आम्ही कायदेकरी

आम्ही सगळे कायदेकरी भर सगळा कायद्यावरी ।
कायदा आमुच्या खांद्यावरी नेऊ आमच्याच वाटेवरी
आमचा आदर्श गांधी जरी पण वागू न त्यांच्यापरी
काही काम न करणे जरी भर कायदे करण्यावरी
जर काही बिघडले तरी सुधारण्यास कायदा करी
पण कायदा पाळण्यावरी लक्ष ठेवणे बातच दुरी
आम्ही करतो तो कायदा पाळण्याचा नसे वायदा
तुम्ही पाळा असे सांगतो पण पाळणार नाही जाणतो
एक गुपित तुम्हा सांगतो आम्हीसुद्धा नच पाळतो
आणखी एक गुपित सांगतो कायदे त्याचसाठी आम्ही करतो
लाज कायद्याची सगळी सोडा मग कायदा आहे तो मोडा
मग चुकून शिक्षा होता जाल सुटून राडा करता
काही कारण न घाबरण्याला आम्ही इथे आहोत कशाला
आम्ही प्रत्येक कायद्यावरी ठरवतो ही किंमत बरी
कायदा मोडुन जो चुकती करी  त्याला भिती न कसलीच खरी
आम्ही सगळे कायदेकरी भर सगळा कायद्यावरी ।