'डोळस' राधा

काही नावांमध्ये  असा अवीट गोडवा असतो की तो  कुठल्याही काळात कमी होत नाही अन ती नावं कधी जुनाट, आऊट डेटेडही वाटत नाही,  रमा, सई, मीरा... अश्याच ह्या यादीतलं एक नाव राधा. राधा अन माझी भेट होऊन दोन वर्षे झाली असतील. माझ्याकडे बरीच पुस्तकं होती ती कुठल्यातरी वाचनालयाला भेट द्यायची होती. डॉ चोरघडेकाकांनी राधाला सांगितलं अन ती पुस्तक घ्यायला आली. ती माझ्या घरातून पुस्तकं तर घेऊन गेली पण तिने माझ्या मनात घर केलं. मध्यंतरी दोन वर्षात गाठभेट झाली नाही. जेव्हा अशी लेखमाला लिहिण्याचा विचार करत होते त्या यादीत अर्थात राधाचंही नाव होतंच. राधा आपलं घर कुटुंब सांभाळत 'लुईराम' वाचनालय चालवते. लूईराम नाव जरा वेगळंच वाटलंय ना!   ब्रेललिपीचा जनक लुईब्रेल मधील 'लुई'. 'लुई' हे राधाचे आराध्य दैवत व जनसामान्यांचे 'राम' हे दैवत म्हणून हे लुईराम हे नाव. अंध व सामान्य लोकांकरिता एकत्र वाचनालय चालवणारी राधा. डोळसपणे जीवनाकडे बघणारी अंध 'राधा'! तिची कहाणी  ऐकली की  आपल्याला जीवनाकडे सकारात्मकाने बघण्याची 'दृष्टी' मिळते.

शिक्षणः एमए मराठी, बीएड, संगीत विशारद

पुरस्कारः अ.भा. नाट्य प्रयोगात एकपात्री प्रयोगात उत्तम अभिनयाचे पारितोषिक, मुंबईच्या एनएबीचा 'नीलम कांगा अवॉर्ड', अपंग साहित्य संमेलनातर्फे 'वर्षा ऋतू अवॉर्ड'.

साहित्यः वादळातील दिवे (कथासंग्रह)

मी: तू जे आज जे जे काही करते आहे आणि खूप काही अजून तुला काही करायचे आहे त्याची पाळंमुळं खोलवर कुठेतरी बालपणात दडलेली नक्कीच आहेत, तुझे बालपण कसे होते?

राधा: खूप कष्टाचे, अतिशय गरीब परिस्थिती. आम्ही एकंदर नऊ बहीण-भावंड.आम्ही नागपूरजवळ असलेल्या ट्कडीवाडी गावात राहायचो. मी अडीच-तीन वर्षाची असताना वडील वारले. आई शेतमजुरी करायची त्यावर आमची गुजराण व्हायची. माझे भाऊ दूध विकायला जायचे. त्यात मी ही अशी पण  जन्माने डोळस होते हं. मी अडीच वर्षाची असताना माझे डोळे गेले. काहीजणांच्या मते देवीमुळे माझे डोळे गेले तर माझी आई म्हणते कोणीतरी करणी केली पण माझा त्यावर विश्वास नाही. ते काहीही असो पण माझी भावंड माझी खूप काळजी घ्यायचे. मी खूप धडपडी. लागलं-झडलं तरी रडत बसायची नाही,परत खेळू लागायचे. घरात शिकलेलं कोणी नाही. माझा तर शाळेत जायचा प्रश्नच नव्हता. पण एक दिवस गंमत झाली. आज मी त्याला गंमत म्हणते पण त्या दिवशी अतिशय रागावलेले होते. झालं काय माझ्या मोठ्या भावाने आंबे आणले. रात्री आईने कामावरून आल्यावर त्या आंब्याचा रस करावा म्हणून मी ते एका डब्यात लपवून ठेवले अन त्यावर मी बसले. माझ्या इतर भावांना आंबे आणल्याचं कळलं. ते मला मागायला लागले आणि मी त्यांना देत नव्हते. ते चिडले अन रागाने म्हणाले तू वाईट आहेस, म्हणूनच तू आंधळी झालीस. खरं तर ते सगळेच मला खूप जपायचे पण रागाने त्यांच्या तोंडातून चुकीने निघाले. मीही लहानच होते मलाही तेव्हा समज नव्हती. मी लहानपणापासूनच खूप स्वाभिमानी आहे. मला कोणी काही बोललेलं खपत नसे. मला खूप राग आला. मी त्या दिवशी ना जेवले ना कोणाशी बोलले. आईला सांगितले मला घरी राहायचेच नाही. मी शाळेत जाण्यासाठी खूप हट्ट केला. आमच्या गावातला एक मुलगा नागपूरच्या अंध विद्यालया शिकायला होता त्यामुळे नागपूरला अंधांची शाळा आहे हे माहीत होते. माझा अशिक्षित मोठा भाऊ मला नागपूरला घेऊन आला अन शाळेत दाखल केलं. आज तो ह्या जगात नाही पण आम्ही आज इतक्या सुस्थितीत आहोत ते त्याच्यामुळे.

