण खूपच तापले होते.

"सर! उगाचच नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या कशाला देताय? मला युनियनकडे जावं लागेल. " श्रीरामचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यानं जाऊन त्या मदतनिसाचा गळा धरला. तोंडाने किंचाळणे सुरूच होते...

"जा जा... युनियनकडे जा नाहीतर आणखी कुणाकडे जा. तू काय तुझा बापसुद्धा माझं काही वाकडं करू शकत नाही... मला उलट उत्तर करतो? तुला धडाच शिकवतो. " एकच गोंधळ उडाला. लोक मध्ये पडले. एकादोघांनी श्रीरामला बाजूला नेले आणि त्याच्या केबिनपर्यंत आणून सोडले. ह्या सगळ्या प्रकरणाचा गवगवा सगळ्या फॅक्टरीभर झाला. कामगार तापलेलेच होते. शिवाय झाल्या प्रकारात त्या बिचाऱ्या मदतनिसाचा खरोखरीच काही दोष नव्हता. नुसत्या माफीवर प्रकरण मिटण्यासारखं नव्हतं. शेवटी नाईलाजाने व्यवस्थापनाने निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी मॅनेजिंग डायरेक्टरच्या केबिनमध्ये शिरताना श्रीरामला पुढच्या गोष्टींची कल्पना आलेली होती.

"मि. देशपांडे! तुम्ही अत्यंत हुशार इंजिनिअर आहात हे मला माहीत आहे पण गेल्या काही महिन्यापासूनचे तुमच्या प्रकल्पाच्या प्रगतीचे अहवाल काळजी करायला लावणारे आहेत. तुमच्या हुशारीकडे आणि प्रामाणिक कष्टांकडे पाहून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होतो. पण कालच्या प्रसंगानंतर गोष्टी बदलल्या आहेत. कंपनीला प्रकल्पाच्या या टप्प्यावर कामगारात असंतोष किंवा संप अशा गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. चेअरमन आणि मी... आम्ही दोघांनीही याची चर्चा केली आणि आय अॅम सॉरी टू से धिस, बट यू आर अॅडवाइज्ड टू रिझाइन फ्रॉम दि जॉब विथ इमिजिएट इफेक्ट. आय विश यू ऑल दि बेस्ट इन युअर फ्यूचर! "

"थॅंक्यू सर! " एवढे दोनच शब्द भरल्या गळ्याने श्रीराम उच्चारू शकला.

पुढचे चार वर्षाचे वैराण वाळवंट. कितीही चालले तरी क्षितिजापर्यंत परत वाळवंटच. वाट अशी कुठे दिसतच नव्हती. इंडस्ट्रिअल वर्तुळात कोणीच नोकरी द्यायला तयार नव्हते. साठवणीच्या तळ्यातलं पाणी किती दिवस पुरणार? सगळंच बिघडलं होतं. मुळात स्वभावामुळे इतरांशी संपर्क कमीच होता पण आता तो शून्यावरच आला. दोन चारच मित्र, पण तेही टाळायला लागले. तो आणि बायकोमुले यांच्यात एक बोचणारा, अव्यक्त असा दुरावा निर्माण झाला. अशाच एका अस्वस्थ, ताणलेल्या संध्याकाळी शेजारचे माधवमूर्ती घरी आले. श्रीरामपेक्षा दहापंधरा वर्षांनी मोठे. नेहमीच शांत आणि हसतमुख अशा माधवमूर्तींचा मुलांना खूप लळा होता.

"मि. देशपांडे! इफ यू डोंट माइंड, शॅल आय सजेस्ट समथिंग? "

एव्हाना श्रीराम अशा अवस्थेला पोचला होता की कुठलाही आशेचा किरण दाखविणारी सूचना, तर्काची पर्वा न करता स्वीकारायला तो तयार होता.

"तुम्ही पुटपर्थीला बाबांकडे का येत नाही? नाही... मला माहीत आहे तुमचा या गोष्टींवर विश्वास नाही पण येऊन तर बघा. "

"विचार करतो. "

"विचार नका करू! दर वर्षी तेवीस नोव्हेंबरला बाबांचा वाढदिवस असतो. आपल्याच नव्हे तर बाहेरच्या अनेक देशातून बाबांचे अनेक भक्त येतात. मी दर वर्षी जातो. या वर्षी तुम्हीही चला माझ्याबरोबर. "

"ते एवढं म्हणताहेत तर जाऊन या! "... पत्नीची सहज केल्यासारखी पण अत्यंत आग्रही सूचना.

आठदहा वर्षापूर्वीचा बंगलोर ते पुटपर्थीचा प्रवास. माधवमूर्ती गाडी चालवीत होते पण श्रीरामची अवस्था भ्रमित आणि बधिरच होती. माधवमूर्तींची गाडी सरळ प्रशांतिनिलयाच्या आवारातच शिरली. माधवमूर्तींच्या इथल्या कामाची, भूमिकेची, पदाची श्रीरामला काहीच कल्पना नव्हती. बंगलोरच्या त्यांच्या घरी हॉलमध्ये भीतीवर बाबांचा एक मोठा फोटो होता पण त्यावरून काहीच कल्पना येत नव्हती.

