कधी हे कधी ते

तिच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवतोय. प्रत्येक क्षणात काहीतरी नावीन्य होतं, काहीतरी वेगळं होतं..
तिचं हसणं, कधी कधी रुसणं ... मग तिला मी मनवणं .. तिला लाल आप्पा वर मागे बसवून लांब कुठेतरी फिरायला घेऊन जाणे ! फिरून झाल्यावर पुन्हा 'पेठेत' प्रवेश केल्यावर गाडीवर बसल्या जागी तिनी हळूच चार इंच मागं सरकावं. मग बेपर्वा होऊन मी पण गाडी चालवता चालवता हळूच मागे सरकावं. 
तिच्याबरोबर कधी भर उन्हात राजगडचा तो अवघड बालेकिल्ला सर् केला तर कधी मुसळधार पावसात तोरण्याच्या धबधब्यात चिंब भिजलो ! सगळं आयुष्यच कसं एकदम रंगीबेरंगी झालेलं. 
दोघांनाही स्वत:चे "भूतकाळ" होतेच. आणि दोघांनीही ते पूर्णपणे बाजूला ठेवले होते. फक्त मौज मजा नव्हे तर एकमेकांच्या सुखात आणि खास करून दु:खात सुद्धा सहभागी व्हायला मजा यायची. 
दोघ एकत्र येऊन एखाद्या दु:खी प्रसंगाला तोंड देतानासुद्धा एक प्रकारचं सुख वाटायचं. 
पण कसंय ना.. सगळंच अगदी "स्ट्रेट फॉरवर्ड" असेल तर कोणाच्याच आयुष्याचा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. तसंच आमच्या नात्यात पण झालं. कोणाचीतरी दृष्ट लागली असंच म्हणावंसं वाटतंय खरंतर.
एका अगदी साधारण प्रसंगी, कोणत्यातरी तिसऱ्याच व्यक्तीसाठी ती माझ्याशी खोटं बोलली. कदाचित घडलेली गोष्ट तिला माझ्यापासून लपवायची होती किंवा माझ्या वागण्यात नकळत झालेली चूक मला दाखवून द्यायची म्हणून ती तसं वागली असेल.
पण जे घडलंय ते मला "न" आवडणं आणि घडलेल्या प्रकाराचा भयानक राग येणं "माझ्या" स्वाभाविक होतं. तिनी समजवायचा मनापासून प्रयत्न केला.
मला हे माहीत होतं की माझ्या मनाला दुखवायचा तिचा अजिबात हेतू नव्हता. खरंतर ती मला माझ्यापेक्षा जास्ती ओळखून होती. 'ती गोष्ट' मला आवडणार नाही आणि ती मला कळली असती तर मी प्रचंड चिडचिड आणि भांडणं केली असती असं तिला वाटलं. म्हणूनच ती तशी वागली होती.
मग असं वागायचं कशाला ? आणि मला आवडत नाही कारण ती गोष्ट नाही बसत "एटिकेट्स" मध्ये. खास करून तुम्ही एका रिलेशन मध्ये असताना... 
माझ्या मते खोटं ते खोटं 'च' होतं. ती माझ्याशी असं वागेल असं मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं.
जे व्हायचं ते झालेलं. विश्वासाला तडा गेला होता. त्याच पायावर पुढे आयुष्याची इमारत उभं करणं मला अवघड वाटायला लागलं. मनात एक विचार मात्र चालू होता. 
ह्या कारणास्तव तिच्याशी असलेलं इतके दिवसांचं नातं तोडायचं का ? 
प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक पाऊल टाकताना, तिचा विचार पहिल्यांदा करायचो. एकमेकांवर असलेल्या जीवापाड प्रेमावर असं सहजासहजी पाणी सोडणं शक्यच नव्हतं. कोणत्याही कारणास्तव तिला गमावायचं नव्हतं मला. "माणूस म्हटल्यावर चुका ह्या होणारंच" हेच "वाक्य" मनात ठेवून मी झालं गेलं विसरून जायचा निर्णय घेतला.