मी: एकदम वेगळ्या वातावरणात आलीस, कसं वाटलं?

राधा: खूप छान वाटलं. माझ्या आईला खूप वाईट वाटलं तसंच काळजीही वाटत होती. थोड्याच दिवसात मी इथे रुळले. सर्व शिक्षा अभियानामध्ये शिक्षक काहीवेळच तुमच्याबरोबर असतो पण आमच्या शाळेत चोवीस तास शिक्षक आमच्याबरोबर असतो. मला अभ्यासाची आवड होती. माझे सगळेच शिक्षक खूप प्रेमळ, माझ्यावर तर जास्तच माया करायचे. मला ते आपल्या घरी पण घेऊन जायचे. मी चवथीत असताना पहिली कथा लिहिली 'स्वावलंबी करुणा'. ती कथा नागपूर पत्रिकेमध्ये छापून आली होती. माझ्या शिक्षिका मायाताईंमुळे ही कथा छापून आली. माझ्या आयुष्यात मायाताईंना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचीच अन बक्षीसही कधी चुकलं नाही. मी मुंबईला कथाकथन, वकृत्व, एकपात्री प्रयोग, वादविवाद अश्या अनेक स्पर्धांसाठी जात होते. मला दादरची शाळा खूप आवडली ती शाळा म्हणजे जणू सागरच! तो सागर मला आता खुणावू लागला होता. नागपूरची शाळा चांगलीच आहे पण तुलना केल्यास त्या काळी मुंबईची शाळा खूपच यद्ययावत होती. मी तिथे जायचं ठरवलं पण आमचे वीरकरसर आणि माझ्या घरचेही पाठवायला तयारच नव्हते. माझ्या मायाताईंनी माझ्यातली हुशारी ओळखली होती. त्यांनी सगळ्यांना समजावले की माझ्या पुढील प्रगतीसाठी मुंबईला पाठवणे आवश्यक आहे . तिथे माझी प्रवेश परीक्षा घेण्यात आली त्यात उत्तीर्ण होऊन मला सातवीत प्रवेश मिळाला. माझा मोठा भाऊ मला सोडायला आला होता. दोन दिवस तो फुटपाथावर झोपला. माझ्या ह्या यशात अनेकजणांचा वाटा आहे त्यात मुख्य ह्या माझ्या शेषराव भावाचा. ह्या शाळेने मला खूप काही दिले. इथली शिस्त खूप कडक होती पण जाचक नव्हती. शिक्षक खूप चांगले होते. तिथेही सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत असे. दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या कमला मेहता शाळेत झाले. ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ज्या कलेत/विषयात आवड आहे ते करायला खूप मदत, प्रोत्साहन देतात. इथे माझ्यातल्या कलागुणांना वाव मिळाला. मी अडुसष्ट टक्क्याने पास झाले. राज्यात अपंगांमधून पहिली होते. त्यावेळी सगळी पुस्तकं ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हती. संपूर्ण शैक्षणिक जीवनात मोठ्ठी व मुख्य अडचण होती ती म्हणजे चांगला लेखनिक मिळणे. मी ह्या शाळेची अन इथल्या शिक्षकांची ऋणी आहे ह्या शाळेने मला घडवले नसते तर मी आज कुठेतरी वर्कशॉपमध्ये काम करत राहिले असते.

मी: महाविद्यालयीन शिक्षण कुठे आणि कसं झालं?