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता तो मूर्तींबरोबर बाबांच्या दर्शनासाठी अतिप्रशस्त कुलवंत हॉलमध्ये पोचला. मूर्तींच्यामुळे बाबांच्या आसनासमोरच बसायला जागा मिळाली. पुढच्या तासाभरात हॉल भक्तांनी भरून गेला. तरीही वातावरणात गोंगाट अजिबात नव्हता तर एक शांततामय, अनामिक उत्कंठा होती.   साडेसहा वाजता बाबा आले. त्यांच्या आगमनाची सूचना देणारे संगीत वाजत होते आणि बाबा त्यांच्या नियोजित मार्गावरून शांत, आश्वासक कृपाकटाक्ष टाकीत संथ गतीने चालत येत होते. वाटेत अनेक भक्त नमस्कार, लोटांगणे घालीत होते. बऱ्याच जणांच्या हातात पाकिटे होती आणि बाबांनी ती स्वीकारावी यासाठी ते हात उंचावीत होते. प्रत्येकाच्या आयुष्यातले न सुटणारे प्रश्न, न उलगडणाऱ्या समस्या त्या पाकिटात बंद होत्या. बाबा मात्र त्यातली निवडकच पाकिटे घेत होते. त्या निवडीला कुठलाच, सहज समजणारा निकष दिसत नव्हता. ज्यांची पाकिटे घेतली जात होती त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान, एक सुटकेचा आनंद होता. आता आपल्या सगळ्या काळज्या, चिंता, प्रश्न बाबांनी स्वतःच्या शिरावर घेतले आहेत ही भावना त्यामागे होती. काही भक्तांच्या डोळ्यावाटे अश्रुधारा वाहत होत्या. ज्याची भक्ती करतो त्याचे प्रत्यक्ष दर्शन ही एक न आवरता येण्यासारखी उत्कट भावना डोळ्यावाटे अश्रू होऊन प्रकट होत होती.

बाबा आपल्या आसनावर विराजमान झाले आणि त्यांनी माधवमूर्तींकडे बघून स्मितहास्य केले. शेजारी बसलेल्या श्रीरामकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी माधवमूर्तींना खूण केली. त्याचा अर्थ माधवमूर्तींनी ओळखून हलकेच मानेने होकार दर्शविला. बाबांचे कुठच्यातरी विषयावर निरूपण सुरू झाले. तेलगू भाषेतील प्रत्येक वाक्याचा इंग्रजी अनुवाद बाबांचे एक शिष्य लगेचच सांगत होते. पंधरा मिनिटांच्या निरूपणानंतर बाबा उठले आणि सर्वांना आशीर्वाद देत आतल्या मंदिरात गेले. मागोमाग माधवमूर्ती श्रीरामला  आत घेऊन गेले. बाबांनी श्रीरामला पाहताक्षणीच सांगितले,

"तुमचा प्रश्न सुटेल, ही अंगठी मधल्या बोटात घाला. "  श्रीरामला काहीच कळत नव्हते. बाबांनी पुढे केलेली अंगठी पाहून त्याने यंत्रवत हालचालीने हात पुढे केला आणि अंगठीचा स्वीकार केला. इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा बोटात जास्त सुरक्षित राहील या विचाराने ती अंगठी बोटात घातली आणि रात्री तो माधवमूर्तींच्या बरोबर बंगलोरला परतला.

दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी सजनानी नावाचे गृहस्थ श्रीरामकडे आले. चेहऱ्यावर श्रीमंतीचे तेज आणि व्यापारी शहाणपण यांचे समोरच्यावर सहज छाप टाकणारे मिश्रण होते. वयानं श्रीरामएवढेच असावेत. सजनानींनी स्वतःची जुजबी ओळख करून देऊन इकडचे तिकडचे न बोलता सरळ विषयालाच हात घातला...

"मि. देशपांडे! मी तुमच्याकडे एक प्रपोजल घेऊन आलो आहे. मला एक इंडस्ट्रिअल युनिट सुरू करायचे आहे. माझ्याकडे पैसा आहे पण बुद्धी नाही. तुम्हाला आठवणार नाही पण मी ही पुण्याला फर्ग्युसनलाच होतो. तुम्हाला एक वर्ष ज्युनिअर. बुद्धी, हुशारी फारशी नव्हतीच. कसाबसा बी. एस. सी. झालो. तेव्हा मी तुम्हाला स्कॉलर म्हणून ओळखत होतो. वडिलांची एक मिल होती. शिवाय दोन दुकाने, शेअर्स मध्ये गुंतवणूक... पुष्कळ पैसा होता. पदवी पदरात पडल्याबरोबर सरळ वडिलांच्या धंद्यात लक्ष घातले. पैसा पुष्कळ केला पण नवीन, स्वतःचं असं काहीच नव्हतं. म्हणून आता तुमच्याकडे आलोय. तुम्ही तुमची बुद्धी चालवा आणि त्याला लागेल तेवढा पैसा मी पुरवतो. आणि एक शब्द देतो... मी तुमच्या कामात अजिबात ढवळाढवळ करणार नाही. "

श्रीरामला परत एकदा उत्साहित, उत्तेजित वाटायला लागले. त्याचे छोटेसेच युनिट सुरू झाले... वर्षे भराभर उलटत होती. यशाची सतत चढती कमान... मुळात प्रॉडक्ट डिझाइन छान होते. पुरवठा न करता येण्याइतकी मागणी सतत येत होती. नवनवीन कल्पना, नवे प्रॉडक्ट, धंद्याचा सतत विस्तार... या सगळ्याशी संलग्न पैसा, मानमरातब, घरदार, मोटारी, परदेश वाऱ्या... जिथं हात लावावा तिथं सोनं होत होतं... कुठलंही हातात घेतलेलं काम कुठलीही अडचण न येता यशस्वी होत होतं. गेल्या तीन वर्षापासून जनरल मॅनेजर असलेला रामचंद्रन फॅक्टरी अतिशय कार्यक्षमतेने चालवत होता. या सगळ्यातच गेल्या वर्षी इंपोर्ट सबस्टिट्युशन अवॉर्ड आणि या वर्षी स्मॉल स्केल इंडस्ट्री अॅसोशिएशनचे अध्यक्षपद... जर्मन कंपनीशी झालेला करार....

ड्रायव्हरने गाडीचा वेग एकदम कमी केला. रस्ता थोडा खालच्या पातळीवर होता. एखादा कल्वर्ट असावा तसं दोन्ही बाजूंना लोखंडी पाइप्स टाकून रस्त्याची सीमारेषा निश्चित केली होती. डावीकडच्या तळ्यातले पाणी त्या छोट्याशा पुलावरून उजवीकडच्या सखल भागाकडे वाहत होते. पाण्याची पातळी फार नव्हती... फारतर घोट्यापर्यंत. पण तरीही ड्रायव्हरने वेग कमी करून हळूहळू गाडी पुढे काढली. खरं तर नोव्हेंबरमध्ये इतकं पाणी? दरवर्षी आपण तेवीस नोव्हेंबरला येतो तेव्हा एवढं पाणी नसतं. या वर्षी पावसाळा जरा लांबलाच.

आपल्या बाबतीत पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलंय आणि इथे पुलावरून पाणी वाहतंय. तशाही परिस्थितीत त्या कल्पनेने एक स्मितरेषा रावसाहेबांच्या चेहऱ्यावर उमटली.

गेल्या आठ दहा वर्षात पुटपर्थीच्या कितीतरी फेऱ्या झाल्या. पण दरवर्षीची तेवीस नोव्हेंबरची फेरी मात्र एखाद्या व्रतवैकल्यासारखी. गेल्या वर्षी बाबा गेले तरी फेरी चुकली नाही. इथे आले की कसे शांत आणि सुरक्षित वाटायचे.

तरीही आज सकाळपासून ही अस्वस्थता कुठली? कशामुळे? जेव्हा आपण धडपडत होतो, कष्ट करीत होतो, एखाद्या छोट्याशाच ध्येयाच्या मागे लागून ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतो तेव्हा अशी अशांतता, अस्वस्थता कधीच जाणवली नव्हती. खरं तर अगदी छोट्या छोट्या यशासाठी आपण किती झटायचो. बाकीच्या आरामाच्या, चैनीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष देखील जायचं नाही. कष्टाचं आणि यशाचं एक साधं, सोपं समीकरणच होतं आपल्या आयुष्यात. कितीतरी वर्षे त्या समीकरणाच्या दोन्ही बाजू कशा पक्क्या नैसर्गिक आणि तितक्याच तार्किक होत्या.

पण मग मधल्या काही वर्षात घडलं ते काय? आणि गेल्या आठ दहा वर्षात घडतंय ते तरी नेमकं काय आहे? आपल्या आयुष्याच्या समीकरणाचा तोल बिघडलाय का मुळात समीकरणच चुकीचे होते? का या समीकरणात एखादा अदृश्य, चटकन न उमगणारा तरीही आवश्यक असा घटक आहे जो या समीकरणाचा तोल सांभाळतो आहे?

प्रश्न आणि प्रश्न. प्रश्नांचा गुंता. रोजच्या जीवनात आपल्याला हे एवढं कधी जाणवलं नाही. आज इथे या वाटेवर हे सारखे ढवळून वर का येते आहे?...

गाडी प्रशांतिनिलयाच्या फाटकातून आत जाऊन एकदम थांबली. खाली उतरून ड्रायव्हरने गाडीचे दार उघडले आणि रावसाहेबांनी आपल्या मेंदूचे दार घट्ट लावून घेतले.