मी झालेलं विसरलोय ह्याचा अर्थ इथून पुढे सुद्धा असं घडलं तरी मी मुकाट ऐकून घेईन किंवा मी दर वेळेस समजून घेईन असा अजिबात नव्हता.
मानवी मनाचा गुणधर्म म्हणायचा की फक्त माझ्या मनाचा ते मला माहीत नाही, आम्ही परत एकत्र आलो खरं पण "ती आपल्याशी खोटं बोलली" हे मनातून बाहेर पडायच्या ऐवजी मनात खूप खोलवर कुठंतरी दडून बसलं.
त्या क्षणाला एका कोसळणाऱ्या बांधकामाचा मी कळत-नकळत पाया रचला होता. 
त्यापुढे कोणतीही गोष्ट करताना मनात नेहमीच पाल चुकचुकायची. स्वत:च्याच मनाला विचित्र प्रश्न विचारात बसायचे. 
ती इकडे आधीच कोणाबरोबर आली असेल का रे ? तिनी हा पिक्चर दुसऱ्या कोणाबरोबर तर नाही ना पाहिला आधी ? ह्या हॉटेलचं जेवण तिनी कोणाबरोबर जेवलं असेल का ?..  
कोणतीही गोष्ट करताना मन अगदी भरडून निघत होतं. तिच्यासाठी काहीही करताना त्यातली आपुलकी निश्चितच कमी झाली होती.
मनाला हा सगळा त्रास होत असताना माझा मनावर ताबाच राहिला नाही. ती ज्या प्रकारे माझ्याशी वागली, तसंच तिच्याशीपण वागायला पाहिजे, म्हणजे तिची चूक तिला कळेल असं मला वाटलं.
आत्ता ह्या क्षणाला बघायला गेलं तर, 'त्या वेळेस' मला काय वाटलं आणि काय नाही, ह्याच्यावर विचार करण्यात फारसा अर्थ वाटत नाही. त्या वेळेच्या मानसिक स्थितीमध्ये मला असं वाटून गेलं. त्याला काही खास कारण देता येत नाहीये. कदाचित माझ्या स्वभावाचा भाग असेल तो.
झालं तर, मी पण तिच्याशी सर्रास खोटं बोलून मोकळा झालो. जो प्रसंग तिच्यामुळे आमच्या आयुष्यात घडला, तसाच "खोटा" प्रसंग मी पण उभा केला. आणि तिला ऐकवला. साहजिकच तिला पण ह्यामुळे भरपूर त्रास झाला. मनात म्हटलं चला, झालं ते बस झालं.. तिला पण ह्या गोष्टीचा त्रास होतोय म्हणजे तिला चूक लक्षात आली आहे आणि परत नाही वागणार ती अशी. .. 
पण माझ्या असल्या वागण्यामुळे जखम बरी होण्याच्या ऐवजी जास्तीच चिघळली.
पुन्हा पुन्हा चुका ह्या होतंच राहिल्या. ती जे काही वागत होती त्यामुळे मला प्रचंड त्रास होत होता. तिच्या मते त्या गोष्टी चुकीच्या नसाव्यात कदाचित.
ती "अशी" वागली म्हणून मग मी पण "तसा" वागत राहिलो. एकावर एक खोटं बोलत राहिलो. इतकी भांडणं व्हायला लागली की त्यांची पण आता सवय झाली.
मनातून वाईट आठवणी काढून टाकायचा खूप प्रयत्न केला पण जमतच नव्हतं. त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहिल्या.. दोघांकडून..
ती कदाचित मला ज्याचा त्रास होतो तसं मुद्दाम वागली नसेलही, किंवा तिच्याकडून नकळत घडलं असेल. मला हे कळत आणि व्यवस्थित समजत असूनसुद्धा मी अगदी "जश्यांस तसं" वागतच राहिलो.