राधा: पुढचं शिक्षण नागपूरला झाले. मला कॉलेज व हॉस्टेल जवळ जवळ असणारे हवे होते. पण हे मिळणं कठीण गेलं. खूप पायपीट केली. मला हॉस्टेलवर ठेवायची माझ्या भावाची तयारी नव्हती. माझ्या भावाने नागपूरला माझ्यासाठी घर करायचेही ठरवले होते. मला हॉस्टेलावरच राहायचं होतं. मी आज सगळं स्वतंत्रपणे करू शकत होते. त्यांनी प्रेमापोटी मला काही करू दिले नसते. हे मी त्यांना समजावून सांगितले त्यांनाही ते पटलं. मला एलएडी कॉलेजला प्रवेश मिळाला पण हॉस्टेल मिळत नव्हते. भगवाघरमॅडम त्या काळी नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाइंड नागपूर विभागाच्या काम पाहायच्या. त्यांना मी माझ्या राहण्याची समस्या सांगितली. त्यांनी गिनीसरांना सांगून   मला शंकरनगरच्या विद्यापीठ वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला. तिथला पहिला दिवस आठवला तरी अंगावर शहारे येतात पण हे वाचून लोकांना दिशा मिळेल अन अपंगांबद्दल सह अनुभूती वाटेल म्हणून हा प्रसंग सांगते. मी माझ्या खोलीत आले आणि पलंगावर बसले. इतर मुली संकोचामुळे बोलायला बिचकत होत्या. खूपवेळ मी न खातापिता एकटी बसून होते. मला खूप जोराची वन लागली होती. कुणाशी बोलू काय करू समजत नव्हतं. सोनिया नावाची एक विद्यार्थिनी होती, तिला  माझ्याकडे बघून काहीतरी जाणवले. तिने  माझी विचारपूस केली.  नंतर हळूहळू इतरहीजणी बोलायला लागल्या. त्यातलीच माझी खास मैत्रीण सतवंत संधू मी तिला प्रेमाने सत्तुताई म्हणते व लीना देवगावकर ह्या दोघींनी  माझं संपूर्ण शिक्षण होईपर्यंत सर्वतोपरी मदत केली. ते चारपाच तास सोडले तर पुढे मग मला हॉस्टेलवर कोणतीच अडचण आली नाही. खूप चांगल्या मैत्रिणी तर मिळाल्याच पण कॉलेजच्या कोपर्‍यावरच्या रिक्षावाल्यांनीही गैरफायदा न घेता मला खूप मदत केली. हॉस्टेलचा पंडित हमरी राधा पहले खाना खाएगी म्हणत आधी मला जेवायला वाढायचा. मी समाजाची अत्यंत ऋणी आहे. ह्या समाजाला मी डावलू नाही शकत. वाईट लोकही भेटले ते मी विसरून गेले किंवा असं म्हणेन म्हणून मला चांगल्या लोकांची किंमत अधिक कळली.  बारावी झाले ते माझ्या शिक्षिका मायाताई देशपांडेमुळेच. मी कॉलेजमध्ये दिसले नाहीतर त्या मुलींना पाठवून मला बोलावून घ्यायच्या. मी संगीत, सोशॉलॉजी, चाइल्ड डेवलपमेंट घेऊन बीए झाले ते सौ हातेकर, भागवत, फणसाळकर, कै सुमन कोगजेताईंमुळेच. त्यांनी मला आपल्या सख्ख्या मुलीसारखं प्रेम केलं. घरचं सांभाळून ह्या सगळ्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. एमएला मी मराठी साहित्य विषय घेतला. द.भि. कुलकर्णी, आशा सावदेकर, प्रभुदेसाई, यशवंत मनोहर अशी एकसे बढकर एक प्राध्यापक मंडळी शिकवायला होती. श्रध्दा तेलंगमॅडमने मला नोट्स काढून द्यायच्या. सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. दभि.कुलकर्णी मला 'डोळसांचा आरसा' म्हणायचे. एमएला मी विद्यापीठातून दुसरी आले एका मार्काने माझा पहिला क्रमांक चुकला. त्यानंतर मी बीएड केलं. अतिशय कठीण होतं बीएड करणं, लेसन काढणं, त्याची तयारी करणं. पण माझ्या मित्रमैत्रिणींनी खूप मदत केली.

मी: नोकरी केली का?

राधा: नोकरी मिळवण्याकरिता पैसे मागायचे. मी कुठून पैसे देणार? एका शाळेत मला नोकरी मिळाली पण पूर्ण पगार मिळत नव्हता. मी अकरावी व बारावीला शिकवत होते. विदर्भ बुनियादी, सेवादल शिक्षक संस्था, धनवटे नॅशनल कॉलेज अश्या काही संस्थांमध्ये नोकरी केली. मला माझ्या बाळाची चाहूल लागली अन मग मी नोकरी सोडली.

