मनातला पाऊस (वरदाची कविता)
पाऊस पडतोय.काय करायचं प्रश्न पडलाय?
सोप्पंय्!
जरा वाफाळता चहा कपात घ्या, बरोबर ताटलीत थोडी भजी घ्या.
बेडरूमच्या मोठ्ठ्या खिडकीपाशी आरामखुर्चीत झोके घेत बसा.
मग गाडी काढा आणि सीसीडीत जा.
कॉफी आणि सॅण्डविच घ्या.
सरळ घरी न येता जवळच्या चौपाटीवर जा.
समुद्रात बुडणारा सूर्य डोळे भरून बघा.
समुद्रात पाय बुडवा.
पाणीपुरी किंवा भेळपुरी हाणा.
तब्येतीची काळजी करू नका.
हे असलं खाऊन सगळ्यांचीच तब्येत बिघडते.
मग गाडी मुद्दाम हळू चालवत घरी या.
पोचल्यावर बेडरूममधल्या टेबलावर बसा.
पावसात काय काय केलं ते आठवा आणि कविता लिहा.
हेडिंग काय द्यायचं सुचत नाहीये?
मनातला पाऊस!
आहे की नाही सगळं सोप्पं?
--वरदा अभिजित रिसबूड.
रचनाकाल : १७/०६/२०१२.
दुपारी १२.३५ ते १२.४०