आज खूप भांडायचो तर उद्या परत एकत्र यायचो. "तुझ्याबरोबर जमेना आणि तुझ्यावाचून करमेना" अशातला प्रकार झालेला सगळा.
काही महिने असेच जात राहिले. मध्येच माझी सुप्त "मती" अचानक जागी झाली. माझ्या मनाला परत एकदा "वाटलं". जे चालू आहे ते सगळं खूप चुकीचं चाललंय. हे असंच पुढे चालू ठेवणं दोघांच्या हिताचं नाही
तसं हे मला खूपच आधीपासून वाटायला लागलं होतं. पण तिला सोडून माझाही जीव रमत नव्हता. ह्या वेळेस मात्र मी खूप विचार केला. घरून सुरुवातीला दोघांचाही चांगलं अगदी कौतुक झालेलं.
पण कालांतरानं अश्या नेहमीच्या भांडणांमुळे माझ्या घरून नकार आला होता.
मनावर दगड ठेवून तिला मी शेवटचं 'नाही' सांगितलं. साहजिकच तिला हे मान्य नव्हतं. इतके घट्ट ऋणानुबंध तोडायला ती तयार नव्हती. किंवा तिला ते शक्य नव्हतं कदाचित. पण ह्या वेळेस मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो.
ती म्हणाली "आपण बसून शांतपणे बोलू ह्या विषयावर. आपले प्रॉब्लेम आपल्यालाच सोल्व करायचे आहेत". परंतु अश्या अनेक बैठका मारून झालेल्या. "पुन्हा पहिले पाढे पंचावन्न" असंच नेहमी होत राहिलं. 
त्यामुळे मी परत मागे फिरायला नकार दिला.
नंतर परत कधी मेसेज नाही, ना कधी फोन नाही. कधी कोणत्या मित्राला "ती कशी आहे रे ?" असं विचारायची हिंमतसुद्धा नाही केली. आपल्या कामात मग्न व्हायचा मी जोरदार प्रयत्न सुरू केला. आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालोसुद्धा. मनात कितीही गडबड चालू असली तरी ती चेहऱ्यावर कशी आणायची नाही ह्याचीपण चांगली सवय झाली.
अनेक महिने निघून गेले. मनात ठरवलेलं की तिला जो त्रास दिलाय तो पुरे झाला... आपल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ द्यायचा नाही. मित्रांबरोबर फोटो काढणं, किंवा ते फेसबुकवर टाकणं बंद केलं. 
तिच्या पोस्ट्स, कॉमेंट्स बघून माझ्या मनाला होणारी हुरुहूर. आणि माझ्या पोस्ट्स, त्यावरच्या इतर मित्रांच्या कॉमेंट्स वाचून तिला कदाचित होणारा त्रास.. मग ती पोस्ट अगदी साधा "जोक' का असेना ..नकोच ते .. फेसबुक अकौंट च डी-ऍक्टिव्हेट केलं.
पण ह्या डोसक्यात २४ तास तिच्याच आठवणी. त्यांना कसं डी-ऍक्टिव्हेट करायचं ? चांगल्या क्षणांबरोबर वाईट आठवणी पण आहेतच.. चांगल्या आठवणी, ज्या मला कायमच्याच हव्या होत्या.. आणि वाईट आठवणी, ज्यांना ठरवून पण मी विसरू शकत नव्हतो. किंबहुना दोघांच्या चुकांच्या होणाऱ्या पुनरावृत्तीमुळे मला त्या विसरायच्याच नव्हत्या.
पहिले काही दिवस वाटलं की घेतलेला निर्णय अतिशय योग्यच होता. पण आता मात्र परिस्थिती आटोक्याबाहेर चाललीये.. मनात अगदी तडकाफडकी विचार चालू झालेत.
ज्या चुका घडल्या आहेत त्यांना जाऊदे चुलीत... छान छान क्षणांना कवटाळून त्यांना जपत तिच्याकडे परत जावं. मी जो निर्णय घेतला तो खरंच चुकला हे मान्य करावं. इगो बाजूला ठेवावा.
सोफी त्या गाण्यात म्हणते तसं "वि आर स्त्रोंग इनफ, आय एम नॉट गिव्हिंन अप ऑन अस... नॉट गिव्हिंन अप ऑन लव्ह.".. सोफिच्या आवाजातला तळतळाट अगदी शरीरावर स्वार होतोय.
आत्ताच्या आत्ता जागेवरून उठावं आणि आत्ता जाऊन तिच्या घरात शिरावं. जगाची पर्वा न करता तिला मिठीत कडकडून आवळून घ्यावं.. आणि विचारावं - "बोल लग्न करतेस माझ्याशी ?"
दुसऱ्या क्षणी असं वाटतं की अरे थांब, उगाच भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. तू तिला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम वाईट आणि खोटं वागलास. 
पण ती ? तुला त्रास होण्यासाठी ती कधीच वेगळी वागली नाही. ती जशी होती कदाचित आजही तशीच असणार आहे. सुरुवातीच्या काळात तुझ्या डोळ्यावर पडदा होता म्हणून ह्या गोष्टी तुला दिसल्या नाहीत. आता तर माहीत आहे ना ती कशी आहे स्वभावानं ते ? तिचा तो निरागसपणा आहे ते सर्व ठीक आहे.. पण त्यानं तुला होणाऱ्या त्रासाचे काय ? 
आत्ता म्हणतोयस खरं, की झालं गेलं विसरू .. पण खरंच जाणारेत का ह्या गोष्टी डोक्यातून ? इतके दिवस तिच्याशी भांडत राहिलास. तेव्हा गेल्या का गोष्टी डोक्यातून ? 
जे घडलं ते अनेकदा.. तेच पुन्हा घडणार नाही ह्याची खात्री आहे ? तिची आणि तुझीपण.. लग्नानंतर वेगळे झालात तर घटस्फोटाचा शिक्का कायमचा कपाळी लागेल. 
त्यापेक्षा आत्ता वेगळे आहोतच की, चालू दे जे चाललंय ते.. तू काय एकटाच नाहीयेस असल्या परिस्थितीतून जाणारा.. असले सतराशे साठ रोमियो पडलेत.
आणि इतकं काय आवडतं रे तुला तिच्यात ? चांगला जिवंत आहेस.. आणि कर्तव्य करतोच आहेस की..
छे छे .. तिच्यापासून लांब जायचा निर्णय तूच घेतला आहेस.. आत्ताच विचार करायची योग्य वेळ आहे.. तिला परत मिळवण्याची. तिच्यात काय आवडतं ते माहीत नाही. 
पण तिच्याशिवाय रमता येतंय का कोणत्या ठिकाणी ? नाही न ? आणि दुसऱ्या कोणावर करू शकशील इतकं प्रेम ? आहे तो खेळखंडोबा काय कमी झालाय ? 
दुसरीशी लग्न केलंस तर तिच्या आयुष्याशी खेळ तर नाही ना होणार ? आयुष्यभर दुःख सलसलत राहणार.. पश्चात्ताप होतच राहणार.. आणखी उशीर कशाला ? 
गेल्या काही महिन्यात तिच्या आयुष्यात कोणी दुसरा आला असेल तर ? किंवा तिच्या आई-बाबांनी तिच्यासाठी कोणी निवडला असेल तर ?
बघू शकशील तिला कोण्या दुसऱ्याबरोबर ?  बघ विचार कर.. हीच वेळ असू शकते परत फिरायची .. 
मनात जोपर्यंत "कधी हे कधी ते" चालू आहे तोपर्यंत कोणताही निर्णय घेता येत नाहीये. सध्या आलेला दिवस ढकलणे हेच काम.