पिंजरा

वाड्यात आत शिरल्या शिरल्या लक्ष जातं ते भिंतीवर लावलेल्या "लव्ह-बर्डस" पक्ष्यांच्या मोठ्या पिंजऱ्याकडे ! सतत आपल्या जोडीदाराबरोबर राहायचं आणि महिन्यातून एकदा तरी किमान दोन अंडी घालायची ह्यासाठीच बहुतेक ह्यांचा जन्म झाला असावा ! जेमतेम दोन जोड्यांपासून सुरू झालेलं हे कुटुंब आता पंचवीसेक पक्ष्यांचा मोठा परिवार झाला आहे.
निळ्या, पिवळ्या रंगाचे, कळ्या किंवा लाल डोळ्यांचे सुंदर आणि मोहक पक्षी बघताना खरंच खूप छान वाटतं. ज्यानं इतक्या उत्साहानं ते पाळले आहेत, तो त्यांना रोज सकाळी राळे खायला घालतो. त्यांच्या वाटीत पाणी भरून ठेवतो. आठवड्यातून एकदा - दोनदा कोथिंबीर किंवा पुदिनाही देतो. भोक पडलेली सात-आठ मडकी पिंजऱ्यात लावली आहेत. हे पक्षी ह्या मडक्यांमध्येच अंडी देतात.
त्यांचा तो चिवचिवाट, कधी  कंठातून निघणारा मंजुळ स्वर मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही.
येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरतो. सगळे जण कौतुक करतात आणि परत आपापल्या कामात मग्न होतात.
त्या दिवशी मात्र आमच्या एका मित्राला त्यांच्याविषयी अगदीच उचंबळून आलं.
नं राहवून तो शेवटी मला म्हणाला "काय रे, इतके सुंदर पक्षी पिंजऱ्यात बंद बघवत नाहीत, आपण ह्या मुक्या प्राण्या-पक्ष्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहे."
"अरे बरोबर आहे तुझं म्हणणं, पण त्यांना जर बाहेर सोडून दिलं, तर कावळे, घारी मिळून मारून टाकतात रे बिचाऱ्यांना" मी त्याला सांगितलं.
"का रे ? असं का ? आता बाकीचे अनेक लहान सहाण पक्षी जगतात की, मग हे का नाही जगू शकत ?" त्यानं चौकस बुद्धीनं विचारलं.
"अरे, त्यांना राळ लागतं खायला, ते इथे कुठे मिळणार त्यांना ? म्हणून नाही जगू शकत ते बाहेर.. मग अश्या मोठ्या पक्ष्यांचे शिकार होतात ते"...  मी म्हणालो. ह्या वाक्यानंतर त्यानं काही प्रश्न विचारला नाही आणि आम्ही पुढे निघून गेलो.

आमचं संभाषण जरी इतक्यावर संपलं तरी डोक्यात विचार मात्र चालू होता. बाहेरच्या जगात त्यांचं जिवंत न राहण्याचं कारण वेगळंच वाटतं. 
पिंजऱ्यातले पक्षी हे काही थेट जंगलातून कैद करून पिंजऱ्यात ठेवले नाहीयेत. त्यांच्या अनेक पिढ्या ह्या पिंजऱ्यांतच गेल्यात, आणि वावरत आहेत. त्यांची विक्री ज्या दुकानात होते, तिथला छोटा पिंजरा तर कधी एखाद्या श्रीमंत ग्राहकाने बनवलेला प्रशस्त पिंजरा.
पिंजऱ्यात असणारी मडकी, किंवा खोक्याचे चौकोन हीच अंडी घालायची जागा आहे इतकंच त्यांना ठावूक. मडक्यात अंडी घातली की त्यातून येणारी पिले ठराविक काळापर्यंत मडक्यातच राहतात. बऱ्यापैकी वाढ झाली की ती उड्डाण करायला सज्ज होतात. मडक्यातून उड्डाण केले की थेट समोर असलेल्या जाळीवर धडकायला होतं, किंवा झोपाळा म्हणून लटकवलेल्या समोरच्या बारवर पंख घासून जखम होते. कधी कधी खाली आपटून डोकं फुटतं आणि जीवावर बेतते. काहीजण वाचतात  त्यांना समजतं , की हा पिंजरा हेच विश्वं आहे.
चुकून पिंजऱ्यातून बाहेर जरी गेलो, तरी रोज भांड्यात ठेवलेलं राळ, जाळीवर लटकवलेली कोथिंबीर किंवा वाटीत ठेवलेलं पाणी, कसं मिळवायचं हेच माहीत नाही. संततीसाठी अंडी घालायला मडकी आणि खोक्याचे भोक पडलेले चौकोन कुठे असतात हेच माहीत नाही. व्यवस्थित वाढ झालेल्या पक्ष्यांनाच जर हि गोष्ट माहीत नाही, तर त्यांच्या पिलांना हे कळणं केवळ अशक्यच !
थोडक्यात म्हणजे, पिंजरा हेच त्यांचं विश्वं आणि त्यांना आयतं खायला घालणारा पिंजऱ्याचा मालक हाच त्यांचा देव !
मग असे पक्षी जर पिंजऱ्यातून बाहेर पडले, तर ते निश्चितच इतर पक्ष्यांसमोर दुबळे पडतात. सृष्टीच्या नियमानुसार जो सक्षम आणि ताकदवान आहे त्याचाच निभाव लागतो, बाकीच्यांचा नायनाट होतो.

बाहेरच्या जगाला घाबरून आपल्या ठराविक विचारांच्या पिंजऱ्यांतच बसणे पसंत करणाऱ्या लोकांचा मध्येच अनुभव येतो. त्यानंतर पक्षी कोण, आणि माणूस कोण असा एक सामान्य प्रश्न एका क्षणासाठी मनात उपस्थित होतो !