मी: लग्न कसं झालं?

राधा: माझा प्रेमविवाह! कोणाला खरं नाही वाटणार पण मला खूप चांगल्या चांगल्या डोळस मुलांनी मला मागणी घातली. पण पुंडलिकच्या प्रेमात पडले. मला त्यांचा स्वभाव खूप आवडला. आम्ही फिरायला, हॉटेल, सिनेमाला जायचो. एक डोळस व्यक्ती जितकी मजा करतील तेवढी मजा आम्ही केली अर्थात घरच्या लोकांच्या परवानगीने. पुंडलिकची आर्थिक परिस्थिती बेतास बात होती म्हणून सुरुवातीला माझ्या घरच्यांचा थोडा विरोध होता. मी त्यांना समजावल्यानंतर खूप धूमधड्याक्यात आमचे लग्न झाले. त्यांना त्या वेळेला एका डोळ्याने दिसत असे. पण सन दोनहजारमध्ये दुसरा डोळा निकामी झाला. पण तोपर्यंत माझी मुलगी मधुरा मोठी झाली होती. माझं बाळंतपण खूप कष्टाचे! अशक्त मधुरा जन्माला आली. मी पण आजारी. मधुराला उष्णपेटीत ठेवल्यामुळे मी तिला दोन महिनेजवळ घेऊ शकले नाही ह्याचं मला आजही वाईट वाटतं. त्या काळात मला ज्यांनी ज्यांनी म्हणून मदत केली त्याला तोड नाही. माझ्या आयुष्याच्या अवघड वळणावर इतके चांगली लोकं भेटली त्यामुळे अवघड वळणाचा मार्ग सुकर झाला. आज माझी मुलगी मधुरा सत्यांशी टक्के मिळवून दहावी पास झाली.

मी: मुलगी झाली म्हणून वाईट वाटले का?

राधा: नाही, अजिबात नाही. वाईट वाटले ती अशक्त जन्मल्याचे. मी तिला दोन महिने जवळ न घेऊ शकल्याचे.

मी: भविष्यातील योजना काय आहे?

राधा: मनात खूप काही करायचे आहे. माझं प्राधान्य आधी माझं कुटुंब. मधुरा लहान असेपर्यंत काही करायचे नाही ठरवले होते. आता ती मोठी अन स्वतंत्र झाली आहे. अनेक लोकांच्या मदतीने 'लुईराम' वाचनालय आता एका मोठ्या जागेत लवकरच स्थलांतरित करणार आहोत. वाचनालयासाठी खूप लोकांनी मदत केली त्यापैकी अभिनेते विक्रम गोखले एक. त्यांच्याबद्दल कितीही आदर व्यक्त केला तितका कमीच आहे. त्यांनी माझ्याबद्दल पेपरमध्ये वाचलं होतं. नागपूरला आल्यावर ते मला भेटायला आले होते अन जेव्हा जेव्हा नागपूरला येतात मला भेटल्याशिवाय जात नाही. अ‍ॅड. मनोहर कुटुंबीय, चोरघडे काका ही काही नागपूरमधील नामवंत मंडळी पण सर्वसामान्य व्यक्तींनीही त्यांच्यापरीने मदत केली. अश्याच सगळ्या मंडळींच्या मदतीने वाचनालय यद्ययावत करायचे आहे. तिथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे आहेत. मी अंधांकरिता शिबिरे घेतली होती. नियमितपणे अशी शिबिरे घ्यायची आहेत. खेडोपाडी जाऊन जनजागृती करायची आहे. खेड्यात अंधाची, खास करून मुलींची वाईट परिस्थिती आहे. मुलींना घरात डांबून ठेवतात. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. त्या सर्वसामान्यांसारखं आयुष्य जगू शकतात. लग्न, संसाराचा आनंद घेऊ शकतात. त्यांच्यासाठी स्व्-बचत गट करायचा आहे. त्यांना सक्षम करायचं आहे आर्थिक, शारीरिक, मानसिकरितीने. अरे हो, अगदी निकटच्या भविष्यातील योजना म्हणजे अमीरखानला पत्र लिहून त्याचे अभिनंदन करायचे आहे.

राधाला मनापासून पुढच्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा!